वर्चस्व राखण्याचेच भारताचे उद्दिष्ट

वृत्तसंस्था
Wednesday, 20 December 2017

थोडक्‍यात टी २०
कटकचे बाराबत्ती स्टेडियमवर २०१५ मध्ये खेळल्या गेलेल्या एकमात्र टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची दाणादाण. भारताचा डाव ९२ धावांत आटोपला
श्रीलंकेविरुद्धच्या १३ टी २० सामन्यात भारताचे ७ विजय
भारताकडून तीन खेळाडू वॉशिंग्टन सुंदर, बसिल थम्पी, दीपक हुडा प्रथमच खेळणार

कटक - कसोटी आणि पाठोपाठ एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर आता भारत श्रीलंकेविरुद्धच्या टी २० सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. दुसऱ्या फळीच्या खेळाडूंची चाचपणी करण्याचा प्रयत्न भारताकडून अपेक्षित असला, तरी निर्विवाद वर्चस्व हेच त्यांचे उद्दिष्ट राहणार यात शंका नाही. 

कोहलीच्या गैरहजेरीत एकदिवसीय मालिका जिंकल्यावर आता रोहित शर्मा टी २० मालिकाही जिंकून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. धरमशाला येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील विजय वगळता श्रीलंका संघ संपूर्ण दौऱ्यात भारतीय संघाच्या जवळपास पोचणारी कामगिरीदेखील दाखवू शकलेले नाहीत. 

एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला होता. टी २० मालिकेची सुरवात मात्र विजयाने करण्यासाठी भारतीय उत्सुक असतील यात शंका नाही. फलंदाजीच्या आघाडीवर भारताला चांगली सुरवात मिळाली, तर मधल्या आणि नंतर येणाऱ्या फलंदाजांवरील ताण कमी होऊ शकतो. विशेष म्हणजे या सामन्यात भारताकडून वॉशिंग्टन सुंदर, बसिल थम्पी आणि दीपक हुडा या तीन नवोदित खेळाडूंना प्रथमच संधी मिळाली आहे. अर्थात, ता तिघांपैकी पदार्पणाची संधी कुणाला मिळणार हे अजून निश्‍चित नाही. गेल्या वर्षी झिंबाब्वेविरुद्ध पदार्पण करणारा मध्यमगती गोलंदाज जयदेव उनाडकट यालाही या मालिकेसाठी परत बोलाविण्यात आले आहे. भुवनेश्‍वर कुमारला विश्रांती दिल्यामुळे गोलंदाजीची प्रमुख धुरा जसप्रित बुमराला सांभाळावी लागणार आहे. 

दुसरीकडे उपूल थरंगा आणि एंजेलो मॅथ्यूज यांचा अनुभव हीच श्रीलंका संघाची ताकद राहणार आहे. या दोघांना निरोशान डिकवेलाची साथ मिळू शकते. एकदिवसीय सामन्यांची मालिका गमाविल्यानंतरही श्रीलंका कर्णधार भारताला भारतात पराभूत करण्याचा आशावाद राखून आहे. तो म्हणाला, ‘‘आम्ही भारताला भारतात हरवू शकतो. एकदिवसीय मालिकेत आम्हाला तशी संधीदेखील होती; मात्र आमच्या मधल्या फळीला योग्य खेळ दाखवता आला नाही. टी २० सामन्यात आम्हाला याचा विचार करावा लागेल. एकदिवसीय मालिका आता भूतकाळ झाला. तो विसरून आम्ही टी २० मालिकेकडे लक्ष केंद्रित केले आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket india T20