नाट्यमय घडामोडींनंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी शास्त्री

टीम ई सकाळ
बुधवार, 12 जुलै 2017

कुंबळे यांच्याआधी भारतीय संघाचे संचालक म्हणून काम पाहिलेल्या शास्त्री यांनी गेल्या वर्षीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. पण मुलाखती दरम्यान शास्त्री आणि गांगुली यांचा वाद झाल्याचे नंतर समोर आले होते. त्यामुळे यावर्षी अर्ज न करण्याची भूमिका शास्त्री यांनी घेतली होती. मात्र, कर्णधार कोहलीची पसंती शास्त्री यांना असल्याचे पाहून सचिन तेंडुलकर यांनी शास्त्री यांना अर्ज भरण्यास सांगितले होते. त्यानंतर शास्री यांनी अर्ज दाखल केला होता.

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अखेर रवी शास्त्री यांची नियुक्ती झाल्याचे बीसीसीआयने मंगळवारी रात्री अधिकृतपणे जाहीर केले. या नियुक्तीवरून दिवसभर "खेळ' सुरू होता. शास्त्री पुन्हा प्रशिक्षक झाल्याचे वृत्त दुपारी वाऱ्यासारखे पसरले; परंतु काही वेळात अद्याप अशी निवड झाली नसल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करणात आले. त्यानंतर रात्री शास्त्री यांच्याकडे प्रशिक्षकपदाची सुत्रे सोपवल्याचे बीसीसीआयनेच जाहीर केले.

माजी कसोटीपटू झहीर खानची गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. राहुल द्रविडची परदेश दौऱ्यासाठी फलंदाजीचा सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. या तिघांची नियुत्ती दोन वर्षांसाठी म्हणजेच 2019 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत असणार आहे.

अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अपेक्षेप्रमाणे रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. येत्या 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी मालिकेपासून शास्त्री कार्यभार सांभाळतील. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेटविषयक सल्लागार समितीने शास्त्री यांची निवड केली. या समितीमध्ये सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश होता. या तिघांनी काल (सोमवार) प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर 'कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर करू' असे या समितीने सांगितले होते. 

अनिल कुंबळे यांचा प्रशिक्षकपदाचा कालावधी संपुष्टात येत असतानाच कोहली आणि कुंबळे यांच्यातील वादाची जाहीर चर्चा सुरू झाली होती. चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला होता. या स्पर्धेनंतर कुंबळे यांचा प्रशिक्षकपदाचा कालावधी संपणार होता. मात्र, कुंबळे यांनाच मुदतवाढ देण्यासाठी 'बीसीसीआय'चे अधिकारी उत्सुक होते. त्यामुळे नव्याने प्रशिक्षकपदासाठी निवड प्रक्रिया राबवून त्यात कुंबळे यांना अग्रस्थान देण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, कोहलीशी झालेल्या 'तीव्र' मतभेदांमुळे कुंबळे यांनी पुन्हा प्रशिक्षक होण्यास नकार दिला. त्यानंतर 'बीसीसीआय'ने प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत वाढविली. 

कुंबळे यांच्याआधी भारतीय संघाचे संचालक म्हणून काम पाहिलेल्या शास्त्री यांनी गेल्या वर्षीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. पण मुलाखती दरम्यान शास्त्री आणि गांगुली यांचा वाद झाल्याचे नंतर समोर आले होते. त्यामुळे यावर्षी अर्ज न करण्याची भूमिका शास्त्री यांनी घेतली होती. मात्र, कर्णधार कोहलीची पसंती शास्त्री यांना असल्याचे पाहून सचिन तेंडुलकर यांनी शास्त्री यांना अर्ज भरण्यास सांगितले होते. त्यानंतर शास्री यांनी अर्ज दाखल केला होता. 

प्रशिक्षकपदासाठी शास्त्री यांच्यासह वीरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, फिल सिमन्स, रिचर्ड पायबस यांनीही अर्ज दाखल केला होता. 

यापूर्वी संघ संचालक आणि प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडलेल्या रवी शास्त्री यांच्या कारर्किदीचा आढावा :

स्पर्धा कसोटी एकदिवसीय
सामने 80 150
धावा 3830 3108
शतक/अर्धशतक 11/12 4/18
विकेट 151 129

डंकन फ्लेचर यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली. फ्लेचर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रवी शास्त्री संचालक या नावाने प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळू लागले. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने श्रीलंकेत तब्बल 22 वर्षांनी कसोटी मालिकेत विजय संपादन केला, मायदेशात दक्षिण आफ्रिकेला हरवले आणि आशिया करंडकात विजेतेपद पटकावले. भारतीय संघाचा नवीन कर्णधार म्हणून निवड झालेल्या विराट कोहलीसोबत त्यांचे मैदानावर आणि मैदानाबाहेरही घनिष्ठ संबंध निर्माण झाले. रवी शास्त्रींच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे संघातील खेळाडूंना त्यांच्यासोबत जुळवून घेणे फार सोपे गेले आणि याच कारणामुळे यावेळी देखील संघातील अनेक खेळाडूंनी प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांनाच पसंती दिली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket news BCCI Team India Anil Kumble Virat Kohli Ravi Shastri