ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी; 139 धावांत 10 विकेट्‌स

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका : पहिला डाव : 63.4 षटकांत सर्वबाद 242
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : 70.2 षटकांत सर्वबाद 244
डेव्हिड वॉर्नर 97, शॉन मार्श 63, उस्मान ख्वाजा 4, स्टीव्ह स्मिथ 0, ऍडम व्होजेस 27, मिशेल मार्श 0, पीटर नेव्हिल 23, मिचेल स्टार्क 0, पीटर सीडल नाबाद 18, जोश हेझलवूड 4, नॅथन लिऑन 0
अवांतर : 8
गोलंदाजी : डेल स्टेन 1-51, व्हरनॉन फिलॅंडर 4-56, कागिसो रबाडा 2-78, केशव महाराज 3-56

पर्थ : एखाद्या सत्रामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पारडे कसे बदलू शकते, याचे उदाहरणच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यात आज (शुक्रवार) दिसून आले. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 242 धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर दिवसअखेर बिनबाद 105 धावा आणि आज सकाळच्या सत्रात बिनबाद 158 अशा भक्कम स्थितीतून ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 244 धावांत संपुष्टात आला.

डेव्हिड वॉर्नर आणि शॉन मार्श यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर दडपण आणले होते. शतकाच्या उंबरठ्यावर पोचलेल्या डेव्हिड वॉर्नरचा अडथळा डेल स्टेनने दूर केला. वॉर्नर त्याच्या कसोटी कारकिर्दीत प्रथमच 'नर्व्हस 90'मध्ये बाद झाला. हे यश मिळूनही दक्षिण आफ्रिका 'बॅकफूट'वरच होती. कारण वॉर्नरला बाद केल्यानंतर काही वेळातच स्टेनचा खांदा दुखावला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. स्टेन मैदानाबाहेर असता वॉर्नर-मार्शची जोडी फुटल्यानंतर व्हरनॉन फिलॅंडर आणि पदार्पण करणारा केशव महाराज यांनी ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडविली. ऑस्ट्रेलियाचे दहाही गडी 139 धावांत बाद झाले.

वॉर्नर (97), मार्श (63) आणि काही प्रमाणात ऍडम व्होजेस (27) यांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपयशीच ठरले. फिलॅंडरने चार, तर केशव महाराजने तीन गडी बाद केले. कागिसो रबाडाने दोन आणि स्टेनने गडी बाद केला. हा सामन्याचा दुसराच दिवस असून दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डावही सुरू झाला आहे. स्टेनची दुखापत पाहता दुसऱ्या डावात तो पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करू शकण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारून ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्याची गरज आहे.

Web Title: South Africa managed to dismiss Australia with just two-runs lead