कधी गट्टी; कधी विळा-भोपळा!

ज्ञानेश भुरे
रविवार, 2 जुलै 2017

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक हे नाते गेली अनेक वर्षे कधी गट्टीचे; तर कधी विळ्या-भोपळ्याचे राहिले आहे. देशात १९९२ मध्ये पूर्णवेळ प्रशिक्षक नेमण्याची प्रथा निर्माण झाल्यानंतरच्या कर्णधार-प्रशिक्षक नात्यांचा हा आलेख.

भारतीय क्रिकेट संघासाठी १९९० पर्यंत प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. संघ दौऱ्यावर गेल्यावर बरोबर व्यवस्थापक पाठवला जाई. तोच दोन्ही भूमिका पार पाडायचा. पुढे ही प्रथा बंद पडली व भारतीय संघाला पहिले पूर्णवेळ प्रशिक्षक मिळाले अजित वाडेकर यांच्या रूपाने. वाडेकर यांनी १९९२ ते ९६ अशी चार वर्षे भारतीय प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. या कालावधीत भारतीय संघाने सर्वप्रथम निर्भेळ यशाची चव चाखली. कर्णधार अझरुद्दीन आणि वाडेकर हे समीकरण चांगले जुळून आले. 

भारतीय संघ या कालावधीत कसोटी क्रिकेटमध्ये सलग १४ सामन्यांत अपराजित राहिला होता. एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील ‘हिरो करंडक’ही जिंकला. वाडेकर यांची ही यशोमालिका का थांबविण्यात आली, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. त्यांची जागा १९९६ मध्ये संदीप पाटील यांनी घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने इंग्लंडचा जेमतेम एक दौरा केला व आपल्याला मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली. त्यांची जागा मदनलाल यांनी घेतली. त्यांचे प्रशिक्षकपदही जेमतेम एक वर्ष टिकले. 

यानंतर प्रशिक्षक झालेल्या अंशुमन गायकवाड यांनी दोन वेळा ही जबाबदारी सांभाळली. पहिल्या संधीत सचिन तेंडुलकर कर्णधार होता. त्यांनी मॅचफिक्‍सिंगमधून बाहेर पडलेल्या भारतीय संघाची जबाबदारी मोठ्या हिमतीने पार पाडली. आपण ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकलो, पाकिस्तानविरुद्धची मालिका बरोबरीत सोडवली. इंडिपेंडन्स करंडक आणि न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकलो. एवढे यश मिळविल्यावरही करार संपला म्हणून त्यांच्या जागी कपिलदेव यांची नियुक्ती करण्यात आली. 

कपिलदेव सर्वाधिक अपयशी प्रशिक्षक ठरले. अर्थात, त्यांच्याच कालावधीत उघडकीस झालेल्या मॅचफिक्‍सिंग प्रकरणाचाही मोठा परिणाम झाला. आपण प्रथम ऑस्ट्रेलियात साफ निष्प्रभ ठरलो. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकलो, मात्र मॅचफिक्‍सिंग प्रकरण उघड झाले. मनोज प्रभाकरने थेट कपिलदेव यांचेच नाव घेतल्याने त्यांनी प्रशिक्षकपद सोडले. तोवर २००० साल उजाडले होते. या वर्षात भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी परदेशी उमेदवारांसाठी दरवाजे  उघडले गेले.

‘चॅपेल पर्वा’ची सुरवात
न्यूझीलंडचे जॉन राइट भारताचे पहिले परदेशी प्रशिक्षक बनले. त्याचबरोबर संघाचे नेतृत्वही नव्याने सौरभ गांगुलीकडे आले होते. भारतीय संघ मॅच फिक्‍सिंगच्या कचाट्यातून बाहेर पडत होता. प्रशिक्षक आणि कर्णधार या नात्याचा पहिला अनुभव या जोडीनेच दिला. मायदेशाबरोबर परदेशातही भारतीय संघाने विजयाची चव चाखली, तर २००३ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ऐतिहासिक पाकिस्तान दौऱ्यात विजय मिळविला. ऑस्ट्रेलियात मालिका बरोबरीत सोडवली. सलग पाच वर्षे भारतीय संघासोबत राहिल्यावर त्यांनी करार वाढविण्यास नकार दिला आणि सुरू झाले ग्रेग चॅपेल यांचे पर्व. 

