esakal | मलानचे शतक; इंग्लंडचा भक्कम प्रारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

पर्थ - तिसऱ्या ॲशेस कसोटीत पहिल्या दिवशी गुरुवारी शतकानंतर अभिवादन करताना इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान.

मलानचे शतक; इंग्लंडचा भक्कम प्रारंभ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पर्थ - ॲशेस मालिकेतील अत्यंत महत्त्वाच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या दिवशी सुदैवी ठरला. डेव्हिड मलान याने त्याचे तसेच मालिकेतील इंग्लंडचे पहिलेच शतक नोंदविले. ऑस्ट्रेलियाकडून ढिसाळ क्षेत्ररक्षण झाले. इंग्लंडला तीन जीवदाने मिळाली, तसेच मलानला धावचीत करण्याची संधीही वाया गेली. 

पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने ४ बाद ३०५ अशी भक्कम सुरवात केली. मलान ११० धावांवर नाबाद असून यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टॉ त्याला ७५ धावांवर साथ देत आहे. या जोडीने पाचव्या विकेटसाठी १७४ धावांची नाबाद भागीदारी रचली आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतल्यावर इंग्लंडची ४ बाद १३१ वरून अशी अवस्था झाली होती.

मलान ३२ धावांवर धावचीत होता होता वाचला. कांगारूंनी दुसरा नवा चेंडू घेतला. मग पहिल्याच चेंडूवर कॅमेरॉन बॅंक्रॉफ्टने मलानला जीवदान दिले. त्यावेळी गोलंदाज स्टार्क दुर्दैवी ठरला. तेव्हा मलान ९२ धावांवर होता. मलानने जॉश हेझलवूडला तेरावा चौकार मारून आठव्या कसोटीत पहिले शतक पूर्ण केले.

स्टोनमनने चिवट खेळ केला. त्याने स्टार्कला सलग तीन चौकार मारले. त्याला दोन जीवदाने मिळाली. कागारूंनी त्याच्यावर उसळत्या चेंडूंचा मारा केला. ५२ धावांवर पहिल्या स्लीपमध्ये मिचेल मार्शने हेझलवूडच्या गोलंदाजीवर त्याचा झेल सोडला. याच गोलंदाजाच्या उसळत्या चेंडूवर त्याची हेल्मेट तुटली. याशिवाय आणखी एका उसळत्या चेंडूवर त्याचा झेल नेथन लायनकडून सुटला.

संक्षिप्त धावफलक 
८९ षटकांत ४ बाद ३०५ (ॲलिस्टर कुक ७, मार्क स्टोनमन ५६-११० चेंडू, १० चौकार, जेम्स व्हिन्स २५, ज्यो रूट २०-२३ चेंडू, ४ चौकार, डेव्हिड मलान खेळत आहे ११०-१७४ चेंडू, १५ चौकार, १ षटकार, जॉनी बेअरस्टॉ खेळत आहे ७५-१४९ चेंडू, १० चौकार, मिचेल स्टार्क २-७९, जॉश हेझलवूड १-६२, पॅट कमिन्स १-६०).

डीआरएसमुळे वाद
स्टोनमन अर्धा तास ५२ धावसंख्येवरच होता. अखेर हेझलवूडला चौकार मारत त्याने आगेकूच केली. त्यानंतर नाट्य घडले. स्टार्कच्या चेंडूवर त्याने यष्टीमागे टीम पेनकडे झेल दिल्याचे अपील पंच आलीम दर यांनी फेटाळून लावले. कांगारूंनी लगेच डीआरएसची मागणी केली. त्यात चेंडू ग्लोव्हला लागल्याचे स्पष्टपणे दिसले नाही, अगदी पुसटसा स्पॉट होता. त्यामुळे स्टोनमनला बाद ठरविण्यात आले. या निर्णयावर इंग्लंडचे खेळाडू उघड नाराज झाले.

loading image