डाव सोडण्याच्या निर्णयाचा खेद नाही - रुट

पीटीआय
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

लंडन - वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव सोडण्याचा आपल्याला खेद वाटत नाही. मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच तो निर्णय घेतला होता. दुसरा सामना गमाविल्यानंतरही मी तिसऱ्या कसोटीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच नेतृत्व करेन, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने व्यक्त केली.

लंडन - वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव सोडण्याचा आपल्याला खेद वाटत नाही. मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच तो निर्णय घेतला होता. दुसरा सामना गमाविल्यानंतरही मी तिसऱ्या कसोटीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच नेतृत्व करेन, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने व्यक्त केली.

शई होपच्या जिगरबाज शतकी खेळीने विंडीजने इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकण्याची कामगिरी केली. इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात गेल्या १७ वर्षांत प्रथमच इंग्लंडला विंडीजकडून पराभव घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागला. रुट म्हणाला, ‘‘मैदानाबाहेर बसून डाव सोडण्याचा निर्णय चुकीच्या वेळी घेतला हे बोलणे सोपे आहे. पण, माझ्या दृष्टीने तो योग्य निर्णय होता. मला त्याचा खेद वाटत नाही. आमच्या गोलंदाजांची पहिल्या कसोटीतील कामगिरी आणि त्यांची क्षमता लक्षात घेता विंडीजसमोर नक्कीच कठीण आव्हान होते. त्यांनी आम्हाला या कसोटीत वर्चस्व राखण्यापासून प्रत्येक वेळी दूर ठेवले. आम्ही त्यांच्यावर दडपणही राखू शकलो नाही, हे आमच्या पराभवाचे मुख्य कारण आहे.’’

आव्हानाचा पाठलाग करताना आम्ही विंडीजचे दोन फलंदाज झटपट बाद केले होते. त्यानंतरही आम्ही त्यांच्यावर दडपण ठेवू शकलो  नाही, हे मान्य करून रुट म्हणाला, ‘‘ब्रॉड, अँडरसन यांच्यासारखे गोलंदाज असताना आम्हाला विजय शक्‍य होता. कसोटीत धोका पत्करण्याची गरज असते. विंडीजच्या खेळाडूंनी तो पत्करला. आमचे गोलंदाज तिसऱ्या कसोटीत कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करतील.’’

विश्‍वासाचा विजय - होल्डर
विजयी वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार जेसन होल्डर याने खेळाडूंवर दाखवलेल्या विश्‍वासाचा विजय, असे या कामगिरीचे वर्णन केले. तो म्हणाला, ‘‘माझा या खेळाडूंवर नेहमीच विश्‍वास होता. आम्ही एकत्रित काही सनसनाटी निकाल नोंदवले आहेत. मी सहकाऱ्यांना ‘स्वतःवर विश्‍वास ठेवा’ असा संदेश पाठवला होता. याचा सकारात्मक परिणाम झाला. खेळाडूंवर दाखवलेला विश्‍वास त्यांनी सार्थ ठरवला. अर्थात अजूनही आम्हाला सुधारणा करण्यासाठी भरपूर वाव आहे. समोर येणारी संधी साध्य करण्याचा आम्ही प्रयत्न करायला हवा. कामगिरीत सातत्य दाखवायला हवे.’’

पहिली कसोटी हरल्यानंतर पराभूत संघाच्या कामगिरीत झालेला इतका मोठा बदल कधी पाहिला नव्हता. त्यांच्या खेळाडूंनी दाखवलेली परिपक्वता कमालीची होती. आव्हानाचा इतका संयमी पाठलाग त्यांच्याकडून अपेक्षित नव्हता. 
- मायकेल वॉन, इंग्लंडचा माजी कर्णधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket England captain Joe Root