‘ॲशेस’पुन्हा ऑस्ट्रेलियाकडे

वृत्तसंस्था
Tuesday, 19 December 2017

पर्थ (ऑस्ट्रेलिया) - पावसामुळे अखेरच्या दिवशी खेळ सुरू होण्यास झालेला उशीर आणि त्यानंतर  खेळपट्टीबाबत उद्‌भवलेल्या वादानंतरही ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा १ डाव ४१ धावांनी पराभव करून मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली. या विजयी आघाडीसह ऑस्ट्रेलियाने ‘ॲशेस’ करंडक परत मिळविण्याची कामगिरी केली. 

पर्थ (ऑस्ट्रेलिया) - पावसामुळे अखेरच्या दिवशी खेळ सुरू होण्यास झालेला उशीर आणि त्यानंतर  खेळपट्टीबाबत उद्‌भवलेल्या वादानंतरही ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा १ डाव ४१ धावांनी पराभव करून मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली. या विजयी आघाडीसह ऑस्ट्रेलियाने ‘ॲशेस’ करंडक परत मिळविण्याची कामगिरी केली. 

क्रिकेट विश्‍वातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होत असलेली गणना सिद्ध करताना द्विशतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचणारा स्टिव्ह स्मिथ आता ऑस्ट्रेलियाचा ‘ॲशेस’ करंडक जिंकणारा कर्णधारही ठरला. इंग्लंडचा लांबलेला डाव २१८ गुंडाळून ऑस्ट्रेलियाने विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने पाच गडी बाद केले. पर्थच्या ‘वॅका’ मैदानावरील हा अखेरचा कसोटी सामना होता. 

अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळविला असला, तरी अखेरचा दिवस अनेक कारणांनी गाजला. यात वॅकाची खेळपट्टी कळीचा मुद्दा ठरली. चौथ्या दिवशी सामना पावसामुळे लवकर थांबविण्यात आला होता. त्या वेळी इंग्लंडला विजयासाठी अजून १२७ धावांची आवश्‍यकता होती. पण, चौथ्या दिवशी कोसळलेल्या पावसामुळे खेळपट्टी खराब झाली होती. अखेरच्या  दिवसाचा खेळ होण्याची शक्‍यताच संपुष्टात आली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ सहाच गडी बाद करायचे होते. त्यामुळे वॅकाच्या कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी कोरडी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. कव्हर काढण्यात आली होती. त्यानंतरही ठराविक अंतराने पावसाची रिमझिम चालूच होती. त्यामुळे पंच खेळपट्टी जोवर चौथ्या दिवशी होती तशी होत नाही, तोवर खेळण्यास तयार नव्हते. उपाहारानंतरही खेळ सुरू होण्याची लक्षणे नव्हती. अखेर चहापानाच्या आसपास खेळाला सुरवात झाली आणि इंग्लंडने ठराविक अंतराने विकेट गमाविल्या.

खेळाला सुरवात झाल्यावर नाबाद फलंदाज जॉनी बेअरस्टॉ हेझलवूडच्या खाली राहिलेल्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. नंतर हेझलवूडने डेविड मलानचीही (५४) झुंज संपुष्टात आणली. मलान बाद झाला तेथेच इंग्लंडच्या आशा संपुष्टात आल्या. त्यानंतर खेळायला आलेल्या इंग्लंडच्या प्रत्येक फलंदाजाने दोन आकडी मजल मारली, पण त्यांना संघाचा पराभव वाचवता आला नाही.

संक्षिप्त धावफलक 
इंग्लंड ४०३ आणि २१८ (व्हिन्स ५५, मलान ५४, हेझलवूड ५-४८, पॅट कमिन्स २-५३, लियॉन २-४२) वि. वि. ऑस्ट्रेलिया ९ बाद ६६२ (घोषित).

‘ॲशेस’ विशेष
ऑस्ट्रेलियाचा दहाव्यांदा तिसऱ्या कसोटीतच मालिका विजय. यातील सात विजय मायदेशात
एकूण १९ वेळा ॲशेस मालिकेचा निर्णय पहिल्या तीन कसोटीतच लागला
२०००च्या दशकात झालेल्या दहा ॲशेस मालिकेत एकही कसोटी न गमावता मालिका जिंकण्याची सहावी वेळ. २०१३ मध्ये इंग्लंडने चौथी कसोटी जिंकून मालिका ३-०ने जिंकली. अन्य सर्व मालिका विजय ऑस्ट्रेलियाचे
या वेळी सुरू असलेली ७०वी ॲशेस मालिका यात ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ३३ मालिका विजय, इंग्लंडचे ३२, तर पाच अनिर्णित
इंग्लंडचा परदेशातील सातवा कसोटी पराभव. यापूर्वी १९९३ ते १९९४ मध्ये भारताविरुद्ध तीन, श्रीलंकेविरुद्ध एक आणि वेस्ट इंडीजविरुद्ध तीन
२०१६च्या सुरवातीपासून इंग्लंडची परदेशातील कसोटी कामगिरी १३ सामन्यात २ विजय, ९ पराभव
वॅका मैदानावर ॲशेस मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा सलग आठवा विजय. विजयाने त्यांनी दिला ‘वॅका’ला निरोप. ॲशेसच्या या मैदानावरील १३ सामन्यांत ९ विजय आणि एक पराभव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Australia vs England Ashes trophy