क्रिकेट: भारताचा प्रशिक्षक अद्याप निश्‍चित नाही : बीसीसीआय 

टीम ई सकाळ
मंगळवार, 11 जुलै 2017

नवी दिल्ली : 'भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अद्याप कुणाचीही निवड झालेली नाही', असा खुलासा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (मंगळवार) सायंकाळी केला. प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी नियुक्त केलेली क्रिकेटविषयक सल्लागार समिती (सीएसी) अद्याप कुठल्याही निर्णयापर्यंत आलेली नाही, असेही 'बीसीसीआय'ने सांगितले आहे. 

'भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची निवड झाली' असे वृत्त आज दुपारी वृत्तवाहिन्या आणि संकेतस्थळांवर झळकले. त्यानंतर सोशल मीडियामध्ये याची जोरदार चर्चाही झाली. पण 'अजून कुणाचीही नियुक्ती केलेली नाही' असे सांगत 'बीसीसीआय'ने या प्रकरणावर खुलासा केला. रवी शास्त्री यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी झाली, असेही याआधीच्या वृत्तात नमूद केले होते. 

'नव्या प्रशिक्षकांसंदर्भातील निर्णय झालेला नाही. 'सीएसी' अजूनही चर्चा करत आहे', असे 'बीसीसीआय'चे सचिव अमिताभ चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले. 'सध्या जे वृत्त प्रसिद्ध झाले आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही' असेही चौधरी यांनी सांगितले. 

मुख्य प्रशिक्षकपदासाठी पाच उमेदवारांच्या मुलाखती काल (सोमवार) घेण्यात आल्या होत्या. यात शास्त्री यांच्यासह वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, लालचंद राजपूत, रिचर्ड पायबस यांचा समावेश होता. या मुलाखती झाल्यानंतरही 'सीएसी'ने निर्णय जाहीर केला नव्हता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket news BCCI Team India Anil Kumble Virat Kohli Ravi Shastri