मानधनवाढीच्या वादाने ऑस्ट्रेलियात गाठले टोक

पीटीआय
सोमवार, 3 जुलै 2017

सिडनी - कराराच्या मुद्द्यावरून क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेटपटू यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. वरिष्ठ खेळाडूंबरोबर ‘अ’ संघाने देखील बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या ‘अ’ संघाचा दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर वरिष्ठ संघाचे होणारे विविध दौरे अडचणीत आले आहेत. 

सिडनी - कराराच्या मुद्द्यावरून क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेटपटू यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. वरिष्ठ खेळाडूंबरोबर ‘अ’ संघाने देखील बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या ‘अ’ संघाचा दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर वरिष्ठ संघाचे होणारे विविध दौरे अडचणीत आले आहेत. 

‘अ’ संघातील खेळाडू नवा करार मिळाल्याशिवाय दौऱ्यावर जाणार नाहीत, असे ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू संघटनेने स्पष्ट केले आहे. या संघातील खेळाडूंची रविवारीच सिडनी येथे बैठक झाली. यामध्ये खेळाडूंनी शिबिरात दाखल होऊ; पण नवे करारपत्र मिळाल्याशिवाय दौऱ्यावर जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचे करार शुक्रवारीच संपुष्टात आले असून, एकूण २३० क्रिकेटपटू करारमुक्त राहिले आहेत. याबाबत वरिष्ठ खेळाडूंनी यापूर्वीच आपला बहिष्काराचा झेंडा उभारला आहे. यानंतरही ‘एसीए’ क्रिकेटपटूंना सुधारित करार मिळावेत यासाठी वाटाघाटी करण्यास तयार आहे. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलिया मानधनवाढ आणि महसुलातील हिस्सा न देण्यावर ठाम आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील क्रिकेटच धोक्‍यात आले आहे.

क्रिकेटपटूंच्या व्यवस्थापकांच्या मते या महिन्यातील ‘अ’ संघाचा दौरा होईलही, पण बांगलादेशाचा ऑगस्टमधील आणि ऑक्‍टोबरमधील भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका हे दोन्ही दौरे अडचणीत आले आहेत. क्रिकेटपटूंच्या या ठाम निर्णयामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. भारताविरुद्धच्या मालिकेचा कार्यक्रम अजून निश्‍चित झालेला नाही. पण, ‘अ’ संघ आणि बांगलादेश दौऱ्याचा कार्यक्रम तयार आहे. प्रसारण हक्काचाही निर्णय झाला आहे. या मालिका रद्द झाल्यास तो तोटा क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सहन करावा लागेल. 

या दोन मालिकांचे थेट प्रसारण झाले नाही तरी एकवेळ क्रिकेट ऑस्ट्रेलिया चालवून घेईल; पण त्यानंतर भारताविरुद्धच्या मालिकेचे थेट प्रसारण टाळणे त्यांना झेपणारे नाही. त्याबरोबर ॲशेस मालिकेपूर्वी भारत दौरा असणार आहे. जर, ॲशेस मालिकाच रद्द झाली, तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा तोटा सहन करावा लागेल. त्यामुळे आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाची कोंडी झाली असून, ते ‘एसीए’शी बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: sports news australia