प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर ‘बीसीसीआय’चा निर्णय
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक निवडीचा प्रश्‍न सुटता सुटेना अशी स्थिती होऊन बसली आहे. अनिल कुंबळे यांनी विंडीज दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर राजीनामा दिल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रशिक्षकपदासाठी आणखी अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. 

कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर ‘बीसीसीआय’चा निर्णय
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक निवडीचा प्रश्‍न सुटता सुटेना अशी स्थिती होऊन बसली आहे. अनिल कुंबळे यांनी विंडीज दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर राजीनामा दिल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रशिक्षकपदासाठी आणखी अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. 

कुंबळे यांनी विंडीज दौऱ्यावर जाण्यास नकार देत प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. कर्णधार कोहलीबरोबर असलेले संबंध आणखी ताणता येणार नाही. त्यामुळे येथेच थांबलेले बरे, असे म्हणत कुंबळे यांनी प्रशिक्षक राहण्यास नकार दिला. त्यानंतर चोवीस तासांनी बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी आणखी अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट सल्लागार समितीसमोर प्रशिक्षक निवडताना अधिक पर्याय उभे राहावेत, यासाठी हा पर्याय स्वीकारल्याचे स्पष्टीकरण ‘बीसीसीआय’ने दिले आहे. कोहली आणि कुंबळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर क्रिकेट सल्लागार समितीने देखील प्रशिक्षक निवडीसाठी आणखी वेळ मागून घेतला होता. 

बीसीसीआयच्या या नव्या निर्णयामुळे आता प्रशिक्षकाच्या नियुक्तीसाठी आणखी दहा दिवस लागणार आहेत. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकारी म्हणाला,‘‘आम्ही गेल्यावेळी जेव्हा अर्ज मागवले होते, तेव्हा कुंबळे यांना संधी होती. कुंबळे यांची कामगिरी चांगली असताना त्यांना नव्याने अर्ज करण्याची गरजच काय ? असा प्रश्‍न उपस्थित केला गेला. आता परिस्थिती वेगळी आहे. या पदासाठी इच्छुक व्यक्ती अजूनही आता अर्ज करू शकतात.’’ प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत वीरेंद्र सेहवाग याचे पारडे जड मानले जात असल्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात हा अधिकारी म्हणाला,‘‘कुणीच या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर वगैरे नव्हते. त्या वेळी केलेल्या अर्जांचा या नव्या निर्णयाशी काहीच संबंध नाही. निवड समितीसमोर अधिक पर्याय उपस्थित राहावे, यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.’’

त्यामुळे आता सेहवाग, टॉम मूडी, लालचंद राजपूत, रिचर्ड पिबस, डोडा गणेश, क्रेग मॅकडरमॉट यांच्यासह आता आणखी पर्याय निवड समितीसमोर उपलब्ध राहणार आहेत.

अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्या नात्यात निर्माण झालेली कटुता मिटविण्यासाठी ‘बीसीसीआय’कडून खूप प्रयत्न करण्यात आले. पण, यश आले नाही. सगळे विसरून ‘बीसीसीआय’ने पुढे जाण्याचे ठरवले आहे. प्रशिक्षकाचा शोध सुरू असून, श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला प्रशिक्षक मिळेल आणि तो सर्वोत्तम असेल.
- राजीव शुक्‍ला, बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी

Web Title: sports news cricket news BCCI Team India Anil Kumble Virat Kohli