भारतीय गोलंदाजांचा प्रभावी मारा; 231 धावांचे आव्हान

Wednesday, 25 October 2017

पुणे : खेळपट्टीवरून सामन्यापूर्वीच रंगलेल्या वादानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे न्यूझीलंडला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी अवघे 231 धावांचे आव्हान ठेवता आले. भारताकडून भुवनेश्वर कुमार यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने तीन आणि बुमराहने 2 बळी मिळविले.

पुणे : खेळपट्टीवरून सामन्यापूर्वीच रंगलेल्या वादानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे न्यूझीलंडला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी अवघे 231 धावांचे आव्हान ठेवता आले. भारताकडून भुवनेश्वर कुमार यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने तीन आणि बुमराहने 2 बळी मिळविले.

पहिला एकदिवसीय सामना गमाविल्यानंतर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे गरजेचे आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 असा पिछाडीवर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीस पोषक खेळपट्टी असल्याने विल्यम्सनने घेतलेला हा निर्णय त्यांच्या फलंदाजांना सार्थकी ठरविता आला नाही.

सलामीवीर कॉलीन मुन्रो आणि मार्टीन गुप्टील यांनी सुरवातीला आक्रमक फटके मारत भारताच्या यशस्वी जलदगती गोलंदाजांचा सामना केला. पण, भुवनेश्वरने सुरवातीला यश मिळवून देण्याची परंपरा कायम ठेवत गुप्टीलला बाद केले. त्यानंतर कर्णधार विल्यम्सनही कमाल दाखवू शकला नाही. त्याला बुमराहने पायचीत बाद केले. न्यूझीलंड या विकेटबरोबर आपली रिव्ह्यूही गमावला. मुन्रो भुवनेश्वरचा शिकार ठरला. मुंबईतील सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळवून देणारी लॅथम आणि टेलरची जोडी याठिकाणी अपयशी ठरली. टेलरला धोनीकडे झेल देण्यास भाग पाडून पांड्याने मोठा अडसर दूर केला.

लॅथम आणि निकोल्स यांनी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर लॅथम 38 धावांवर त्रिफळाबाद झाला. निकोल्स, ग्रँडहोम या जोडीने न्यूझीलंडची धावसंख्या दीडशेच्या पार नेल्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये चहलने लागोपाठ ग्रँडहोम (41 धावा) आणि अॅडम मिल्न (शून्य) यांना बाद केले. साऊदीने चहलला हॅट्ट्रीक मिळू दिली नाही. न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी संघाला 200 धावांचा टप्पा करून दिला. न्यूझीलंडला आपल्या डावात फक्त 17 चौकार आणि 4 षटकार मारता आले.

क्युरेटर साळगावकरांचे निलंबन
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांच्यावर पीच फिक्सिंग प्रकरणाचे आरोप झाल्याने त्यांचे बीसीसीआयकडून निलंबन करण्यात आले आहे. एमसीएचे अध्यक्ष अभय आपटे यांनी याबद्दल माहिती दिली. तसेच या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. एका वृत्तवाहिनीने केलेल्या खुलाशात साळगावकर खेळपट्टीपर्यंत घेऊन गेल्याचे दिसत आहे आणि पाहिजे तशी खेळपट्टी बनवतो, असे स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणावरून आज सकाळपासून वादंग निर्माण झाले होते. अखेर त्यांचे निलंबन करून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. पुण्यातील खेळपट्टीवरून यापूर्वीही वाद झालेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात आयसीसीनेच या खेळपट्टीला खराब खेळपट्टीचा शेरा दिला होता. त्यामुळे खेळपट्टीवरून सामन्यापेक्षा हा वादच चर्चेचा विषय बनला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket india vs new zealand one day match