esakal | भारत-न्यूझीलंड मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज
sakal

बोलून बातमी शोधा

भारत-न्यूझीलंड मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज

भारत-न्यूझीलंड मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज

sakal_logo
By
सुनंदन लेले

पुणे - पहिल्या एकदिवसीय सामन्यात २८० धावांचे आव्हान उभे करूनही न्यूझीलंडच्या संयमी खेळाने भारताची विजयाची मालिका खंडित झाली होती. त्यामुळे भारताच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी येण्याच्या प्रयत्नांनाही खीळ बसली होती. त्यामुळे आता या सगळ्या दडपणाखाली उद्या पुण्यात गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर भारतीय संघ न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरा जाईल. पहिल्या सामन्यातील न्यूझीलंडचा प्रतिकार लक्षात घेता दुसऱ्या सामन्याची दोरी फलंदाजांपेक्षा गोलंदाजांच्या हाती राहणार यात शंका नाही. 

नाणेफेक जिंकल्यावर विराट कोहली बहुतांशी वेळेला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. कारण धावांचा पाठलाग करणे त्याला पसंत आहे. मुंबई सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना त्रास झाला. कारण वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी काहीशी संथ होती. न्यूझीलंड फलंदाजीच्या वेळी खेळपट्टी स्थिरावली आणि चेंडू बॅटवर यायला लागला. टॉम लॅथम आणि रॉस टेलरने द्विशतकी भागीदारी रचून संघाला विजयी केले. पुण्यात संध्याकाळी हवा गार होऊन मैदानावर दव पडतो याचा विचार करता नाणेफेक जिंकणारा कर्णधार या वेळी प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेईल, असे वाटते. 

दोन्ही संघांची फलंदाजी मजबूत असल्याने गोलंदाजांवर अतिरिक्त जबाबदारी आहे. भरपूर रोलिंग केलेल्या चांगल्या खेळपट्टीवर फलंदाजांना रोखणे गोलंदाजांना कठीण जात आहे. अचूक गोलंदाजी करून दडपण वाढवून फलंदाजाला चूक करायला भाग पाडून बाद करता आले तरच यशाचा मार्ग दिसतो, हे गोलंदाज जाणतात. तसेच आजकालच्या क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज जास्त करून चेंडू कमी गतीने टाकण्याची कला बाळगून असतात. पहिल्या सामन्यात ट्रेंट बोल्टने तेच कसब दाखवले. दुसरा सामना जिंकून पुनरागमन करायचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर आहे. कारण न्यूझीलंडचा संघ खरोखरच चांगला आहे, अशी कबुली भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी दिली. 

भारतीय फलंदाजीची मधली फळी अजून स्थिरावलेली नाही. मनीष पांडेला दिली गेलेली संधी जास्त रंग भरून गेली नाही म्हणून स्थानिक क्रिकेटमधे पोत्याने धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकला पूर्ण फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात लोकल हिरो केदार जाधवने अफलातून शतकी खेळी केली होती, जी केदारला मोठी प्रेरणा देत असणार. केदार जाधवने संघ व्यवस्थापनाच्या अपेक्षांना सकारात्मक साद दिली, तर मधल्या फळीची समस्या दूर होऊ शकते.  

दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघात फार बदल केले जाण्याची शक्‍यता कमी आहे. गहुंजे मैदानावरची खेळपट्टी फलंदाजीकरता चांगली मानली जाते. दोन्ही संघांनी सरावाला यायचे बंधन खेळाडूंवर टाकले नव्हते, म्हणून मोजक्‍या खेळाडूंनी सराव केला. दिवाळीची सुटी संपून काम चालू झाल्यावर बुधवारी सामना होत असल्याने सर्व तिकिटे अजून विकली गेली नसल्याचे समजले. तरीही एकदिवसीय सामन्याचा उत्साह बुधवारी मैदानात दिसून येईल हे नक्की.

loading image