भारताचा आणखी एक मालिका विजय

वृत्तसंस्था
Monday, 18 December 2017

थोडक्‍यात विजय
भारताचा सलग आठवा मालिका विजय
ऑस्ट्रेलियाच्या २००० मधील आणि वेस्ट इंडीजच्या 
१९८० मधील कामगिरीची बरोबरी
धवनच्या ९५ डावांत एकदिवसीय कारकिर्दीत ४ हजार धावा
श्रीलंकेचे अखेरचे सात फलंदाज ५५ धावांची भर घालू शकले
उपुल थरंगाच्या यंदाच्या मोसमात एकदिवसीय सामन्यातील हजार धावा. यावर्षी विराट  कोहली, रोहित शर्मानंतर अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज.

विशाखापट्टणम - कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या अचूक फिरकी गोलंदाजीनंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिका २-१ अशी जिंकली. भारताने सलग आठवा मालिका विजय नोंदवला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला ४४.५ षटकांत २१५ धावांत रोखल्यानंतर भारताने ३२.१ षटकांत २ बाद २१९ धावा करून विजय मिळविला. शिखर धवनने नाबाद १००, तर श्रेयस अय्यरने ६५ धावांचे योगदान दिले. 

विजयासाठी २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरवातीलाच धक्का बसला होता. आधीच्या सामन्यातील द्विशतकवीर रोहित शर्माचा (७) धनंजयने त्रिफळा उडवला. त्यानंतर एकत्र आलेल्या धवन-अय्यर जोडीने सामन्याचे चित्र पालटवले. अय्यरने सुरवातीपासून आक्रमक धोरण घेत श्रीलंकेच्या गोलंदाजांना निराश केले. अय्यरच्या बरोबरीने धवननेही नजर बसल्यावर आक्रमक खेळ केल्याने श्रीलंकेला सामना आपल्या हातून कधी गेला हेच समजले नाही. दुसऱ्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी करून या जोडीने भारताच्या विजयाचा पाया रचला. अय्यर बाद झाल्यावर दिनेश कार्तिकने धवनला साथ दिली. धवनने शतक साजरे केल्यानंतर कार्तिकने विजयी चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

त्यापूर्वी श्रीलंकेच्या डावाला उपूल थरंगा आणि समरविक्रमा यांनी चांगली सुरवात करून दिली होती; मात्र कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या फिरकीसमोर त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि त्यांचा डाव ५० षटकेही टिकू शकला नाही. सलामीला खेळणाऱ्या थरंगाने ८२ चेंडूत ९५ धावा करताना आपले मनसुबे स्पष्ट केले होते. हार्दिक पंड्याच्या एका षटकांत तर त्याने सलग पाच चौकार लगावले. थरंगा खेळपट्टीवर असताना श्रीलंकेला तीनशे धावांची आशा होती. थरंगा आणि समरविक्रमा जोडीने षटकामागे ६.४२ धावांची गती राखताना १२१ धावांची भागीदारी केली; पण कुलदीपच्या फिरक घेतलेल्या चेंडूवर थरंगा धावबाद झाला आणि तेथेच श्रीलंकेचे अवसान गळाले. तो बाद झाल्यावर त्यांचे अखेरचे सात फलंदाज ५५ धावांत तंबूत परतले. 

संक्षिप्त धावफलक ः श्रीलंका ४४.५ षटकांत सर्वबाद २१५ (उपुल थरंगा ९५ -८२ चेंडू, १२ चौकार, ३ षटकार, समरविक्रमा ४२, कुलदीप यादव ३-४२, युजवेंद्र चहल ३-४६) पराभूत वि. भारत ३२.१ षटकांत २ बाद २१९ (शिखर धवन नाबाद १०० -८५ चेंडू, १३ चौकार, २ षटकार, श्रेयस अय्यर ६५ -६३ चेंडू, ८ चौकार, १ षटकार).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket india srilanka