फलंदाजीत स्थिरता हवी - रवी शास्त्री

मंगळवार, 30 जानेवारी 2018

संघातील संवादाचे महत्त्व  रवी शास्त्री : माझे काम तेच आहे. चांगला संवाद ठेवणे हेच काम आहे माझे. चालू मालिकेत आम्ही संघात बदल केले ज्यावरून बरीच चर्चा झाली. पण तुला आता सांगतो प्रत्येक बदल विचारपूर्वक केला होता. मान्य आहे काही बरोबर ठरले असतील काही चुकले असतील पण कोणताच निर्णय उगाच घेतला नव्हता त्या मागे योजना होती. दुसऱ्या कसोटीकरता तयार केलेले विकेट बघून आम्ही भुवनेश्‍वरला विश्रांती द्यायचा निर्णय घेतला. त्यावेळी मी भुवनेश्‍वरला भेटून व्यवस्थित कारणे समजावून सांगितली होती. त्याला तिसरी कसोटी खेळायचीच आहे हे सुद्धा सांगितले होते. चांगल्या संवादामुळे संघातील वातावरण एकदम सकारात्मक आहे. नुसता मी आणि विराट नाही तर सगळे प्रशिक्षक संवाद साधण्याच्या बाबतीत चांगले काम करत आहेत. 

तिसरा कसोटी सामना जिंकल्यावर भारतीय संघच नव्हे तर संपूर्ण प्रशिक्षकांचा ताफा आनंदीत झाला होता. जोहान्सबर्गला भारतीय संघ राहत असलेल्या इंटरकॉंटीनेंटल हॉटेलात रवी शास्त्रीला भेटून गप्पा मारायचा योग जमून आला. "सकाळ' बरोबर खास बातचीत केली त्याचा सारांश असा होता... 

कसोटी मालिकेच्या तयारी बद्दल 
रवी शास्त्री : सराव सामना रद्द करायचा आमचा निर्णय बरोबर होता. कारण सराव सामन्यात जर समोरच्या संघात सुमार गोलंदाज असले आणि विकेट पाटा असेल तर त्या सराव सामन्यातून काहीच साध्य होत नाही. म्हणूनच आम्ही सराव करायचा निर्णय घेतला. आम्हांला कसोटी सामन्यात दिली जातील तशी विकेटस्‌ उभे राहून बनवून घेतली आणि जोरदार सराव 5 दिवस केला. पण हे नक्की आहे की कोणत्याही परदेश दौऱ्यावर असे घाईने जाणे बरोबर नाही. आम्ही 10 दिवस अगोदर आलो असतो दक्षिण आफ्रिकेत तर फार फरक पडला असता. अशी चूक परत करायची नाही हे मनाशी पक्के करून आम्ही इंग्लंड दौऱ्याअगोदर बरोबर अगोदर जात आहोत. 

कसोटी मालिकेबद्दल 
रवी शास्त्री : चुटपुट लागून राहिली आहे रे...आपल्याला खरच मालिका जिंकता आली असती. पहिल्या कसोटीत तर मोठी संधी होती. म्हणावी तशी फलंदाजी झाली नाही तिथेच गणीत चुकले. आता तिसरा कसोटी सामना जिंकल्यावर खेळाडूंना समजते आहे की काय संधी हातात होती जी आपण गमावली. एकीकडे गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली त्यांना फलंदाजांनी समर्थ साथ दिली असती तर कमाल करता आली असती. दुसऱ्या कसोटीत आपल्या फलंदाजांनी आपल्या विकेटस्‌ ज्या पद्धतीने गमावल्या ते बघून मला भिंतीवर डोके आपटून घ्यावेसे वाटत होते. अरे पुजारा सारखा फलंदाज जो आपली विकेट इतकी प्राणपणाने जपतो तो एकाच कसोटीतील दोन डावात रनआऊट होतो तेव्हा काय हाल होत असतील विचार कर. 

