‘बीसीसीआय’चा हिस्सा अखेर वाढला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळास (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून अखेर ४० कोटी ५० लाख डॉलर इतका हिस्सा मिळणार आहे. आयसीसीच्या लंडन येथे सुरू असलेल्या वार्षिक परिषदेत आयसीसीने ‘बीसीसीआय’चा हिस्सा वाढविण्यास मंजुरी दिली. 

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळास (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून अखेर ४० कोटी ५० लाख डॉलर इतका हिस्सा मिळणार आहे. आयसीसीच्या लंडन येथे सुरू असलेल्या वार्षिक परिषदेत आयसीसीने ‘बीसीसीआय’चा हिस्सा वाढविण्यास मंजुरी दिली. 

आयसीसीच्या नव्या महसूल वाटपानुसार ‘बीसीसीआय’ला २९ कोटी ३० लाख डॉलर मिळणार होते. यानंतर ‘बीसीसीआय’ने अनेक आघाड्यांवर चर्चा करून आपला हिस्सा वाढविण्याची मागणी केली होती. त्या वेळेस आयसीसीचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांनी दहा कोटी डॉलर वाढविण्यास मंजुरी दिली होती. मात्र, आज अचानक आयसीसीने भारतीय क्रिकेट मंडळास आणखी ११ कोटी २० लाख वाढवून देण्याचा निर्णय घेतला.

या नव्या निर्णयानुसार भारताला पूर्वनियोजित रकमेपेक्षा २६ कोटी ६० लाख डॉलर अधिक मिळणार आहेत. ‘बीसीसीआय’नंतर सर्वाधिक १३ कोटी ९० लाख डॉलर इतकी रक्कम इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळास मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेश या अन्य संघटनांना प्रत्येकी १२ कोटी ८० लाख डॉलर मिळतील. झिंबाब्वेला ९ कोटी ४० लाख डॉलर मिळणार आहेत. 

‘बीसीसीआय’ने नियम आणि अटींवर हा निर्णय स्वीकारल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. महसूल वाटपाबाबत यापूर्वी झालेल्या मतदानात ‘बीसीसीआय’ला १-१३ असा पराभव पत्करावा लागला होता.

बीसीसीआयच्या एकूण महसूलातील ८६ टक्के वाटा हा पूर्ण सदस्यांना देण्यात आला असून, उर्वरित रक्कम सहयोगी सदस्यांमध्ये वाटली जाणार आहे.

परिषदेतील अन्य निर्णय
आयर्लंड, अफगाणिस्तानला कसोटी दर्जा
कसोटी खेळणारे आता बारा देश
द्विपक्षीय मालिकेत आयसीसी हस्तक्षेप करणार नाही
 अमेरिका क्रिकेट संघटनेचा मतदानाचा अधिकार काढून घेतला

Web Title: sports news bcci share increase