esakal | सलामीलाच भारतीयांनी ताकद दाखवली
sakal

बोलून बातमी शोधा

सलामीलाच भारतीयांनी ताकद दाखवली

ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत खेळाचा पुरेपूर आनंद देणारी होती; तसेच आव्हानात्मकही  होती. फलंदाजी तसेच गोलंदाजीही चांगली झाली. सर्वोत्तम सांघिक कामगिरीमुळे अपेक्षित सुरवात झाली.
- पृथ्वी शॉ, भारतीय कर्णधार

सलामीलाच भारतीयांनी ताकद दाखवली

sakal_logo
By
पीटीआय

बेओव्हल, तौरांगा (न्यूझीलंड) - भारतीय कर्णधार पृथ्वी शॉ याने नाणेफेक जिंकल्यापासून जणू ऑस्ट्रेलियाचा प्रतिकार सुरू झाला तो शेवटपर्यंत संपला नाही. राहुल द्रविडचे मार्गदर्शन लाभणाऱ्या भारतीय संघाने कांगारूंना १०० धावांनी पराजित केले आणि या स्पर्धेतील विजेतेपदाचे आपण प्रबळ दावेदार आहोत, हेच जणू अधोरेखित केले.

भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत फलंदाजांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचल्यावर अखेरच्या षटकात धावगतीस चांगला वेग दिला. भेदक मध्यमगती मारा, अचूक फिरकीस क्षेत्ररक्षकांची साथ लाभली. त्यामुळे ऑस्ट्रेलियास शरणागती पत्करण्यावाचून पर्यायच राहिला नाही.

पृथ्वी शॉ चेंडू छान प्लेस करीत होता. त्याने डावातील पहिला षटकार मारल्यावर त्याचा झेल घेतला गेला; पण तो चेंडू नो बॉल ठरला. विल सदरलॅंडलाच षटकार मारत तो नव्वदीत गेला; पण त्याचे शतक हुकले. त्याला मनजोत कालराची तोडीस तोड साथ लाभली. त्यांनी १८० धावा करीत विश्‍वकरंडकातील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केला. उपकर्णधार शुभम गिलने धावगती कमी होऊ दिली नाही, तर अभिषेक शर्माने अखेरच्या टप्प्यात ८ चेंडूंत २३ धावा केल्या.  

ऑस्ट्रेलिया कर्णधार जेसन सॅंगा याचे भारतीय धावांचा ओघ रोखण्याचे सर्व प्रयत्न फसले. स्टीव वॉचा मुलगा ऑस्टिनने षटकामागे १० धावा दिल्या, दोन झेल सुटले. विश्‍वकरंडक युवा स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या भारताकडून नोंदली गेली. 

शिवम मावी आणि ईशान पॉरेल यांनी ऑस्ट्रेलियास आक्रमक सुरवातीपासून रोखले. या दोघांसह पहिला ब्रेक थ्रू देणाऱ्या कमलेश नागरकोटीचा ताशी १४५ किमीचा वेग लक्षवेधक होता. याच मावीच्या वेगाने जोनाथन मार्लोची घेतलेली विकेट भारतीय गोलंदाजांची ताकद दाखवणारी होती. 

संक्षिप्त धावफलक 
भारत ः ७ बाद ३२८ (पृथ्वी शॉ ९४ - १०० चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकार, मनोज कालरा ८६ - ९९ चेंडूंत १२ चौकार व १ षटकार, शुभम गिल ६३ - ५४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार, अभिषेक शर्मा २३ - ८ चेंडूंत २ चौकार व २ षटकार, कमलेश नागरकोटी नाबाद ११, जॅक एडवर्डस ४-६५)  ऑस्ट्रेलिया ः ४२.५ षटकांत सर्वबाद २२८ (जॅक एडवर्डस - ७३ - ९० चेंडूंत ६ चौकार व १ षटकार, मॅक्‍स ब्रायंट २९, जोनाथन मार्लो ३८, बॅक्‍स्टर हॉल्ट ३९, शिवम मावी ३-४५, कमलेश नागरकोटी ३-२९).


सामन्यास चांगली गर्दी होती. टीव्ही प्रक्षेपणही होते. स्पर्धेतील पहिलीच लढत होती. या सर्वांचे दडपण आले; पण यामुळे हरलो, असे म्हणता येणार नाही. निर्माण केलेल्या संधीचा फायदा उठवू शकलो नाही.
- जॅसन सांघा, ऑस्ट्रेलिया कर्णधार

loading image