स्‍टीव्‍ह स्मिथ एका सामन्यासाठी निलंबित

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

आयसीसीची कारवाई
खेळ चालू असताना खेळ भावनेस तडा जाईल, असे कृत्य करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला
आयसीसीने आचारसंहितेच्या नियम २.२.१ अनुसार दोषी धरले. त्यानुसार त्याला शंभर टक्के आर्थिक दंड तसेच एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. त्याचबरोबर त्याला चार दोषांकही देण्यात आले. स्मिथने चौकशीदरम्यान आपल्यावरील आरोप कबूल केले.

केप टाऊन - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वादग्रस्त ठरलेल्या चेंडूची स्थिती बदलण्याच्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला दोषी धरले असून, त्याला एका कसोटी सामन्यासाठी निलंबित केले आहे. त्याचबरोबर त्याला शंभर टक्के दंडही सुनावण्यात आला आहे. मैदानावर चेंडूची स्थिती बदलताना सापडलेल्या बॅंक्रॉफ्टला ताकीद देऊन सोडण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात गमावलेले वर्चस्व मिळविण्यासाठी ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी उपाहारानंतरच्या सत्रात चेंडूची स्थिती बदलण्याचे वादग्रस्त कृत्य केले होते. स्‍मितथने दिवसअखेरीस या कृत्‍याची कबुलीही दिली होती. 

या सगळ्या प्रकरणाचे क्रिकेट वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे आयसीसी काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही तातडीने स्मिथला कर्णधार आणि डेव्हिड वॉर्नरला उपकर्णधारपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला. मैदानावर चेंडूची स्थिती बदलताना सापडलेल्या कॅमेरॉन बॅंक्रॉफ्टचे ताकिदीवर निभावले असले तरी, त्याला ७५ टक्के दंड करण्यात आला आहे. त्याचबरोबर तीन दोषांकही देण्यात आले आहेत. 

कोण काय म्हणाले...
चेंडूची स्थिती बदलण्याचे नियोजन कर्णधारानेच वरीष्ठ खेळाडूंसह करणे ही गंभीर बाब आहे. स्मिथच्या या कृतीमुळे क्रिकेटच्या सभ्यतेला तडा गेला आहे. तोच या प्रकरणातील मुख्य दोषी आहे. 
- डेव्ह रिचर्डसन, आयसीसीचे सीईओ

स्टीव स्मिथच्या आयपीएल सहभागाबाबत भारतीय क्रिकेट मंडळाच्या सूचनेची आम्हाला प्रतीक्षा आहे. त्यानुसारच आम्ही निर्णय घेणार आहोत. खेळाची नाचक्की करणाऱ्या कोणत्याही कृतीची आम्ही पाठराखण करणार नाही. त्यास कोणीही अपवाद नसेल.
- रणजित बरठाकूर, कार्यकारिणी प्रमुख, राजस्थान रॉयल्स.

आयसीसीची कारवाई
खेळ चालू असताना खेळ भावनेस तडा जाईल, असे कृत्य करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला
आयसीसीने आचारसंहितेच्या नियम २.२.१ अनुसार दोषी धरले. त्यानुसार त्याला शंभर टक्के आर्थिक दंड तसेच एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. त्याचबरोबर त्याला चार दोषांकही देण्यात आले. स्मिथने चौकशीदरम्यान आपल्यावरील आरोप कबूल केले.

अखिलाडूवृत्तीचे नियोजन
     तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया उपाहाराला अडचणीत आले होते. खेळपट्टी फारशी साथ देत नव्हती.
     उपाहाराला ड्रेसिंगरूमध्ये स्मिथ आणि अन्य वरिष्ठ खेळाडू एकत्र आले. त्यांनी चेंडू रिव्हर्स स्विंग होण्यासाठी चेंडूची  स्थिती बदलण्याचे ठरवले.  त्यांचे हे नियोजन सपोर्ट स्टाफला माहीत नव्हते.
     या खेळाडूंनी किटमधून पिवळ्या रंगाची पट्टी (सॅंडपेपर) घेतली. त्याचबरोबर मैदानात अशी एखादी खराब वस्तू सापडल्यास त्याने चेंडू खराब करण्याचे ठरले.
     या कृतीसाठी वरिष्ठ खेळाडूंनी बॅंक्रॉफ्टची निवड केली. कारण, ड्रेसिंगरूमधील चर्चेदरम्यान तो त्यांच्या शेजारीच होता. बॅंक्रॉफ्ट हा अगदीच नवखा खेळाडू आहे. तो क्षेत्ररक्षण करताना कुणाच्या नजरेत भरणार नाही, हा या मागचा विचार
     बॅंक्रॉफ्टने हे मान्य केले आणि मैदानात चेंडू हातात आल्यावर लगेच ट्राऊझरच्या खिशातून सॅंडपेपर काढून तो घासण्यास सुरवात केली; पण त्याची कृती पंचांच्या नजरेस पडली. आणि कॅमेऱ्यांतही ती टिपली गेली.

Web Title: sports news Ball tampering case Steve Smith suspended for one match