द्रविड, झहीरची नियुक्ती अजून अनिश्‍चित 

वृत्तसंस्था
रविवार, 16 जुलै 2017

प्रशासकीय समितीचे सदस्य विनोद राय आणि डायन एडल्जी तसेच बीसीसीआयचे 'सीईओ' राहुल जोहरी यांची बैठक झाली. त्यानंतर ही माहिती 'बीसीसीआय'नेच उघड केली आहे. 

नवी दिल्ली : रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करताना सचिन-सौरभ-लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने राहुल द्रविड आणि झहीर खान यांची अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीचे सल्लागार म्हणून निवड केली होती; परंतु प्रशासकीय समितीने शास्त्री यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखविला आणि द्रविड, झहीर यांची निवड शास्त्रींबरोबर चर्चा करून निश्‍चित केली जाईल, असे स्पष्ट केले. 

प्रशासकीय समितीचे सदस्य विनोद राय आणि डायन एडल्जी तसेच बीसीसीआयचे 'सीईओ' राहुल जोहरी यांची बैठक झाली. त्यानंतर ही माहिती 'बीसीसीआय'नेच उघड केली आहे. 

मुख्य प्रशिक्षकांशी चर्चा करून प्रशासकीय समिती संघासोबतच्या सल्लागारांची नियुक्ती जाहीर करेल, असे बैठकीच्या इतिवृत्तात जाहीर करण्यात आले. डायना एडल्जी यांच्यासह बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना, सचिव अमिताभ चौधरी आणि राहुल जोहरी ही चार सदस्यांची समिती शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफचे मानधन नक्की करणार आहे. या समितीची बैठक 22 जुलैला होणार आहे. त्याआधी तीन दिवस अगोदर म्हणजेच 19 जुलैला भारतीय संघ श्रीलंकेस रवाना होणार आहे. याचाच अर्थ या दौऱ्यात द्रविड आणि झहीर सल्लागार असणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. 
शास्त्री यांच्या नियुक्तीबरोबर सल्लागार समितीने केलेल्या सर्व प्रस्तावांची दखल आम्ही घेतली आहे आणि त्या प्रस्तावांची आम्ही शास्त्रींबरोबर चर्चा करणार आहोत.

त्यासाठीच चार सदस्यांची ही समिती नियुक्त केली आहे. मुख्य प्रशिक्षकांसह तीन नियुक्ती करण्याबाबत निश्‍चित करण्यात आले; परंतु त्यांची नियुक्ती करण्याअगोदर आम्हाला त्यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे. कोणाचाही कोणत्याही पद्धतीने व्यावसायिक हितसंबंधांचा अडथळा असू नये हा त्यामागचा हेतू आहे, असेही राय यांनी स्पष्ट केले. 

द्रविड आणि झहीर यांच्या निवडीचा प्रस्ताव आम्हाला मिळाला आहे; परंतु अजून कोणताही करार झालेला नाही हा केवळ प्रस्ताव आहे. मुख्य प्रशिक्षकांशी चर्चा करूनच त्यावर शिक्कामोर्तब होईल, असेही सांगण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket news BCCI Team India Anil Kumble Virat Kohli Ravi Shastri