पाचशेवा सामना खेळणे हा बहुमान - तरे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 November 2017

मुंबई - देशांतर्गत क्रिकेटमध्ये आगळेवेगळे स्थान असलेल्या मुंबईचा रणजी स्पर्धेतील ५०० वा सामना खेळण्याचे भाग्य मिळणे हा आमचा बहुमान आहे, असे मत मुंबईचा विद्यमान कर्णधार आदित्य तरेने व्यक्त केले. मुंबईचा हा ऐतिहासिक सामना बडोद्याविरुद्ध उद्यापासून वानखेडे स्टेडियमवर रंगेल.

मुंबई - देशांतर्गत क्रिकेटमध्ये आगळेवेगळे स्थान असलेल्या मुंबईचा रणजी स्पर्धेतील ५०० वा सामना खेळण्याचे भाग्य मिळणे हा आमचा बहुमान आहे, असे मत मुंबईचा विद्यमान कर्णधार आदित्य तरेने व्यक्त केले. मुंबईचा हा ऐतिहासिक सामना बडोद्याविरुद्ध उद्यापासून वानखेडे स्टेडियमवर रंगेल.

या महत्त्वाच्या सामन्यासाठी अजिंक्‍य रहाणेबरोबर आता श्रेयस अय्यरही उपलब्ध असल्यामुळे मुंबई पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल यात शंका नाही.  एकापेक्षा एक सरस व विक्रमी खेळाडूंची परंपरा लाभलेल्या मुंबईचा हा विक्रमी सामना खेळायला मिळणार हे आमचे भाग्य आहे. असे असले तरी मैदानात उतरल्यावर आम्ही याकडे एक साखळी सामना म्हणूनच पाहणार आहे आणि कोणतेही दडपण न घेता खेळणार आहोत, असे तरेने आज सरावानंतर सांगितले.

सर्वाधिक रणजी सामने खेळण्याबरोबर सर्वाधिक ४१ वेळा विजेतेपदाचा बहुमान मिळवणाऱ्या मुंबईने गत सामन्यात ओडिशाला हरवून आणि एकूण १० गुणांसह गटात तिसरे स्थान मिळवले आहे; तर प्रतिस्पर्धी बडोद्याला तीन सामन्यांतून चारच गुणांची कमाई करता आली आहे. मुंबईचे पारडे जड असले, तरी प्रत्यक्ष मैदानावर तसा खेळ करून गटात वरचे स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

पंड्या, पठाण बंधूंशिवाय बडोदा
बडोद्याला पठाण बंधूंसह हार्दिक व कुणाल या पंड्या बंधूंशिवायही खेळावे लागणार आहे. हार्दिक कालच भारताकडून ट्‌वेन्टी-२० सामना खेळला आहे; तर कुणाल दुखापतीतून सावरलेला नाही. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका बसेल का, या प्रश्‍नावर कर्णधार हुडाने अडखळल्याशिवाय ताठ उभे राहण्याचा अनुभव मिळत नाही, असे उत्तर दिले.

मुंबई @ ५००
पहिला सामना गुजरातविरुद्ध अहमदाबाद येथे (२ ते ४ फेब्रुवारी १९३५)
वेस्टर्न इंडियाविरुद्ध मिळविलेला विजय मुंबईचा रणजी सामन्यातील पहिला ठरला. (२३ ते २५ फेब्रुवारी १९३५)
मुंबईने गुजरातविरुद्ध पहिल्या सामन्याबरोबर शंभरावा आणि दोनशेवा सामनादेखील खेळला.
मुंबईचा तीनशेवा सामना हरियाना, चारशेवा सामना बंगालविरुद्ध खेळले.
मुंबईने आतापर्यंतच्या ८४ वर्षांच्या कालावधीत ४६ वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना ४१ वेळा विजेतेपद मिळविले.
मुंबईच्या आतापर्यंतच्या ४९९ विजयांत २४२ सामने जिंकले आणि २३१ सामने अनिर्णीत राखले. ते केवळ २६ सामने हरले आहेत.
आतापर्यंत मुंबईकडून एकूण ३०९ खेळाडू रणजी सामन्यात खेळले.
आतापर्यंत मुंबईला ४५ कर्णधार लाभले.
आतापर्यंत मुंबईकडून ५७१ शतके (यात ७ त्रिशतके, ६१ द्विशतक, ५०३ शतके).
मुंबईकडून सर्वाधिक ३५ शतके वासिम जाफरची.
मुंबईकडून रणजी कारकिर्दीत वासिम जाफरच्या सर्वाधिक ९,७५९ धावा.(संकलन - गंगाराम सपकाळ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news aaditya tare talking