भारतीय अंध संघाने पाकला पूर्ण झुकविले

वृत्तसंस्था
Sunday, 21 January 2018

मुंबई - भारताने विश्वकरंडक अंध क्रिकेट स्पर्धेत आपण ताकद आहोत, याची जाणीव पाकिस्तानला पुन्हा करून दिली. भारताने या स्पर्धेचा कार्यक्रम बदलण्यास सहयजमान पाकिस्तानला भाग पाडले होते. साखळी लढतीत पाकिस्तानला पाणी पाजले आणि आता विश्वकरंडक अंध क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावत विजेतेपदास गवसणी घातली. 

मुंबई - भारताने विश्वकरंडक अंध क्रिकेट स्पर्धेत आपण ताकद आहोत, याची जाणीव पाकिस्तानला पुन्हा करून दिली. भारताने या स्पर्धेचा कार्यक्रम बदलण्यास सहयजमान पाकिस्तानला भाग पाडले होते. साखळी लढतीत पाकिस्तानला पाणी पाजले आणि आता विश्वकरंडक अंध क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावत विजेतेपदास गवसणी घातली. 

या स्पर्धेचे पाकिस्तान सातत्याने आयोजन करीत आहे. गतस्पर्धेत भारतीय अंध संघाने पाकिस्तानमध्ये पाकला हरवून बाजी मारली होती. या वेळी पाक आणि संयुक्त अरब अमिराती स्पर्धेचे यजमान होते. भारताची स्पर्धेतील सलामीची लढत पाकमध्ये होती, तसेच स्पर्धेतील अंतिम लढतही पाकमध्ये होती, पण भारत सरकारने संघाला पाकिस्तानात पाठविण्यास नकार दिला. अखेर स्पर्धा कार्यक्रमात बदल केल्यावरच भारत सहभागी झाला. एवढेच नव्हे तर भारताने अंतिम फेरी गाठल्यास शारजातच विजेतेपदाची लढत होईल, असे ठरविण्यात आले. 

शारजातील अंतिम लढतीत भारतीय संघाने निर्णायक लढतीत उभारलेल्या ३०८ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठताना दोन विकेट आणि आठ चेंडू राखत बाजी मारली. क्रिकेटमधील नेहमीपेक्षा मोठा चेंडू, तसेच स्वीपचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असलेल्या या लढतीत भारतीय सरस ठरले. साखळी सामन्यातही भारताने पाकला सात विकेटने हरविले होते.

बदार मुनीर (५७), रियासत खान (४८), निसार अली (४७) करीत पाकला ४० षटकांत ८ बाद ३०७ अशी धावसंख्या उभारून दिली. दीपक आणि रामबीर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत पाकला काहीसे रोखले. 

भारताने भक्कम सुरवात करताना पंधरा षटकांत १ बाद १११ अशी सुरवात केली होती, पण दोघे फलंदाज धावचीत झाल्याने भारताची अवस्था १६ व्या षटकात ३ बाद ११६ अशी झाली. सुनील रमेश (९३) आणि अजय तिवारी (६२) यांनी २५ व्या षटकापर्यंत भारतास ३ बाद १९० असे नेले. भारत सहज बाजी मारणार असे वाटत असतानाच अजय बाद झाला आणि भारतीय डाव घसरला, पण भारताने विजय निसटू दिला नाही. भारतास अवांतर ३० धावांचीही मदत लाभली. भारताने अखेर ३८.४ षटकांत ८ बाद ३०८ धावा केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket India World Cup blind cricket competition