क्रिकेट : पुण्यात फिक्सिंगचा आरोप; खेळपट्टीवरून वादंग

Wednesday, 25 October 2017

या प्रकऱणाची दखल घेऊन आयसीसीचे सामनाधिकारी पीच पाहून निर्णय घेतील असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे.

पुणे - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुण्यात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हा सामना होणार हे निश्चित असले तरी पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांच्यावर फिक्सिंगचा आरोप झाल्याने त्यांच्यावर कारवाई होणार की नाही हे पहावे लागणार आहे. दरम्यान, साळगावकर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत पहिला सामना गमाविल्याने भारतीय संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. सामना सुरु होण्यास काही तास शिल्लक असताना एका वृत्तवाहिनीने क्युरेटर साळगावकर बुकींकडून पैसे घेऊन खेळपट्टी हवी तशी बनविण्यास तयार असल्याचा आरोप केला. त्यामुळे या सामन्याला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकऱणाची दखल घेऊन आयसीसीचे सामनाधिकारी पीच पाहून निर्णय घेतील असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र क्रिकेट मंडळाकडून (एमसीए) अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

पांडुरंग साळगावकर यांनी सामन्याच्या एक दिवस आगोदर खेळपट्टीबाबत अंदाज वर्तविताना 300 पेक्षा अधिक धावा होतील असा अंदाज वर्तविला होता. तसेच त्यांनी बोलता बोलता तुम्हाला हवी तशी खेळपट्टी बनवून देतो असेही म्हटले होते. या वृत्तवाहिनीने याच विषयावरून खेळपट्टीचा मुद्दा चर्चेत आणला आहे. यावरून अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: sports news cricket india vs new zealand pune odi match fixing issue