‘बीबीसी’च्या शंभर प्रभावशाली महिलांमध्ये मिताली!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 February 2018

लंडन - भारतीय महिला कसोटी व वन-डे क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिला देदीप्यमान कारकिर्दीत आणखी एक बहुमान लाभला आहे. ‘बीबीसी’ने गेल्या वर्षातील शंभर प्रभावशाली महिलांमध्ये मितालीची निवड केली आहे. गेल्या वर्षी इंग्लंडमधील विश्वकरंडक स्पर्धेत मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत घोडदौड केली. ही कामगिरी महिला क्रिकेटमध्ये तसेच भारतीय क्रीडा क्षेत्रात प्रेरणादायी ठरली.

अंतिम फेरीत भारताचा इंग्लंडविरुद्ध पराभव झाला. बहुतांश वेळ वर्चस्व राखूनही मोक्‍याच्या क्षणी भारताची फलंदाजी ढेपाळली. त्यात मिताली अकारण धावचीत झाली आणि घसरण सुरू झाली. हा आपला अखेरचा विश्‍वकरंडक असेल, असे मितालीने स्पर्धेपूर्वी जाहीर केले होते; पण अलीकडेच तिने पुढील विश्‍वकरंडक खेळण्याचे संकेत दिले. तंदुरुस्त असल्यास खेळण्याचा मनोदय तिने व्यक्त केला.

या यादीत विविध क्षेत्रांत ठसा उमटविलेल्या महिलांचा समावेश आहे. आत दिल्लीच्या योगशिक्षीका इरा त्रिवेदी, तिहार तुरुंगातील मुलांना शिक्षण देणाऱ्या तुलिका किरण, बंगळूरच्या आदिती अवस्थी, अभिनेते नवाझुद्दीन सिद्दिकी यांच्या आई मेहरुन्निसा यांचाही समावेश आहे.

‘बीबीसी’ने म्हटले आहे की, आधुनिक युगात खेळापासून उद्योगापर्यंत विविध कलात्मक क्षेत्रांत महिला प्रतिभेचा जागतिक पातळीवर वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटला आहे. या महिलांच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही ही यादी तयार केली आहे. जगभरातून निवडलेल्या महिलांमध्ये भारतीय महिलांचाही समावेश आहे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात अथक कार्य करीत प्रेरणास्थान म्हणून लौकिक मिळविला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news bbc women one day cricket competition mitali raj