क्रिकेट प्रशिक्षक निवड तूर्तास ‘अनिर्णित’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

मुंबई - आम्हाला कोणतीही घाई नाही. कर्णधार विराट कोहली वेस्ट इंडीजवरून परतल्यानंतर त्याच्यासह काही संबंधितांशी चर्चा करू आणि त्यानंतरच भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड जाहीर करू, असे सल्लागार समितीचे सौरभ गांगुली यांनी जाहीर केले आणि दिवसभरातील घडामोडींनंतर प्रशिक्षकनिवडीच्या फुगलेल्या फुग्यातील हवा निघून गेली.

मुंबई - आम्हाला कोणतीही घाई नाही. कर्णधार विराट कोहली वेस्ट इंडीजवरून परतल्यानंतर त्याच्यासह काही संबंधितांशी चर्चा करू आणि त्यानंतरच भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड जाहीर करू, असे सल्लागार समितीचे सौरभ गांगुली यांनी जाहीर केले आणि दिवसभरातील घडामोडींनंतर प्रशिक्षकनिवडीच्या फुगलेल्या फुग्यातील हवा निघून गेली.

वेस्ट इंडीज दौऱ्यात काल झालेल्या टी-२० सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला; पण आजच्या दिवशी सर्वाधिक चर्चा पराभवापेक्षा प्रशिक्षक कोण होणार याचीच होती. सचिन तेंडुलकर - सौरभ गांगुली - व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची सल्लागार समिती आज इच्छुकांच्या मुलाखती घेणार होती. उद्या निवड जाहीर होणार, अशी सूत्रांची माहिती होती; परंतु आजच निवड जाहीर करू, असे गांगुलीने सूतोवाच केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि अपेक्षा ताणल्या गेल्या.

प्रत्यक्ष आणि स्काईपवरून मुलाखतींचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर बीसीसीआयने पत्रकार परिषद जाहीर केली. त्यामुळे आजच निवड जाहीर होण्याचा अंदाज प्रसिद्धिमाध्यमांनी बांधला होता; परंतु गांगुलीने, आम्हाला घाई नाही. काही दिवसांत संबंधितांशी चर्चा करून निवड जाहीर करू, असे सांगताच अपेक्षा उंचावणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. 

गांगुली, लक्ष्मण व सेहवाग
सचिन तेंडुलकर भारताबाहेर असल्यामुळे तो आजच्या बैठकीत प्रत्यक्षपणे सहभागी झाला नाही. ‘स्काईप’वरून तो गांगुली - लक्ष्मण यांच्याशी चर्चा करत होता. अर्ज केलेल्या इच्छुकांपैकी सहा जणांच्या मुलाखती होणार होत्या. प्रत्यक्षात मात्र व्यक्तिशः वीरेंद्र सेहवागच बीसीसीआयच्या मुख्यालयात उपस्थित राहिला. इतर पाचपैकी रवी शास्त्री, लालचंद राजपूत, पायबस व टॉम मूडी यांच्या मुलाखती स्काईपवरून झाल्या; तर फिल सिमन्स यांची मुलाखत काही कारणास्तव होऊ शकली नाही. 

विराट कोहलीचे कौतुक
प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रश्‍नांना सामोरे जाताना गांगुली यांनी विराट कोहलीचे कौतुक केले. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू असताना विराटने कोणाचेही नाव सुचवले नाही अथवा आमच्याशी संपर्कही साधला नाही. आम्हीच आता त्याच्याशी चर्चा करणार आहोत. कारण- प्रशिक्षक कसा विचार करणार आहेत किंवा त्याचे धोरण कसे असणार आहे, हे विराटलाही समजायला हवे, असे गांगुली म्हणाला. 

कुंबळे प्रकरणावर भाष्य नाही
अनिल कुंबळे प्रकरणावर गांगुलीने कोणतेही भाष्य करणे टाळले. तो अध्याय संपला आहे. आता आम्ही पुढच्या अध्यायाचा विचार करत आहोत, असे तो म्हणाला. एकदा का आम्ही प्रशिक्षकाची निवड केली की आमचाही कर्णधार - प्रशिक्षक नात्यामध्ये हस्तक्षेप असणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले.

निवड जाहीर करण्यापूर्वी आम्हाला कर्णधार या नात्याने विराट कोहलीशी चर्चा करणे आवश्‍यक आहे. कारण- जो कोणी प्रशिक्षक होईल, त्यांचे धोरण आणि कोहलीचेही विचार एकाच मार्गावर असणे गरजेचे आहे. त्यामुळे जो वाद काही दिवसांपूर्वी झाला, तो परत होणार नाही याची काळजी घेण्यावर आमचे एकमत झाले
- सौरभ गांगुली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket bcci