एक खमक्‍या प्रशिक्षक. कडक शिस्तीचा प्रशासक. कदाचित हेच आपल्या सळसळत्या युवा क्रिकेटपटूंना रुचले नाही. प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील पहिला वाद चॅपेल यांच्या कालावधीतच घडला. त्यांचे आणि गांगुलीचे सूर कधीच जुळले नाहीत व त्यांनीच गांगुलीला कर्णधारपदावरून हटवले. त्याची जागा द्रविडने घेतली, मात्र सूर जुळलेच नाहीत. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यांत आपण सपाटून मार खाल्ला, तर २००७च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिल्या फेरीतच गारद झालो. शेवटी चॅपेल यांची गच्छंती झालीच. त्यांची जागा दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टन यांनी घेतली. त्यांनी प्रशिक्षकापेक्षा ‘मॅन मॅनेजमेंट’चे अचूक उदाहरण आपल्या कृतीतून समोर ठेवले. कर्णधार महेंद्रसिंह धोनीबरोबर त्यांचे सूर जुळले आणि भारत यशोशिखरावर पोचला. भारतीय संघाने त्यांच्या कालावधीत २०११ मध्ये २८ वर्षांनी विश्‍वकरंडक जिंकला. न्यूझीलंडमध्ये ४१ वर्षांनी कसोटी मालिका जिंकली व २००९ मध्ये आपण आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोचलो. कर्स्टन यांनीही कुटुंबासाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला.

फ्लेचर-शास्त्री पर्व
कर्स्टन यांच्यानंतर आले डंकन फ्लेचर. त्यांनीही चार वर्षे पद सांभाळले. इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या व्हाइट वॉश मालिकेने त्यांची अपयशी सुरवात झाली. त्यानंतर २०१३ मध्ये चॅंपियन्स करंडक पटकावला. २०१४च्या ‘टी-२०’ विश्‍वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. २०१५च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोचलो. कालावधीत अखेरच्या वर्षांत त्यांना रवी शास्त्री यांची साथ मिळाली. स्वतंत्र विचाराने चालणाऱ्या नियामक मंडळाने शास्त्री यांच्यासाठी संघ संचालक हे पद निर्माण केले. शास्त्री स्थिरावू लागल्यावर फ्लेचर यांची उचलबांगडी झाली. शास्त्री संचालक या नावाने प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळू लागले. त्यांच्या कालावधीत श्रीलंकेत जिंकलो, मायदेशात दक्षिण आफ्रिकेला हरवले. त्यांचे कोहलीशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले. त्यांच्या स्वच्छंदी स्वभावाची खेळाडूंना भुरळ पडली. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्याशी जुळवून घेणे जड गेले नाही, मात्र तरीही मंडळाने शास्त्री यांना हटवले. प्रशिक्षक निवडीसाठी मुलाखतीचा पायंडा पाडत अनिल कुंबळेंची निवड केली आणि नव्या वादाला तोंड फोडले. भारतीय क्रिकेट प्रशिक्षक आणि कर्णधार असा वाद तसा कधीच राहिला नाही. प्रत्येक कर्णधाराने प्रशिक्षकाची जुळवून घेतले होते. पण, या वेळी तसे चित्र निर्माण केले गेले. आगीत तेल ओतले गेले आणि व्हायचे तेच झाले. येणाऱ्या नव्या प्रशिक्षकाने अधिकाराची खात्री करूनच करारावर सह्या करण्याची अट घातल्यास आश्‍चर्य नको.

Web Title: sports news cricket indian team