esakal | आगामी वीस वर्षेही अशीच रोमांचित जावी - नेहरा
sakal

बोलून बातमी शोधा

आगामी वीस वर्षेही अशीच रोमांचित जावी - नेहरा

प्रशिक्षक, समालोचक बनण्याची जरूर इच्छा आहे; पण भारताच्या २०१९च्या विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत तरी यापैकी काही करण्याचा विचार नाही. पुढे काय करायचे ते नंतर पाहू.
- आशीष नेहरा

आगामी वीस वर्षेही अशीच रोमांचित जावी - नेहरा

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - तुम्ही वेगवान धावू शकत नसाल, तर किमान धावा, धावूही शकत नसाल, तर जॉगिंग करा आणि तेदेखील जमत नसेल, तर किमान चाला; पण आयुष्यात काही तरी करत राहा असा सल्ला दिला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या भारताचा वेगवान गोलंदाज आशीष नेहरा याने. त्याचवेळी त्याने वीस वर्षांची क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द जशी रोमांचित गेली, तरी आगामी वीस वर्षेदेखील अशीच रोमांचित जायला हवी, अशी भावनादेखील व्यक्त केली. 

वीस वर्षांच्या कारकिर्दीत १६३ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या नेहराच्या पायावर एक, दोन नाही; तर तब्बल बारा वेळा शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतरही त्याने आपला विश्‍वास गमावला नाही. अजूनही तंदुरुस्त टिकवून तो खेळत आहे. मात्र, निवृत्तीचा निर्णय झाल्यावर तो काहीसा भावुक झाला आणि त्याने कारकिर्दीमधील काही आठवणींना ठळकपणे उजाळा दिला.

जडेजाची विकेट महत्त्वपूर्ण 
रणजीच्या पहिल्या समान्यात अजय जडेजाची दोन्ही डावांत शून्यावर घेतलेली विकेट मला आजही महत्त्वाची वाटते. दिल्ली संघात त्या वेळी रमण लांबा, अजय शर्मा, अतुल वासन आणि रॉबिन सिंग (ज्युनि.) असे खेळाडू होते. रमण आणि अजय यांना बघूनच क्रिकेटमध्ये उतरलो. पहिल्याच रणजी सामन्यात त्यांच्यासोबत खेळायला मिळाल्याचा कोण आनंद होता. त्यातच तिसरा गोलंदाज म्हणून चेंडू मिळाल्यावर दोन्ही डावांत अजय जडेजाला शून्यावर बाद केले तो क्षण आजही आठवतो.

चॅपेलवर बाऊन्सर
नेहराने जॉन राईट यांच्या प्रशिक्षकपदाखाली सर्वोत्तम खेळ केला. ग्रेग चॅपेल यांच्या मार्गदर्शनाखाली तो अपयशी ठरला; पण गॅरी कर्स्टनच्या कालावधीत तो पुन्हा नावारूपाला आला. चॅपेल यांची नितीच काहीशी वेगळी होती. त्यांच्या साथीत फार खेळायला मिळाले नाही हे चांगलेच झाले. कारण, त्यांच्या कालावधीत भारतीय संघ अपयशी ठरणार, अशी मनात कुठेतरी खात्री होती.

कोहलीसाठी शास्त्री आदर्श
कर्स्टन चांगले प्रशिक्षक आहेत. धोनीबरोबर ते नेहमी नियोजनाविषयी चर्चा करायचे; पण कधीही त्यांनी धोनीने घेतलेल्या निर्णयात ढवळाढवळ केली नाही. वरिष्ठांपेक्षा चॅपेल कुमार संघासाठी चांगले प्रशिक्षक राहिले असते. कोहलीसाठी शास्त्रीच चांगले प्रशिक्षक आहेत. कारण कोहली सध्या अशा उंचीवर आहे की जेथे त्याला शिकवणीची नव्हे, तर सहायकाची गरज आहे. खेळाडूच्या यशा अपयशात शास्त्री त्याच्या बरोबर राहतात. 

loading image