दोनही हातांनी वाजलेली टाळी

- सुनंदन लेले, क्रीडा समीक्षक
रविवार, 2 जुलै 2017

भारतीय क्रिकेट संघाच्या सर्व दोऱ्या विराट कोहलीला स्वतःच्या हाती ठेवायच्या आहेत, तर अनिल कुंबळेचा स्वभाव बघता तो दोऱ्या आपल्या हाती ठेवायच्या उपाययोजना करीत असणार, हे नक्की आहे. त्यातच वादाची ठिणगी पडली प्रशिक्षक विरुद्ध कप्तान हे नाट्य रंगले. या प्रकरणात कुंबळेला सहानुभूती मिळाली आणि विराट कोहली खलनायक ठरला असला, तरी ही दोन्ही हातांनी वाजलेली टाळी आहे. 

चँपियन्स ट्रॉफी सुरू होत असताना ‘कुंबळे प्रशिक्षक नको,’ या विराट कोहलीच्या मागणीची बातमी फुटली. सुरवातीला बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेत, ‘‘छे, असा काही वाद नाहीच...हे सगळे खोटे आहे ...माध्यमांचा कांगावा आहे,’’ या शब्दांत खोटे सांगत आपला बचाव केला. मान्य आहे, की माध्यमांना अजून खाद्य मिळून संघाची एकाग्रता मोठ्या स्पर्धेअगोदर भंग होऊ नये या करता हे सर्व नाकारले गेले, तरीही सगळ्यांना हे ‘गुपित’ माहीत होते, की अनिल कुंबळेच्या कराराचे वर्ष पूर्ण झाले की नवीन प्रशिक्षकाच्या शोधकार्याला प्रारंभ होईल. अनिल कुंबळे आणि विराट कोहलीमधील वाद विकोपाला गेले किंवा त्यांच्यात मनभेद झालेत, असे म्हणणेही चुकीचे होते. होय मतभेद होते हे नक्की आणि मतभेद वैयक्तिक हेव्यादाव्याचे नसून कार्यपद्धतीचे होते.

नक्की मुद्दा काय होता
विराट कोहलीने अनिल कुंबळेच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता. काय होता हा आक्षेप? अनिल कुंबळे मैदानावर किंवा सरावादरम्यान जितका शांत दिसतो तितका तो ड्रेसिंगरूममध्ये नसतो, हे मुख्य गाऱ्हाणे होते. अनिल कुंबळेची शिस्त नव्या दमाच्या खेळाडूंना नको होती; अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, ज्या धादांत खोट्या होत्या. प्रत्यक्षात सध्याच्या भारतीय संघातील खेळाडू मेहनतीच्या बाबतीत किंवा शिस्तपालनाच्या बाबतीत अजिबात नखरे करत नाहीत. सराव असो वा व्यायाम, सगळे भारतीय खेळाडू मनापासून मेहनतीला तयार असतात. यात विशेष काहीच नाही, कारण आधुनिक खेळाडू करता असे करणे गरजेचे असते.

सामना चालू असताना कोणा खेळाडूकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही, की कुंबळेने प्रशिक्षक म्हणून नाराज होणे ग्राह्य आहे. प्रश्‍न त्या संदर्भात त्या खेळाडूची केव्हा आणि कशी कानउघाडणी करायची याचा होता. अनिल कुंबळे बऱ्याच वेळा अपयशी खेळाडूला तंबूत परतला की लगेच झापायचा, असे समजते. खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घ्यायला प्रशिक्षकाने रागावणे या तर काहीच गैर नाही. फक्त सामना चालू असताना ते वारंवार व्हायला लागल्याने बाकी खेळाडूंच्या एकाग्रतेवर आणि मनोधैर्यावर त्याचा विपरीत परिणाम व्हायला लागला आणि तेथेच गणित चुकले.      

संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी त्या सोबत फलंदाजीची जबाबदारी डोक्‍यावर असताना खेळाडू सकारात्मक मनोअवस्थेत राहण्याची जबाबदारी विराट कोहलीला त्रासदायक ठरू लागली. संघाला सतत सकारात्मक विचारात ठेवणे, हे प्रशिक्षकाचे काम आहे. नुसता विराट कोहलीच नाही, तर अजूनही काही खेळाडूंच्या मते अनिल कुंबळे ते काम सर्वोत्तम प्रकारे करत नव्हता. क्रिकेटचे ज्ञान आणि योजना आखण्याच्या बाबतीत कुंबळे कोठेच कमी नव्हता. कमजोरी फक्त अस्वस्थपणाची होती. सामना नाजूक अवस्थेत गेल्यावर खेळाडू अस्वस्थ होतात त्यांना शांत करण्यापेक्षा कुंबळे स्वतःच जास्त अस्वस्थ व्हायचा, असे खेळाडू खासगीत बोलताना म्हणाले.

