मानधन वाढणार; सामने घटणार

पीटीआय
Friday, 1 December 2017

या महत्त्वाच्या विषयांवर चर्चेसाठी घेण्यात आलेला पुढाकार निर्णायक आहे. खेळाच्या हितासाठी आम्ही समान पातळीवर आलो आहोत. त्यानुसार मानधन आणि वेळापत्रकाविषयीचे धोरण ठरेल.
- विनोद राय

नवी दिल्ली - मानधनात वाढ आणि वेळापत्रकात कपात अशा विराट कोहलीच्या दोन्ही मागण्यांविषयी प्रशासकीय समितीने सहमती दर्शविली आहे, तर समितीच्या भूमिकेविषयी क्रिकेटपटूसुद्धा आनंदी आहेत. 

विराट, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रशासकीय समितीचे सदस्य विनोद राय, डायना एडल्जी आणि बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांची गुरुवारी भेट घेतली. ही बैठक सुमारे दोन तास चालली.

राय यांनी सांगितले, की सामन्यांची संख्या, नियोजित वेळापत्रक (फ्यूचर टूर प्रोग्राम-एफटीपी), भरपाईचे पॅकेज अशा खेळाडूंशी थेट संबंधित असलेल्या मुद्यांवर विस्तृत चर्चा झाली. याविषयी सादरीकरण झाले. आम्ही एफटीपीविषयी खेळाडूंना कल्पना दिली. आम्ही त्यांच्या सर्व सूचना जाणू घेतल्या. आम्ही धोरणात त्याचा अंतर्भाव करू.

मानधनाविषयी सहमती
मानधनवाढीसाठी प्रशासकीय समिती एक आराखडा तयार करीत आहे. त्याविषयी माहिती दिली असता विराट आणि धोनीने सहमती दर्शविली असे राय म्हणाले. आता केवळ आकडे भरण्याचा प्रश्न आहे. आम्ही मंडळाचे उत्पन्न आणि प्रत्येक खेळाडूला मिळणारे मानधन यांत तफावत ठेवणार नाही.

कसोटी खेळणारे आणि झटपट क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी वेगवेगळे स्वरूप असणार का, असे विचारले असता, राय यांनी या मुद्यावर चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.

खेळाडू आनंदीच
एकतर्फी निर्णय घेऊन त्याविषयी माहिती देण्याऐवजी बीसीसीआयचे प्रतिनिधी चर्चा करीत असल्याबद्दल खेळाडू आनंदी असल्याचे राय यांनी आवर्जून नमूद केले. सर्व विषयांवरील चर्चा फलदायी ठरली. विराट-धोनी यांचा प्रतिसाद फार सकारात्मक होता, कारण कुणीतरी प्रथमच त्यांच्या संवाद साधत होते, असे भाष्य त्यांनी केले.

इंग्लंडसाठी नियोजन
पुढील वर्षी जुलै ते सप्टेंबरदरम्यान भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच कसोटींची मालिका खेळेल. या दौऱ्यासाठी सखोल नियोजन केले जाईल. हवामानशी जुळवून घेण्याकरिता भारतीय संघ दोन आठवडे आधी दाखल होईल. दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ नसल्याची तक्रार विराटने केली होती. त्याची प्रशाकीय समितीने तातडीने दखल घेतली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket india BCCI Committee Vinod Rai