‘विराटसेना’ पुन्हा मैदानात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

कुंबळे वादानंतर विंडीजविरुद्धची वन-डे मालिका आजपासून

पोर्ट ऑफ स्पेन - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेली हार, त्यानंतर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा राजीनामा अशा घटनांनंतर विराट कोहलीची टीम इंडिया वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. पहिला सामना उद्या (ता. २३) होत आहे. ‘दुबळ्या’ विंडीजला हरवण्यासाठी भारताला मुख्य प्रशिक्षक नसला तरी अवघड नसेल.

कुंबळे वादानंतर विंडीजविरुद्धची वन-डे मालिका आजपासून

पोर्ट ऑफ स्पेन - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेली हार, त्यानंतर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा राजीनामा अशा घटनांनंतर विराट कोहलीची टीम इंडिया वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. पहिला सामना उद्या (ता. २३) होत आहे. ‘दुबळ्या’ विंडीजला हरवण्यासाठी भारताला मुख्य प्रशिक्षक नसला तरी अवघड नसेल.

पराभव आणि राजीनामा अशा दोन धक्कादायक घटनांनी भारतीय क्रिकेट हादरले आहे; पण त्याचा परिणाम विंडीज दौऱ्यावर होण्याची शक्‍यता कमी आहे. मुख्य प्रशिक्षकाचे मार्गदर्शन मिळणार नसले, तरी फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासह सपोर्ट स्टाफ दिमतीला कायम आहे. शिवाय पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला पुन्हा विजयीपथावर आणण्यासाठी विराट कोहली तयार झाला असेल. त्यातच प्रतिस्पर्धी विंडीजचा संघ सध्या क्रिकेटविश्‍वातील प्रमुख संघातील कमजोर संघ म्हणून समजला जात आहे. नुकत्यात झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धचीही मालिका त्यांना जिंकता आलेली नाही. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना तर अफगाणिस्तानने जिंकून इतिहास रचला होता.

भारत आणि विंडीज संघ यामध्ये मोठी तफावत आहे. प्रमुख १३ खेळाडूंचा एकत्रित विचार करता भारतीय संघाकडे २१३ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. या तुलनेत विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर त्यांचा अनुभवी खेळाडू असून, तो आतापर्यंत अवघे ५८ सामने खेळलेला आहे. असे असले तरी भारतीयांना सावध राहावे लागेल. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाने त्यांना अस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे.

भारतीय संघाचे वर्चस्व अपेक्षित असल्यामुळे नवोदितांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांना या दौऱ्यातून विश्रांती दिलेली असल्यामुळे अजिंक्‍य रहाणे आणि महंमद शमी किंवा उमेश यादव असे बदल अपेक्षित आहेत. मुख्य प्रशिक्षक नसल्यामुळे आता अंतिम संघात कोणाला स्थान द्यायचे, याचे सर्वाधिकार विराट कोहलीलाच असतील. 
धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात असलेला रिषभ पंत आणि चायनामन कुलदीप यादव यांना या मालिकेत कधी संधी मिळणार, याची उत्सुकता असेल. पहिल्या दोन सामन्यांत तरी धोनी, युवराज, अश्‍विन, जडेजा या प्रमुख खेळाडूंना स्थान दिले जाईल.

२०१९ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेवर नजर ठेवून धोनी आणि युवराज यांच्या स्थानाचे मूल्यमापन करावे, असे विधान युवक संघाचे प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी केल्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असेल आणि त्यांनाही आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. असेच दडपण चॅंपियन्स स्पर्धेत अपयशी ठरलेल्या अश्‍विन आणि जडेजा या फिरकी गोलंदाजांवर असेल.

Web Title: sporst news west indies with india cricket match