मी संघातील गुंड आहे!
‘चक दे इंडिया’ या चित्रपटामध्ये शाहरुख खान संघात दादागिरी करणाऱ्या खेळाडूला उद्देशून एक संवाद फेकतो, ‘टीम में एकही गुंडा हो सकता है...और ये टीम का गुंडा मैं हूँ.’ अगदी तसा प्रकार कुंबळे-कोहली वादातही दिसून आला. विराट कोहलीने कबूल करू देत अथवा नको, संघाच्या सर्व दोऱ्या त्याला स्वतःच्या हाती ठेवायच्या आहेत. कुंबळेचा स्वभाव बघता तो दोऱ्या आपल्या हाती ठेवायच्या उपाययोजना करीत असणार, हे नक्की आहे. त्यातच मला वाटते वादाची ठिणगी पडली.

या प्रकरणात कुंबळेला सहानुभूती मिळाली आणि विराट कोहली खलनायक ठरला. तसे बघायला गेले तर कुंबळेचा कार्यकाळ एकच वर्षाकरता पक्का केला गेला होता. कालावधी पूर्ण होत असताना कोहलीला प्रशिक्षकाच्या कार्यकाल वाढीबद्दल विचारले गेल्यावर त्याने प्रांजळ मत दिले. भारतीय विचारसरणीत इतके उघड मत देणे धोकादायक ठरते नेमके तेच झाले आणि जनक्षोभाचे बूमरॅंग विराट कोहलीवर उलटले.

फरक खेळाचा आहे
फुटबॉल किंवा बास्केटबॉल या खेळांत मॅनेजर किंवा प्रशिक्षक सर्वाधिक ताकदवान व्यक्ती असते. क्रिकेटच्या खेळात प्रशिक्षकापेक्षा कप्तानाचे वजन जास्त असते, हे उघड आहे. मॅंचेस्टर युनायटेड संघात डेव्हिड बेकहम, रोनाल्डोसारखे अफलातून आणि ग्लॅमरस खेळाडू असताना संघात शब्द अलेक्‍स फर्ग्युसन यांचाच चालायचा, हे सत्य नाही का? दुसऱ्या बाजूला आता विराट कोहलीवर कडाडून टीका करणाऱ्या माजी खेळाडूंना आपण कप्तान असताना काय दादागिरी केली, हे विसरणे चुकीचेच आहे. सुनील गावसकर असो वा सौरभ गांगुली; त्यांनी कप्तान असताना आपल्याला हवे ते खेळाडू आणि आपल्याला हवे तेच प्रशिक्षक हक्काने मागून नाही का घेतले? मग आता अनिल कुंबळेची बाजू घेत विराट कोहलीवर कडाडून टीका करण्यात काय अर्थ?

कप्तानावर मर्यादाही गरजेच्या
अनिल कुंबळेला आपण कप्तान आणि संघातील काही खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून कोण आहे, हे समजले होते. तरीही निगरगट्टपणे स्थानाला पकडून ठेवणाऱ्यातील कुंबळे माणूस नाही. अनिल कुंबळे अत्यंत प्रामाणिक आणि स्वाभिमानी माणूस आहे. कप्तानाच्या डोळ्यात नकारघंटा दिसताच त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर राजीनामा द्यायचा विचार पक्का केला होता. शिक्का फक्त कुंबळेने नंतर मारला. योग्य प्रकारे पद सोडून कुंबळेने स्वतःचा मान ठेवला आणि कोहलीची सुटकाही झाली.
प्रशिक्षकपदाच्या एका वर्षाच्या कालावधीत तुफान यश संपादूनही अनिल कुंबळेला पदभार सोडावा लागला, तो मुख्यत्वे कप्तान कोहलीने नाराजी दाखवली म्हणून. आता प्रश्‍न असा उरतो, की कप्तान किंवा खेळाडू म्हणून ‘बीसीसीआय’ने विराट कोहलीचे किती आणि काय काय ऐकायचे. प्रशिक्षक बदलायची कोहलीची मागणी मान्य झाली आहे. आता पुढे पावले टाकत कोहलीने अजून मागण्या केल्यास त्यावर मर्यादा घालणे नितांत गरजेचे आहे. संघनिवडीच्या प्रक्रियेत विराट कोहलीच्या मतांचा निवड समिती विचार करते. तसे नसते तर, युवराज सिंग संघात परत आलाच नसता. आता पुढे जाऊन कोहलीच्या मतांना बीसीसीआय किती महत्त्व देते हे बघावे लागेल. विराटही संपूर्ण प्रकरणातून शहाणपण शिकून प्रत्येक निवड प्रक्रियेत लुडबूड करणार नाही ना, याकडे लक्ष द्यावे लागेल.

