वरिष्ठांना न जमलेले युवा संघाने केले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 January 2018

ख्राईस्टचर्च - आगामी विश्‍वकरंडक युवा (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेपूर्वी सराव सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर १८९ धावांनी दणदणीत विजय मिळविला. दक्षिण आफ्रिकेत वरिष्ठ संघाला मानहानिकारक पराभव पत्करावा लागला असताना युवा संघाने आफ्रिकेप्रमाणेच वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर सरस कामगिरी केली.

भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ याने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. संथ सुरवात आणि मध्य फळी काहीशी कोलमडूनही भारताने ८ बाद ३२२ धावा केल्या. पृथ्वी आणि मनज्योत कालरा यांनी पहिल्या षटकात १२ धावा केल्या. त्यानंतर मात्र १०.४ षटकांत ५४ धावाच झाल्या. पृथ्वी १६ धावा काढून बाद झाला. दोन चेंडूंनंतर शुभम गीलला अखोना मन्याकाने पायचीत केले. अखोनाने मग कालरा यालासुद्धा ३१ धावांवर बाद केले. हिमांशू राणा-आर्यन जुयाल यांनी १३८ चेंडूंत तेवढ्याच धावांची भागीदारी रचली.

गोलंदाजीत बंगालच्या ईशान पोरेल याने चार विकेट टिपल्या. जुयाल शतकाची अपेक्षा असताना ८६ धावांवर बाद झाला. राणाने ६८ धावा केल्या. तळातून अभिषेक शर्मा (३५), अनुकूल रॉय (२८), कमलेश नागरकोटी (२६) यांनी वेगवान फलंदाजी केल्यामुळे भारताला सव्वातीनशेच्या आसपास जाता आले.

आफ्रिकेला जीन डू प्लेसी याने सर्वाधिक ५० धावा केल्या. सलामीवीर जिवेशन पिल्ले याने २९ धावा केल्या. या दोघांचा अपवाद वगळता इतरांनी निराशा केली. आफ्रिकेचा डाव ३८.३ षटकांत संपला. नागरकोटी (२-१५), शिवा सिंग (६-१-१९-२) व अभिषेक शर्मा (२-१६) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. डू प्लेसी याला शिवाने पायचीत केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket competition