लुईसचा भारताला शतकी तडाखा

पीटीआय
मंगळवार, 11 जुलै 2017

किंग्जस्टन (जमैका) - डावखुरा घणाघाती फलंदाज एविन लुईसच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर विश्‍वविजेत्या वेस्ट इंडीजने एकमेव टी-२० सामन्यात भारतावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळविला. लुईसच्या तडाख्यासमोर टी-२० मधील ‘आद्य फटकेबाज’ ख्रिस गेल याला प्रेक्षकाची भूमिका पत्करणे भाग पडले.

किंग्जस्टन (जमैका) - डावखुरा घणाघाती फलंदाज एविन लुईसच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर विश्‍वविजेत्या वेस्ट इंडीजने एकमेव टी-२० सामन्यात भारतावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळविला. लुईसच्या तडाख्यासमोर टी-२० मधील ‘आद्य फटकेबाज’ ख्रिस गेल याला प्रेक्षकाची भूमिका पत्करणे भाग पडले.

विंडीजसमोर १९१ धावांचे संघर्षपूर्ण आव्हान होते. लुईसने ते किरकोळ ठरविले. त्याने १२ षटकार खेचले, तर चार चेंडू सीमापार केले. त्यामुळे विंडीजला नऊ चेंडू राखून विजय मिळविता आला. खेळपट्टी फटकेबाजीला अनुकूल असल्यामुळे भारताच्या गोलंदाजांसमोर कडवे आव्हान होते; पण त्यांना लुईसचा धडाका रोखता आला नाही. लुईसने गेल्या वर्षी फ्लोरिडातील टी-२० सामन्यात ४९ चेंडूंत शतक फटकाविले होते. लुईससमोर गेलला फारशी संधी मिळू शकली नाही. ८२ धावांच्या सलामीत गेल केवळ १८ धावांची अल्प भर घालू शकला.

लुईसने लाँग-ऑफ ते लाँग-ऑन या पट्ट्यात फटकेबाजी केली. त्याला शमी आणि कार्तिक यांच्याकडून जीवदाने मिळाली; पण त्यामुळे त्याच्या खेळीचे मोल कमी होणार नाही. भारताच्या फिरकी दुकलीतील जडेजाला पाच, तर अश्‍विनला चार षटकारांचे मोल द्यावे लागले. शमीच्या गोलंदाजीवर सहा चौकार आणि दोन षटकार गेले.

कुलदीपने गेलला बाद करून पहिले यश मिळवून दिले. त्याचा लुईसवर काहीही परिणाम झाला नाही. लुईसने अनुभवी सॅम्युएल्सच्या साथीत ११२ धावांची नाबाद भागीदारी रचली. अनुभवी सॅम्युएल्स यालाही दुय्यम भूमिका पार पाडावी लागली. लुईसने जडेजाला षटकार खेचत विजयावर धडाक्‍यात शिक्कामोर्तब केले.

लुईसचा धडाका
एविन लुईसचे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील दुसरे शतक
अशी कामगिरी करणारा तिसराच फलंदाज
ख्रिस गेल आणि ब्रॅंडन मॅक्‌लम यांच्या पंक्तीत विराजमान
लुईसचा टी-२० मध्ये विंडीजतर्फे उच्चांक
गेलचा ११७ धावांचा उच्चांक मागे टाकला
टी-२० सामन्यात पाठलाग करणाऱ्या संघातर्फे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा उच्चांकही लुईसच्या नावावर

गेल्या काही वन-डे सामन्यांत माझी कामगिरी चांगली झाली नव्हती, पण मी स्वतःच्या क्षमतेवरील विश्‍वास कधीही कमी होऊ दिला नाही. हा सामना चांगला ठरला. दर्जेदार गोलंदाजांचा सामना करताना भारतासारख्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध शतक काढल्याचा आनंद वाटतो. गेलने गोलंदाजांवर तोफ डागल्याने माझे काम सोपे झाले. त्याच्याबरोबर फलंदाजी करायला मिळणे महत्त्वाचे ठरते. विंडीजसाठी यापुढेही सर्वोत्तम कामगिरी करण्याची आशा आहे.
- एविन लुईस 

क्रमवारीतही फटका
विंडीजविरुद्ध एकमेव टी-२० मधील पराभवाचा भारताला जागतिक क्रमवारीतही फटका बसला. भारताची चारवरून पाचव्या क्रमांकावर घसरण झाली, तर विंडीजने पाचवरून एक क्रमांक प्रगती केली. भारताचे रेटिंग ११५, तर विंडीजचे ११७ आहे. न्यूझीलंडने अव्वल क्रमांक कायम राखला आहे. इंग्लंडचा दुसरा, तर पाकचा तिसरा क्रमांक आहे. लुईसने फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. गोलंदाजांमध्ये भारताच्या जसप्रीत बूमराहने दुसरा क्रमांक कायम राखला आहे.

विंडीज कर्णधाराची ‘ऑफर’
विंडीजचा कर्णधार कार्लेस ब्राथवेट याने आपल्या संघासमोर ‘हटके ऑफर’ ठेवली होती. पत्रकार परिषदेत त्यानेच हे सांगितले तो म्हणाला की, ‘आमच्या फलंदाजांनी मैदानावर उतरून नैसर्गिक कौशल्य प्रदर्शित करावे, अशी अपेक्षा होती. मी कर्णधार म्हणून माझ्यातर्फे ‘ऑफर’ ठेवली. जो कुणी अर्धशतक फटकावेल त्याला सामना मानधनाची माझ्या वाट्यातील निम्मी रक्कम मिळेल असे मी सांगितले. आम्हाला प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणायचे होते. एविनने सुंदर फलंदाजी केली. भुवनेश्‍वर कुमार अंतिम टप्प्यात कशी गोलंदाजी करतो हे आम्हाला ठाऊक होते. त्याने सुरवातीला काही षटके टाकावी असे आम्हाला वाटत होते. सुदैवाने तसे झाले.’

संक्षिप्त धावफलक ः भारत २० षटकांत ६ बाद १९० (विराट कोहली ३९, शिखर धवन २३, रिषभ पंत ३८, दिनेश कार्तिक ४८, रवींद्र जडेजा नाबाद १३, आर. अश्‍विन नाबाद ११, जेर्मी टेलर २-३१, केस्रिक विल्यम्स २-४२) पराभूत वि वेस्ट इंडीज ः १८.३ षटकांत १ बाद १९४ (ख्रिस गेल १८-२० चेंडू १, चौकार, १ षटकार, एविन लुईस नाबाद १२५-६२ चेंडू, ६ चौकार, १२ षटकार, २०१.६१ स्ट्राईक रेट, मार्लन सॅम्युएल्स नाबाद ३६-२९ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, अश्‍विन ४-०-३९-०, महंमद शमी ३-०-४६-०, कुलदीप यादव ४-०-३४-१, जडेजा ३.३-०-४१-०)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket evin lewis