तिसऱ्या कसोटीतील विकेट सर्वात आव्हानात्मक होते. मला फलंदाजांचा अभिमान वाटला. काय जिगर दाखवली आपल्या फलंदाजांनी. अजिंक्‍य रहाणेच्या दुसऱ्या डावातील इनिंगचे कौतुक आहे मला. समोरच्या संघातील कोणी अंदाज केला नसेल की अजिंक्‍य असा आक्रमक फलंदाजी करेल. हे म्हणत असताना मला परदेश दौऱ्यावर जाताना चांगली सलामी मिळण्याची गरज मोठी वाटते. आपले तीन आणि चार क्रमांकाचे फलंदाज फार लगेच मैदानात उतरायचे ही गोष्ट चांगली नाही म्हणता येणार. 

संघातील संवादाचे महत्त्व 
रवी शास्त्री : माझे काम तेच आहे. चांगला संवाद ठेवणे हेच काम आहे माझे. चालू मालिकेत आम्ही संघात बदल केले ज्यावरून बरीच चर्चा झाली. पण तुला आता सांगतो प्रत्येक बदल विचारपूर्वक केला होता. मान्य आहे काही बरोबर ठरले असतील काही चुकले असतील पण कोणताच निर्णय उगाच घेतला नव्हता त्या मागे योजना होती. दुसऱ्या कसोटीकरता तयार केलेले विकेट बघून आम्ही भुवनेश्‍वरला विश्रांती द्यायचा निर्णय घेतला. त्यावेळी मी भुवनेश्‍वरला भेटून व्यवस्थित कारणे समजावून सांगितली होती. त्याला तिसरी कसोटी खेळायचीच आहे हे सुद्धा सांगितले होते. चांगल्या संवादामुळे संघातील वातावरण एकदम सकारात्मक आहे. नुसता मी आणि विराट नाही तर सगळे प्रशिक्षक संवाद साधण्याच्या बाबतीत चांगले काम करत आहेत. 

एक दिवसीय मालिकेबद्दल 
रवी शास्त्री: मला कल्पना आहे की तुझा रोख काय आहे. होय मान्य आहे की एक दिवसीय संघातील मधल्या फळीत अजून अपेक्षित स्थिरता नाहीये. केदार जाधव, मनिष पांडे, श्रेयस अय्यर असे चांगले पर्याय आहेत. परदेश दौऱ्यातील एक दिवसीय संघात मी अजिंक्‍य रहाणेवरही अवलंबून राहायचा विचार करेन कारण अजिंक्‍य परदेशातील विकेटस्‌वर वेगळ्याच झोकात खेळतो. मनमोकळी संधी आम्ही सगळ्यांना देणार आहोत. ती पकडून त्याचे सोनं कोण करतो तोच 2019च्या वर्ल्डकप संघात जागा पटकावेल. गोलंदाजीची मला इतकी चिंता वाटत नाही कारण चांगले वेगवान गोलंदाज आणि चांगले तीन फिरकी गोलंदाज आपल्या संघात आहेत. 

चालू दौऱ्यातील सर्वात आनंदाची गोष्ट कोणती 
रवी शास्त्री : जसप्रीत बुमराचा कसोटी गोलंदाज म्हणून झालेला उदय मला सर्वात भावला. बुमराने कमाल गोलंदाजी करून समोरच्या फलंदाजांना सतत अडचणीत टाकले. आमच्या सगळ्यांच्या अपेक्षेपेक्षा बुमराने कसोटी क्रिकेटची नस पटकन पकडली. तेव्हढेच कौतुक मला भुवनेश्‍वरचे वाटते. गोलंदाजी तर त्याने अप्रतिम केलीच पण त्याने फलंदाजी सुधारायला केलेले कष्ट आणि सामन्यात फलंदाजी करताना दाखवलेला समंजसपणा मला खूप आवडला. परत सांगतो पहिल्या दोन कसोटीत फलंदाजांनी निर्णायक क्षणी खेळाचा दर्जा उंचावला असता तर मालिका जिंकण्याचा चमत्कार झाला असता.