esakal | बांगलादेशाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय
sakal

बोलून बातमी शोधा

बांगलादेशाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर
या सामन्यातील पराभवाने आयसीसी कसोटी क्रमवारीतील ऑस्ट्रेलियाचे स्थान एकने घसरले असून, ते पाचव्या स्थानावर आले आहेत. दुसरा कसोटी सामना सोमवारी (ता. ४ सप्टेंबर) चितगांव येथे सुरू होईल.

बांगलादेशाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

sakal_logo
By
पीटीआय

ढाका - बांगलादेशाच्या फिरकी गोलंदाजीने अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा घात केला. अनुभवी शकीब अल हसनच्या भेदक फिरकी माऱ्याच्या जोरावर बांगलादेशाने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियावर २० धावांनी पहिला वहिला ऐतिहासिक विजय नोंदविला.

ऑस्ट्रेलियाची मदर डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ या उपकर्णधार-कर्णधारांच्या जोडीवरच होती. वॉर्नरने फिरकीवर हल्ला चढवत ११२ धावांची शतकी खेळी केली. स्मिथ बरोबर त्याने १३० धावांची भागीदारीदेखील केली; पण त्याचे प्रयत्न अन्य साथीदार अपयशी ठरल्याने फोल ठरले. बांगलादेशाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात ८४ धावांची खेळी करणारा आणि दोन्ही डावांत मिळून सामन्यात दहा गडी बाद करणारा अनुभवी शकीब अल हसन बांगलादेशाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. 

विजयासाठी २६५ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेरीसच दोन गडी गमावून १०९ धावा केल्या होत्या. आज सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने झटपट पाच गडी गमावले. त्यानंतर उपाहारानंतरच्या पहिल्याच चेंडूवर शकीबने ग्लेन मॅक्‍सवेलला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या उरल्या सुरल्या आशांवरही पाणी फेरले. शेवटी पॅट कमिन्स याने नाबाद ३३ धावांची खेळी केली. पण, ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे नाट्य रंगवण्यासाठी त्याची खेळीदेखील तोडकी पडली. ऑस्ट्रेलियाचा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला. 

शकीबने आपली ५०वी कसोटी संस्मरणीय ठरवताना दुसऱ्या डावात ८५ धावांत ५ गडी बाद केले. त्याने सामन्यात दहा गडी बाद करण्याची किमया साधली. तोच सामन्याचा मानकरी ठरला. या विजयाने उत्साहित झालेला बांगलादेशाचा कर्णधार मुशफिकूर रहिम म्हणाला, ‘‘संघातील प्रत्येक खेळाडूने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विशेषतः शकीब आणि तमिम इक्‍बाल यांची पहिल्या डावातील १५५ धावांची भागीदारी खऱ्या अर्थाने निर्णायक होती. त्यामुळे बांगलादेशाचा डाव भक्कम झाला.’’

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने बांगलादेशाच्या खेळाचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘‘पराभवाचे दुःख निश्‍चित आहे. पण, त्याही पेक्षा बांगलादेशाच्या खेळाडूंनी केलेला खेळ सर्वोत्तम होता. आम्ही पहिल्या डावात पिछाडीवर राहिलो तिथेच आम्ही अर्धा सामना गमावला होता. दुसऱ्या कसोटीत आम्हाला खेळ उंचवावा लागेल.’’

संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश २६० आणि २२१ वि. वि. ऑस्ट्रेलिया २१७ आणि २४४ (डेव्हिड वॉर्नर ११२, स्टिव्ह स्मिथ ३७, पॅट कमिन्स नाबाद ३३, शकीब अल हसन ५-८५, तैजुल इस्लाम ३-६०, मेहदी हसन मिराज २-८०)

दृष्टिक्षेपात कसोटी
    अर्धशतकी खेळी आणि सामन्यात दहा गडी बाद करण्याची कामगिरी एकापेक्षा अधिक वेळा करणारा शकीब क्रिकेट विश्‍वातील दुसरा अष्टपैलू,
    शकीबची अशी कामगिरी कसोटीत दुसऱ्यांदा, यापूर्वी पहिली कामगिरी झिंबाब्वेविरुद्ध. सर्वाधिक तीन वेळा अशी कामगिरी न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडलीची
    चौथ्या डावात वॉर्नर-स्मिथची शतकी भागीदारी ही आशियातील सर्वोत्तम. चौथ्या डावात आशियात ऑस्ट्रेलियाची केवळ चौथी शतकी भागीदारी
    बांगलादेशाचा १०१ कसोटीत दहावा विजय. विजय मिळविणारा ऑस्ट्रेलिया त्यांचा पाचवा प्रतिस्पर्धी. झिंबाब्वेवर पाच, विंडीजवर दोन, इंग्लंड आणि श्रीलंकेवर प्रत्येकी एक विजय
    क्रिकेट विश्‍वातील ५५३ कसोटीत २० किंवा त्यापेक्षा कमी धावांनी पराभूत होण्याची २५वी घटना. यात ऑस्ट्रेलियावर १४वेळा अशी नामुष्की
    कारकिर्दीमधील ५०व्या कसोटीत दहा गडी बाद करणारा शकीब पाचवा क्रिकेटपटू. यापूर्वी ट्रेव्हर बेली, रिचर्ड हॅडली, मुथय्या मुरलीधरन, हरभजन सिंग यांची अशी कामगिरी

loading image