esakal | पुजारा, रहाणेची नाबाद शतके
sakal

बोलून बातमी शोधा

पुजारा, रहाणेची नाबाद शतके

पुजारा, रहाणेची नाबाद शतके

sakal_logo
By
पीटीआय

कोलंबो - फिरकीला साथ देणारी खेळपट्टी तयार करून भारतीयांना आपल्या जाळ्यात पकडण्याची श्रीलंकेची रणनीती पहिल्या दिवशी तरी फसली. गॉल येथे सुरू केलेल्या वर्चस्वाचा दुसरा अंक भारतीयांनी विशेष करून चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांनी कोलंबोतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कायम ठेवला. या दोघांनी नाबात शतके झळकावीत रचलेली द्विशतकी भागीदारी भारतीय वर्चस्वाची ग्वाही देणारी ठरली. पहिल्या दिवसअखेर भारताने ३ बाद ३४४ अशी भक्कम धावसंख्या उभारली.

गॉल येथील पहिल्या सामन्यात भारताने पहिल्या डावात ६०० धावांचा डोंगर उभा केला आणि त्यासमोर श्रीलंकेचे आव्हान खुजे ठरवले होते. आता त्याची पुनरावृत्ती होणार का? हे पुढील दिवसांच्या खेळात स्पष्ट होईल. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ३.८ च्या सरासरीने धावा केल्या. डावाच्या मध्यावर ही सरासरी चारच्या पुढे होती. 

पुजारासाठी आजचा दिवस खासच ठरला. ५० वा कसोटी सामना आणि अर्जून पुरस्कारासाठी करण्यात आलेली शिफारस अशा दोन चांगल्या घटना घडत असताना त्याने नाबाद शतकाने त्यावर मोहोर उमवली. चार हजार कसोटी धावा करताना त्याने १३ वे शतक केले. पुजारापेक्षा रहाणेची फलंदाजी अधिक आक्रमक होती. १०३ धावांसाठी त्याने १२ चौकार मारले. तर पुजाराने १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद १२८ धावांची खेळी सजवली या दोघांची २११ धावांची भागीदारी झाली आहे.

त्याअगोदर पहिल्या कसोटीतील शतकवीर शिखर धवनने श्रीलंका गोलंदाजांना दयामाया दाखवली नाही. त्याची ३७ चेंडूंतील ३५ धावांची खेळी एकदिवसीय सामन्यास साजेशी होती. बाद होण्याअगोदर त्याने राहुलसह अर्धशतकी सलामी दिली होती. जवळपास चार महिन्यांनतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या राहुलने या ब्रेकचा आपल्यावर परिणाम झाला नसल्याचे दाखवून दिले. अर्धशतकी खेळी केली; परंतु पुजाराबरोबर सामंजस्य चुकल्यामुळे तो धावचीत झाला. विराट कोहली मात्र पुन्हा उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात बाद  झाला.

धावफलक
भारत पहिला डाव ः शिखर धवन पायचित गो. परेरा ३५, के. एल. राहुल धावबाद ५७, चेतेश्‍वर पुजारा खेळत आहे १२८ (२२५ चेंडू, १० चौकार, १ षटकार), विराट कोहली झे. मॅथ्यूज गो. हेराथ १३, अजिंक्‍य रहाणे खेळत आहे १०३ (१६८ चेंडू, १२ चौकार), अवांतर ८, एकूण ९० षटकांत ३ बाद ३४४

गडी बाद क्रम ः १-५६, २-१०९, ३-१३३

गोलंदाजी ः नुआन प्रदीप १७.४-२-६३-०, रंगना हेराथ २४-३-८३-१, दिमुथ करुणारत्ने ३-०-१०-०, दिलरुवान परेरा १८-२-६८-१, मलिंदा पुष्पकुमारा १९.२-०-८२-०, धनंजय डिसिल्वा ८-०-३१-०