खेळपट्टीचा अंदाज चुकला

Sunday, 14 January 2018

सेंच्युरियन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांचा सेंच्युरियनच्या खेळपट्टीचा अंदाज साफ चुकला. चहापानापर्यंत पहिल्या दिवसाच्या खेळावर फलंदाजांचे राज्य राहिले होते. कडक ऊन आणि फलंदाजीला पोषक विकेटवर भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली होती. चहापानाच्या २ बाद १८२ धावसंख्येवरून यजमान संघ वर्चस्व गाजवणार असे वाटत असताना खेळाचे चित्र पालटले. चार फलंदाजांना बाद करून भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. पहिल्या दिवशी खेळ संपताना दक्षिण आफ्रिकेने ६ बाद २६९ धावा उभारल्या.

सेंच्युरियन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांचा सेंच्युरियनच्या खेळपट्टीचा अंदाज साफ चुकला. चहापानापर्यंत पहिल्या दिवसाच्या खेळावर फलंदाजांचे राज्य राहिले होते. कडक ऊन आणि फलंदाजीला पोषक विकेटवर भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली होती. चहापानाच्या २ बाद १८२ धावसंख्येवरून यजमान संघ वर्चस्व गाजवणार असे वाटत असताना खेळाचे चित्र पालटले. चार फलंदाजांना बाद करून भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. पहिल्या दिवशी खेळ संपताना दक्षिण आफ्रिकेने ६ बाद २६९ धावा उभारल्या.

सलामीचा फलंदाज मार्करमने ९४ आणि आमलाने ८२ धावा करून मुख्य कामगिरी बजावली, तर भारताकडून अश्‍विनने ३ फलंदाजांना बाद केले. ज्या विकेटकडून जोरदार उसळीची अपेक्षा होती, त्यावर नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेणार हे उघड होते. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने लागोपाठ दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून तेच केले. भारतीय संघात तीन बदल केले गेले. काहीशा जखमी भुवनेश्‍वर कुमार आणि वृद्धिमान सहाच्या जागी ईशांत शर्मा आणि पार्थिव पटेल आले. शिखर धवनच्या जागी के. एल. राहुलला संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेने डेल स्टेनची जागा स्थानिक गोलंदाज लुंगी एन्गिडीला दिली.

खेळ चालू झाल्यावर पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळात समजून चुकले, की अपेक्षित वेग किंवा उसळी गोलंदाजांना मिळत नाहीये. विराट कोहलीने बुमरा आणि महंमद शमी यांना नवा चेंडू दिला. नंतर ईशांत शर्मा आणि हार्दिक पटेलला मारा करायची संधी दिली. एडियन मार्करम आरामात फलंदाजी करत असताना डीन एल्गर चाचपडत खेळत होता. सुरवातीला विकेट जाऊ न देण्याच्या इराद्याने फलंदाज मैदानात उतरल्याने उपाहारापर्यंत धावा जास्त जमा झाल्या नाहीत. मार्करमने अर्धशतकी मजल मारली आणि दोघे सलामीचे फलंदाज उपाहाराला नाबाद परतले. भारतीय गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकन एक एक फलंदाजाला बाद करायला कष्ट करावे लागणार हे एव्हाना समजले होते.

उपाहारानंतर अश्‍विनने एल्गरला बाद केले तेव्हा विजयने मजेदार झेल पकडला. मार्करमला क्रिकेट जाणकार ‘लंबी रेस का घोडा’ का म्हणतात हे समजले. मार्करम सर्व भारतीय गोलंदाजांना सहजी तोंड देत नव्वदीत कधी पोचला समजलेच नाही. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या मार्करमला अश्‍विननेच बाद केले. काहीसा पुढे पडलेल्या चेंडूवर मार्करम स्क्वेअरकट मारताना पार्थिवकडे झेल देऊन गेला. आमलाचा ३० धावांवर पार्थिवने कठीण झेल सोडला.

चहापानानंतर ईशांतचा चेंडू फटकावताना डिव्हिलियर्सने आपल्याच बॅटने स्टंपवर ओढून घेतला. हशिम आमलाला मिळालेले जिवदान महागात पडले. कडक उन्हाने थकलेल्या गोलंदाजांवर आमलाने हल्ला चढवला. सहज सुंदर फलंदाजी करणारा शतक ठोकणार असे वाटत असताना हार्दिक पंड्याने अफलातून क्षेत्ररक्षण करताना आमलाला धावबाद केले. पुढच्याच षटकात अश्‍विनने क्विंटन डिकॉकला शून्यावर बाद केले. भारतीय संघात अचानक चैतन्य आले. फिलॅंडर नसलेली धाव पळताना धावबाद झाला, ते थेट पळत जाऊन समोर डु प्लेसिस जवळ उभा राहून. 

पहिल्या दिवशीचा खेळ संपताना डु प्लेसिसने नाबाद २४ धावा करून संघाची धावसंख्या ६ बाद २६९ वर नेऊन ठेवली.   

धावफलक
दक्षिण आफ्रिका ः पहिला डाव ः
डीन एल्गर झे. विजय गो. अश्‍विन ३१-८३ चेंडू, ४ चौकार, एडियन मार्करम झे. पार्थिव गो. अश्‍विन ९४-१५० चेंडू, १५ चौकार, हशीम अमला धावचीत (पंड्या) ८२-१५३ चेंडू, १४ चौकार, एबी डिव्हिलियर्स त्रि. गो. इशांत २०-४८ चेंडू, २ चौकार, फाफ डू प्लेसीस खेळत आहे २४-७७ चेंडू, ३ चौकार, क्विंटन डीकॉक झे. विराट गो. अश्‍विन ०, व्हरनॉन फिलॅंडर धावचीत (पटेल-पंड्या) ०, केशव महाराज खेळत आहे १०-२३ चेंडू, २ चौकार, अवांतर ८, एकूण ९० षटकांत ६ बाद २६९. बाद क्रम ः १-८५, २-१४८, ३-१९९, ४-२४६, ५-२५०, ६-२५१. गोलंदाजी ः जसप्रीत बुमराह १८-४-५७-०, महंमद शमी ११-२-४६-०, इशांत शर्मा १६-३-३२-१, हार्दिक पंड्या १४-४-३७-०, आर. अश्‍विन ३१-८-९०-३.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket india Pitch