श्रीलंकेचा भारतावर सनसनाटी विजय

सुनंदन लेले 
शुक्रवार, 9 जून 2017

लंडन - सलग दुसऱ्या सामन्यात धावांची बरसात केल्यानंतरही भारताला या वेळी पराभव पत्करावा लागला. चॅंपियन्स करंडक स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेतील अंडरडॉग्ज मानल्या जाणाऱ्या श्रीलंका संघाने जाणकार आणि भारतीय चाहत्यांचे अंदाज चुकवत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत सात गडी राखून विजय मिळविला. कुशल मेंडिस ‘सामन्याचा मानकरी’ ठरला. 

लंडन - सलग दुसऱ्या सामन्यात धावांची बरसात केल्यानंतरही भारताला या वेळी पराभव पत्करावा लागला. चॅंपियन्स करंडक स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेतील अंडरडॉग्ज मानल्या जाणाऱ्या श्रीलंका संघाने जाणकार आणि भारतीय चाहत्यांचे अंदाज चुकवत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत सात गडी राखून विजय मिळविला. कुशल मेंडिस ‘सामन्याचा मानकरी’ ठरला. 

शिखर धवनचे शतक आणि रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनीच्या अर्धशतकी खेळीने भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३२१ धावा केल्या. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेने ४८.४ षटकांत ३ बाद ३२२ धावा केल्या. दनुष्का गुणतिलका, कुशल मेंडिस आणि कर्णधार एंजेलो मॅथ्यूज यांनी केलेल्या अर्धशतकी खेळी निर्णायक ठरल्या. 

विजयासाठी ३२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऐनवेळी संघात स्थान मिळालेल्या दनुष्का गुणतिलका याने सलामीची जोडी झटपट फुटल्यानंतरही कुशल मेंडिसच्या साथीत श्रीलंकेचा डाव सावरला. दोघांनी मोठ्या आव्हानाचे दडपण झुगारून फटकेबाजी केली. श्रीलंकेच्या फलंदाजांकडून झालेला हा प्रतिहल्ला भारतीय गोलंदाजांना अनपेक्षित होता. त्यामुळे गोलंदाज दडपणाखाली गेले. ही जोडी मुक्तपणे फलंदाजी करत असताना भारतीय गोलंदाज आणि कर्णधार हतबल ठरला. गोलंदाजांचे शक्‍य ते पर्याय वापरून झाल्यानंतर कोहलीने स्वतःकडेदेखील चेंडू घेतला; पण त्यांना यश आले नाही. सलामीचा फलंदाज निक डिकवेला याची विकेट वगळता भारतीय गोलंदाजांना यश आले नाही. श्रीलंकेचे अन्य दोन फलंदाज धावा चोरण्याच्या नादात धावबाद झाले. 

कुशल मेंडिस आणि गुणतिलका यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी झाली. त्यानंतर थोड्याफार अंतराने दोघे धावबाद झाले. पाकिस्तानविरुद्धच्या क्षेत्ररक्षणातील चुका भारताने या वेळी टाळल्या; पण या वेळी गोलंदाजांनी त्यांना दगा दिला. जमलेली जोडी फोडल्यानंतरही भारतीय गोलंदाज उभारी घेऊ शकले नाहीत. केवळ फंलदाज म्हणून संघात परतलेल्या कर्णधार एंजेलो मॅथ्यूजने या निर्णयाला न्याय दिला. आवश्‍यक धावगती नजरेच्या टप्प्यात ठेवत त्यांनी सामना आपल्या बाजूने झुकवला.

 त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर पहिल्या सामन्यातील खेळच जणू भारतीय फलंदाजांनी पुढे सुरू केला. सलामी जोडी शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी जम बसायला थोडासा वेळ घेतल्यावर धावांचा रतीब चालू झाला. रोहितने खास करून आखूड टप्प्याच्या चेंडूंना मारलेले फटके प्रेक्षणीय होते. शिखरने स्क्वेअरकटचे मारलेले चौकार विलक्षण ठरले. रोहित मलिंगाला हुकचा फटका मारताना ७८ धावांवर बाद झाला. तोपर्यंत या जोडीने शतकी सलामी दिली होती. रोहितला बाद केल्यावर श्रीलंकेला दुसरे यश झटपट मिळाले. कर्णधार विराट कोहलीला शून्यावर बाद करण्यात त्यांना यश आले. युवराजही चमक दाखवू शकला नाही. भारतीय संघ अडखळणार असे वाटत असताना धवन-धोनी जोडीने त्यांच्या आशांवर पाणी फिरवले.

संक्षिप्त धावफलक
भारत ५० षटकांत ६ बाद ३२१ (शिखर धवन १२५ -१२८ चेंडू, १५ चौकार, १ षटकार, रोहित शर्मा ७८ -७९ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार, महेंद्रसिंह धोनी ६३ -५२ चेंडू, ७ चौकार, २ षटकार, केदार जाधव नाबाद २५, लसिथ मलिंगा २-७०)  पराभूत वि. श्रीलंका ४८.४ षटकांत ३ बाद ३२२ (कुशल मेंडिस ८९ -९३ चेंडू, ११ चौकार, १ षटकार, दनुष्का गुणतिलका ७६ -७२ चेंडू, ७ चौकार, २ षटकार, एंजेलो मॅथ्यूज नाबाद ५२ -४५ चेंडू, ६ चौकार, कुशल परेरा ४७, असेले गुणरत्ने नाबाद ३४).

Web Title: sports news cricket india vs sri lanka