क्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जुलै 2017

कुंबळे यांची कारकिर्द यशस्वी ठरल्यामुळे या पदासाठी त्यांची फेरनिवड होणे जवळपास निश्‍चित होते. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि कुंबळे यांच्यातील वादाची जाहीर चर्चा झाल्यानंतर कुंबळे यांनी कार्यकाळ संपल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे 'बीसीसीआय'ने अर्ज करण्याची मुदत 9 जुलैपर्यंत वाढविली होती. 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी संचालक रवी शास्त्री आणि माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्यात चुरस असली, तरीही फिल सिमन्स यांनीही या शर्यतीत उडी घेतली आहे. फिल सिमन्स हे वेस्ट इंडिजचे माजी प्रशिक्षक आहेत. याशिवाय, ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक टॉम मूडी यांनीही या पदासाठी अर्ज भरला आहे. 

जूनमध्ये झालेल्या चँपियन्स करंडक स्पर्धेनंतर अनिल कुंबळे यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. या स्पर्धेपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. कुंबळे यांची कारकिर्द यशस्वी ठरल्यामुळे या पदासाठी त्यांची फेरनिवड होणे जवळपास निश्‍चित होते. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि कुंबळे यांच्यातील वादाची जाहीर चर्चा झाल्यानंतर कुंबळे यांनी कार्यकाळ संपल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे 'बीसीसीआय'ने अर्ज करण्याची मुदत 9 जुलैपर्यंत वाढविली होती. 

फिल सिमन्स प्रशिक्षक असताना वेस्ट इंडिजने 2016 मध्ये ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. पण वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी हे पद सोडले. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 'बीसीसीआय'ने रवी शास्त्री यांना अर्ज करण्यास सांगितले होते. कर्णधार विराट कोहलीच्या आग्रहावरून शास्त्री यांचे नाव या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. भारतीय संघ जुलैअखेरीस श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यापूर्वी नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती होईल, असे 'बीसीसीआय'मधील सूत्रांनी सांगितले. 

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची समिती प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असलेल्यांची मुलाखत घेणार आहे.

Web Title: sports news cricket news BCCI Team India Anil Kumble Virat Kohli Ravi Shastri