के.एल. राहुलच्या टॅटूमुळे आईने त्याच्याशी केली 'कट्टी फू'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

राहुल म्हणाला, ऑस्ट्रेलियातील पदार्पणाच्या मालिकेतील ते सात दिवस एखाद्या नरकापेक्षाही कठीण होते. तो आपल्या संघ सहकाऱ्यांबाबत भरभरून बोलला. कारण जेव्हा तो ‘आऊट ऑफ फॉर्म’ होता आणि त्याचा आत्मविश्वास डगमगला होता, तेव्हा त्या सगळ्यांनी नेहमी त्याची बाजू घेतली होती. संपूर्ण संघ त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता. त्यामुळेच तो पुढच्या इनिंग्जमध्ये उत्तम कामगिरी करू शकला. त्यामुळेच पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने शतक केले होते.

मुंबई : के.एल. राहुल हा त्याची आगळीवेगळी हेअरस्टाईल आणि टॅटूंसाठी ओळखला जातो. त्याने ही प्रेरणा फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमकडून घेतली. पण त्याच्या या हेअरस्टाईलला आणि टॅटूंना घरच्यांची पसंती मिळाली नाही. जेव्हा त्याने पहिला टॅटू काढला तेव्हा त्याची आई त्याच्याशी एक आठवडाभर बोलत नव्हती. राहुलने स्वतःच हा किस्सा चाहत्यांशी शेअर केलाय.

भारतीय फलंदाज के एल राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांना व्हॉट द डक या कार्यक्रमात बोलते करत विक्रम साठ्ये याने यांच्या यापूर्वी कधीही न ऐकलेल्या कथा उलगडल्या. के एल राहुलची आगळीवेगळी हेअरस्टाईल आणि टॅटू काढलेल्या बलदंड बाहूंपलीकडे त्याच्यातील माणूस कसा आहे ते त्याने सांगितले. 

चेतेश्वर पुजारा उर्फ ‘मि. डिपेंडेबल’च्या आयुष्यातही त्याच्या वडिलांचा प्रभाव, स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने केलेली त्रिशतके, त्याच्या अंधश्रद्धा आणि त्याच्या हृदयाच्या जवळ असलेल्या अनेक गोष्टी त्याने सांगितल्या आहेत.
केवळ एका गोंधळामुळे त्याच्या पालकांनी त्याचे नाव राहुल ठेवले. त्याने सांगितले की, त्याची आई शाहरूख खानची चाहती असल्यामुळे तिला त्याचे नाव राहुल ठेवायचे होते. पण खरी गंमत पुढे आहे. त्याचे वडील सुनील गावसकरचे समालोचन ऐकत होते आणि त्यांनी चुकून त्यांच्या मुलाचे नाव राहुल आहे असे ऐकले आणि त्यांना आपले नाव गावसकरच्या मुलाच्या नावावरून ठेवायचे होते. त्यामुळेच माझे नाव म्हणजे क्रिकेट आणि मनोरंजन यांची सांगड आहे असे राहुलने सांगितले. राहुलने कुंबळेच्या कडक शिस्तीविषयीही सांगितले. त्याची अशी आगळीवेगळी हेअरस्टाईल आणि वेशभूषा पाहून कुंबळे त्याच्याकड्या करड्या नजरेने पाहायचा, ही आठवणीही त्याने यावेळी सांगितली.

चेतन पुजाराने सचिन तेंडुलकरसोबत फलंदाजी करताना घडलेला मजेशीर प्रसंग यावेळी सांगितला. त्याच्या शेवटच्या कसोटीमध्ये प्रेक्षकांकडून इतका गोंधळ होत होता की, त्यामुळे पुजारा विचलित झाला होता. त्यांच्या दौऱ्यात सचिनसोबत खेळताना असेही घडले होते की, जेव्हा एखादा फलंदाज बाद होत असे तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवत कारण त्यामुळे सचिन फलंदाजीसाठी येऊ शकेल. पुजारा जेव्हा चौकार मारत असे तेव्हाही प्रेक्षक टाळ्या वाजवत नसत कारण त्यांना मास्टर ब्लास्टरला फलंदाजी करताना पाहायचे होते. त्यामुळे त्याने चौकार मारण्याऐवजी एक धाव घेतली की प्रेक्षक टाळ्या वाजवायचे, हा प्रसंग विशद करत त्याने सचिनवर असलेल्या भारतीयांच्या निर्व्याज प्रेमाची आठवण सांगितली.
 

Web Title: sports news cricket KL Rahul cheteshwar pujara walk the duck