esakal | बीसीसीआयने तयार केली ‘तंदुरुस्ती देखरेख प्रणाली’
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI

बीसीसीआयने तयार केली ‘तंदुरुस्ती देखरेख प्रणाली’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आपले खेळाडू तंदुरुस्त राहावे यासाठी वीस-पंचवीस नव्हे, तर तब्बल ५० खेळाडूंवर येणारा ताण त्यांना होणाऱ्या दुखापती यावर बीसीसीआय लक्ष ठेवणार आहे, त्याचा व्यवस्थित डेटा तयार करण्यात येणार आहे आणि याची सुरवात खेळाडूंना थकविणाऱ्या आयपीएलपासून होणार आहे. ‘तंदुरुस्ती देखरेख प्रणाली’ असे याचे नाव आहे.

आम्ही ५० खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा डेटा तयार करणार आहोत आणि यामध्ये वेतनश्रेणीचा करार केलेल्या २७ खेळाडूंचाही समावेश आहे. त्याच्या व्यतिरिक्त २३ खेळाडू आम्ही आयपीएलमधून निवडणार आहोत, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

पुढील आठवड्यात सुरू होणारी आयपीएल संपल्यानंतर काही दिवसांत भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मोठी मोहीम सुरू होत आहे आणि याची सुरवात इंग्लंड दौऱ्यापासून सुरू होईल, त्यानंतर २०१९ मध्ये इंग्लंडमध्येच होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंतचा हा टप्पा असेल. जे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करतील त्यांच्यावर पडणारा ताण याचे तंदुरुस्तीच्या  वेगवेगळ्या मापदंडातून मोजमाप केले जाईल.

आयपीएलमध्ये सरावावरही लक्ष
आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात गोलंदाज जास्तीत जास्त चार षटके गोलंदाजी करत असला तरी सरावाच्या वेळी तो किती चेंडू टाकतो यावर देखरख ठेवण्याची योजना बीसीसीआयने आखली आहे. यामध्ये करारबद्ध असलेल्या प्रमुख गोलंदाजांचा समावेश आहे. आगामी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हे प्रमुख वेगवान गोलंदाज जास्तीत जास्त तंदुरुस्त असावेत यासाठी हे प्रयत्न आहेत.