esakal | बीसीसीआयला आज आणखी एक घबाड मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI

बीसीसीआयला आज आणखी एक घबाड मिळणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - आयपीएलची सर्कस सुरू होण्यास काही दिवस असतानाच बीसीसीआय मोठी आर्थिक उलाढाल करणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क उद्या ई-लिलावाद्वारे वितरित होणार आहेत. क्रीडा क्षेत्रात ई-प्रणालीद्वारे अशा प्रकारची प्रथमच उलाढाल भारतात होत आहे.  

क्रिकेट विश्‍वात सर्वांत श्रीमंत असलेल्या बीसीसीआयचे आतापर्यंत सर्व लिलाव पारंपरिक पद्धतीने झाले होते; परंतु सध्या कारभाराची सूत्रे असलेल्या प्रशासन समितीने ई-लिलावाला प्राधान्य दिले. हा लिलाव २७ मार्चला होणार होता; परंतु प्रथमच होणाऱ्या या लिलावाच्या पद्धतीत काही अडचणी असल्यामुळे उद्याची तारीख निश्‍चित करण्यात आली. एप्रिल २०१८ ते मार्च २०२३ पर्यंतचे हक्क वितरित होतील.

दूरचित्रवाणी प्रसारण हक्क मिळवण्यासाठी स्टार इंडिया आणि सोनी नेटवर्क यांच्यातच मोठी चुरस असेल, या दोघांनीच लिलावाचे दस्तऐवज बीसीसीआयकडून घेतले आहेत. मात्र, हॉट स्टार हे स्टार इंडियाचा भाग असेल, तर डिजिटल हक्कांसाठी फेसबुक, गुगल, जिओ आणि युप टीव्ही यांच्यासह स्टार इंडियाच्या हॉटस्टार यांच्यामध्ये स्पर्धा असेल.

लिलावाची प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू होईल. या वेळी ई पद्धतीने बोली लावण्यात येईल. दुपारी २ वाजल्यापासून खऱ्या अर्थाने लिलावास सुरवात होईल. ऑनलाइन पद्धतीने आपापली किंमत या वेळी मांडली जाईल. प्रत्येक जण आपली बोली ऑनलाइन नोंदवणार असल्यामुळे पायाभूत किमतीपासून सुरवात केली जाईल. पुढील पाच वर्षांत भारतात साधारणतः १०२ सामने खेळविण्यात येणार आहेत आणि त्याची ४,१३४ कोटी रुपये पायाभूत किंमत असेल.

अशी असेल ई-पद्धत
सर्व पद्धत ऑनलाइन लाइव्ह असल्यामुळे सर्व इच्छुकांना कोण किती बोली लावतो, हे समजणार आहे; परंतु ही बोली कोणी लावली, त्याचे नाव उघड होणार नाही. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच त्याचे नाव जाहीर होईल. ई-लिलावासाठी एका तासाची मुदत असली तरी, या एका तासानंतर वाढीव बोली लागली तर कदाचित हा लिलाव ४ एप्रिलपर्यंत लांबण्याचीही शक्‍यता आहे.

कशी आहे किंमत
पहिल्या वर्षांसाठी एकत्रित पायाभूत किंमत प्रत्येक सामन्यासाठी ४३ कोटी आणि पुढील चार वर्षांसाठी ४० कोटी ठेवण्यात आली आहे. यामध्ये अनुक्रमे कमीत कमी २० कोटी (टीव्ही प्रसारण) आणि ५ कोटी (डिजिटल) कोटींपर्यंत वाढवण्याची मुभा देण्यात आली आहे.