सामने वाढणार; दिवस कमी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 December 2017

नवी दिल्ली - अगोदर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहली यांनी अतिक्रिकेटवर ओरड आणि नाराजीही व्यक्त केल्यावर बीसीसीआयने पुढील २०१९ ते २३ या कालावधीतील कार्यक्रमात मोठ्या खुबीने सुवर्णमध्य काढला आहे. आत्ता मायदेशात होत असलेल्या सामन्यांच्या संख्येत ३० ने वाढ होईल; परंतु प्रत्यक्षात खेळण्याचे दिवस कमी होतील. त्यामुळे खेळाडूंना विश्रांतीची संधी अधिक मिळेल, असा दावा बीसीसीआयने केला आहे.

बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण बैठक आज झाली. भारतीय संघाचा पुढील कार्यक्रम हाच या बैठकीचा चर्चेचा प्रमुख मुद्दा होता. भविष्यातील सामन्यांचे नियोजन (एफटीपी) हा आयसीसीचा कार्यक्रम तत्त्वतः मान्य करण्यात आला. या काळात भारतात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका होणार आहेत. 

२०१९ ते २३ या पाच वर्षांत भारतात ८१ पेक्षा अधिक सामने होणार आहेत; पण खेळण्याचे प्रत्यक्ष दिवस ३०६ असतील. २०१५ ते १९ या काळात खेळण्याचे हेच दिवस ३९० होते. दोन मालिकांमध्ये वेळच मिळत नसलेल्या महत्त्वाच्या दौऱ्यावर जाण्याची तयारी करता येत नाही, अशी खंत विराट कोहलीने व्यक्त केली होती. 

सध्या सुरू असलेली श्रीलंकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यासाठी अवघ्या दोनच दिवसांचा अवधी मिळत आहे, अशा परिस्थितीत आव्हानात्मक असलेल्या या दौऱ्याची तयारी कशी करायची, अशी जाहीर टीका विराट कोहलीने केली होती. बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी, पुढील कार्यक्रम आखताना 
याचा विचार करू, असे आश्‍वासन दिले होते.

नाडाला विरोध कायम
राष्ट्रीय उत्तेजक चाचणी एजन्सीने (नाडा) आमच्या खेळाडूंची उत्तेजक चाचणी करण्याची आवश्‍यकता नाही, असे सांगत बीसीसीआयने नाडाबाबची आपली भूमिका स्पष्ट केली.

अफगाणिस्तानशी कसोटी
आयसीसीने अफगाणिस्तानला कसोटी दर्जा दिला आहे. त्यांना पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी भारताने दिली आहे. २०१९ मध्ये ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपले कसोटी पदार्पण करणार होते; परंतु भारताबरोबरचे संबंध लक्षात घेऊन बीसीसीआयने त्यांना ऑफर दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket match increase