नाजूक काळ
एक जमाना असा होता की, पती-पत्नीचे पटले नाही, तरी त्यांच्यात काडीमोड व्हायचा नाही. मतभिन्नता असून ४० वर्षे संसार रेटले जायचे. नवीन जमान्यातील मुले-मुली वेगळ्या विचारांचे आहेत. जमत नसल्यास लग्नानंतर सहा महिन्यांत वेगळे होऊन दोघे सुखाने जगू लागतात, असे बऱ्याच वेळा बघायला मिळत आहे. विराट कोहली नव्या पिढीचा खेळाडू आहे. तो पटत नसले, तरी रेटून काम करणाऱ्यातील नाही. एका अर्थाने जे झाले ते चांगलेच झाले, असे वाटते. बरोबर दोन वर्षांनी विश्‍वकरंडक स्पर्धा होणार आहे. मुख्य स्पर्धा तोंडावर आल्यावर कुरबूर करण्यापेक्षा नाराजी पत्करून अगोदर काडीमोड करणे, हा निर्णय विराटने विचाराअंती घेतला असावा. आता जो कोणी नवा प्रशिक्षक नेमला जाईल त्याच्या सोबत दोन वर्षे क्रिकेटचा संसार करून विश्‍वकरंडकापर्यंत काम करणे विराट कोहलीला बंधनकारक असणार आहे.

रवी परत उगवणार
एकंदर परिस्थितीचा आढावा घेता माजी संघ मार्गदर्शक रवी शास्त्रीच्या हाती संघाच्या मार्गदर्शनाची धुरा सोपवण्यात यायची शक्‍यता दाट आहे. रवी शास्त्री सर्वोत्तम प्रशिक्षक नाही, मात्र तो सकारात्मक विचारांचा बादशहा आहे. भारतीय संघातील खेळाडूंना रवी शास्त्रीची विचारसरणी पटते, असे समजले. सुरवातीला प्रशिक्षकपदाच्या उमेदवारीकरता अर्ज भरायला रवी शास्त्रीचा अहंकार आड आला. ‘बीसीसीआय’ने अर्ज करण्याची मुदत रवी शास्त्रीसाठीच वाढवली आहे, असे दिसते. अगोदर नाही नाही करणारा रवी शास्त्री रीतसर अर्ज करायला तयार झाला आहे. 

आता तरी शिका
या प्रकरणातून ‘बीसीसीआय’च्या अत्यंत ढिसाळ कारभाराची झलक परत एकदा पाहायला मिळाली. अनिल कुंबळेचा कार्यकाळ संपत येण्याअगोदर आयपीएल चालू असताना पुढील दोन वर्षांकरता प्रशिक्षक नेमण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ व्हायला हवा होता. बीसीसीआयने ते केले नाहीच, वर कोहलीने दाखवलेल्या नाराजीची बातमी माध्यमांना देऊन लाज आणली. आमचा सर्व कारभार प्रोफेशनल पद्धतीने चालतो असे छातीठोकपणे सांगणाऱ्या बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना आरसा देण्याची वेळ आली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीला नवा प्रशिक्षक भारतीय संघासोबत श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या विमानात बसलेला दिसणार आहे. कोहली व नव्या प्रशिक्षकाची जोडी पुढील दोन वर्षांत खडतर परदेश दौरे आणि २०१९च्या विश्‍वकरंडक स्पर्धेला कसे सामोरे जातात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे...   

Web Title: sports news cricket indian team