esakal | चिवट कांगारूंचे पुन्हा प्रतिआक्रमण
sakal

बोलून बातमी शोधा

पर्थ - तिसऱ्या ॲशेस कसोटीत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शतकानंतर अभिवादन करताना इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टॉ.

चिवट कांगारूंचे पुन्हा प्रतिआक्रमण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पर्थ - ॲशेस मालिकेत प्रतिआक्रमण रचत पकड मिळविण्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा यशस्वी ठरला. इंग्लंडचा डाव ४०३ धावांत संपविल्यानंतर कांगारूंनी दुसऱ्या दिवसाअखेर ३ बाद २०३ अशी प्रभावी सुरवात केली. वेगवान गोलंदाजांच्या भेदकतेनंतर कर्णधार स्टीव स्मिथच्या चिवट खेळीसमोर इंग्लंडच्या डेविड मलान याच्यापाठोपाठ जॉन बेअरस्टॉ याचेही शतक तसेच विक्रमी भागीदारी झाकोळली.

दिवसअखेर स्मिथ ९२ धावांवर नाबाद होता, तर शॉन मार्श सात धावांवर त्याला साथ देत होता. कांगारू आणखी २०० धावांनी मागे असून त्यांच्या सात विकेट बाकी आहेत. वेगवान गोलंदाज क्रेग ओव्हर्टन याने वॉर्नर आणि बॅंक्रॉफ्ट यांना जम बसण्यापूर्वीच परतविले. त्यानंतर स्मिथने ख्वाजासह १२४ धावांची भागीदारी रचली. ख्वाजाला ३९ धावांवर ज्यो रूट याच्याकडून जीवदान मिळाले. स्मिथने चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले, तर ख्वाजाने मोईन अलीला कव्हरमधून चौकार मारत दहाव्या कसोटी अर्धशतकाचा टप्पा गाठला. त्यानंतर मात्र ख्रिस वोक्‍सच्या चेंडूवर तो पायचीत झाला.

४ बाद ३०५ वरून इंग्लंडचा डाव ४०३ धावांत संपविण्यात कांगारूंना यश आले. इंग्लंडला सहा विकेटच्या मोबदल्यात आणखी केवळ ९८ धावांची भर घालता आली. इंग्लंडची ही जानेवारी २०११ नंतरची ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च धावसंख्या ठरली, मात्र पहिल्या सत्रातील अखेरच्या दहा षटकांत त्यांच्या सहा विकेट ३५ धावांत पडल्या. मलान-बेअरस्टॉ यांनी पाचव्या विकेटसाठी २३७ धावांची भागीदारी केली. ही इंग्लंडतर्फे वाका मैदानावरील सर्वोत्तम, तर ऑस्ट्रेलियातील पाचव्या विकेटसाठीची पाचव्या क्रमांकाची भागीदारी ठरली. लायनचा चेंडू फटकावण्याच्या मोहात मलान बाद झाला. बेअरस्टॉची दांडी स्टार्कने उडविली. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला कशीबशी चारशेच्या पुढे मजल मारू दिली.

बेअरस्टॉचे ‘सेलिब्रेशन’
इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टॉ याने ॲशेसमध्ये पहिलेवहिले शतक झळकावले. त्यानंतर त्याने हेल्मेट डोक्‍यासमोर धरले. हेल्मेटला डोक्‍याने धडक देण्याचे हावभाव त्याने केले. पहिल्या कसोटीपूर्वी पर्थमधील एका बारमध्ये बेअरस्टॉ याने डोक्‍याने हस्तांदोलन करण्याऐवजी डोक्‍याने धडक दिल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट याने केला होता.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड - पहिला डाव - ११५.१ षटकांत सर्वबाद ४०३ (मार्क स्टोनमन ५६, डेविड मलान १४०-२२७ चेंडू, १९ चौकार, १ षटकार, जॉनी बेअरस्टॉ ११९-२१५ चेंडू, १८ चौकार, स्टुअर्ट ब्रॉड १२-१ षटकार, मिचेल स्टार्क ४-९१, जॉश हेझलवूड ३-९२, पॅट कमिन्स २-८४, नेथन लायन १-७३). ऑस्ट्रेलिया - पहिला डाव - ६२ षटकांत ३ बाद २०३ (कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट २५, डेव्हिड वॉर्नर २२, उस्मान ख्वाजा ५०, स्टीव स्मिथ खेळत आहे ९२, शॉन मार्श खेळत आहे ७, ख्रिस वोक्‍स १-४२, क्रेग ओव्हर्टन २-४६)

loading image