विराट 'हरला', विराट 'जिंकला', कुंबळेंचा बळी गेला!

शैलेश नागवेकर
सोमवार, 26 जून 2017

प्रसिद्धी आणि पैसा रातोरात मिळत गेलेल्या विराट कोहलीला क्रिकेटमध्ये अजून बरीच मजल मारायची असली तरी तो स्टारचा सुपरस्टार झाला. असे यश पायाशी लोळण घेत असताना परिपक्वताही येत असते; पण कोहलीने एका कृत्यातून आपण बालिश असल्याचे दाखवून दिले.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत शानदार सुरुवात करणारा भारत अखेर पाकिस्तानकडून अंतिम सामन्यात हरला. कर्णधार विराट कोहलीला मैदानावर मोठे अपयश आले; परंतु दोन दिवसांनंतर त्याचा मैदानाबाहेरील लढाईत 'विजय' झाला. त्याने हरवले होते ते आपल्याच प्रशिक्षकाला. तडजोड काय, मला कुंबळे नकोच, असा हट्ट त्याने धरला. आतापर्यंतच्या कोणत्याही भारतीय कर्णधाराने असा हट्टवादी प्रकार केला नसावा. विराट कोहलीचा अहंकार एवढा प्रखर का आणि कसा झाला? 

  • विराट कोहली क्रिकेटपेक्षा मोठे असल्याचे समजतोय? 
  • आपल्याला कोणता प्रशिक्षक हवा हे आता कर्णधार ठरवणार? 
  • कोणती संघाबाहेरील शक्ती स्वतःच्या इगोसाठी संधी आणि टायमिंग साधतेय? 

असे तीन प्रमुख प्रश्‍न भारतीय क्रिकेटभोवती फिरत आहेत. यातील तिसऱ्या प्रश्‍नातील टायमिंग हा शब्द फार महत्त्वाचा आहे. फलंदाजीत टायमिंगला अतिशय महत्त्व असते. केवळ अचूक टायमिंग असेल तर बॅटला लागलेला चेंडू गोळीच्या वेगाने कसा सीमापार जातो, हे सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे काहीसे अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील वाद चव्हाट्यावर आणण्यासाठी टायमिंग साधले की काय, असा संशय येतो. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा 18 दिवसांची होती; पण या काळात एका बाजूला क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला विकेट असा बराच खेळ झाला. कुंबळे-कोहलीच्या विसंवादाबाबत अनेक वृत्त सर्व प्रकारच्या प्रसिद्धिमाध्यमांवर प्रसिद्ध होत होती. या दोघांमध्ये नक्की काय बिनसले, याची खरीखुरी माहिती असून बाहेर आलेली नाही; परंतु घटनाक्रम लक्षात घेता प्रामुख्याने दोन गोष्टींचा खुलासा मात्र होतो. 

  1. रवी शास्त्री यांच्याऐवजी तेंडुलकर-गांगुली-लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने अनिल कुंबळे यांची बरोबर वर्षापूर्वी मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आणि वर्षानंतर कुंबळे यांची मुदत संपत असतानाच कोहलीला कुंबळे नकोसे असल्याचे वृत्त खळबळ उडवून देते. वास्तविक पाहता कुंबळे यांची नियुक्ती झाल्यावर त्यांचे स्वागत करणारा आणि एकत्र काम करून संघाला यशस्वी करण्याचा ट्विट कोहलीने केला होता. मग काही दिवसांतच कोहली कुंबळे यांना पाण्यात कसा पाहू लागला? एखाद्याविषयीचे बरे-वाईट मत एका रात्रीत तयार होत नसते. काही गोष्टींत अनुभव घेतल्यानंतर आपण मत तयार करत असतो. असे कुंबळे यांच्याविषयी वाईट मत कोहलीने कधी तयार केले? या एका वर्षात भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आणि जिंकला; मग नेमक्‍या कोणत्या मालिकेत ठिणगी पडली होती? आपली कार्यपद्धत कोहलीला आवडत नसल्याचे कुंबळे यांनी राजीनामापत्रात म्हटले होते. विसंवादाच्या घटना इतक्‍या वेगाने वर्षभरात जर घडल्या असतील तर कार्यपद्धत नकोशी वाटत होती की कुंबळेच नकोसे वाटत होते, असा प्रश्‍न उपस्थित होतो. 
  2. भारतीय संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला जाण्यापूर्वी दीड महिन्यापेक्षा जास्त काळ आयपीएल होती. कुंबळे घरी आराम करत होते, तर कोहली बंगळूरु संघातून आयपीएल खेळत होता. त्यामुळे कार्यपद्धतीचा वाद होण्याचा प्रश्‍नच नव्हता. चॅम्पियन्स स्पर्धेला संघ रवाना झाल्यावर कर्णधार आणि प्रशिक्षकांमध्ये मोठा वाद असल्याची वृत्त बाहेर येऊ लागली. त्यातच बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवण्याची जाहिरात काढली. या दोघांमध्ये वाद होता. त्याच्या बातम्या त्याच वेळी का बाहेर आल्या नाहीत? किंवा ज्याला याबाबत माहिती होती त्याने बीसीसीआयला का सांगितले नाही? या बातम्या मीडियापर्यंत पोहचवणाऱ्या कोणी तरी वेगळ्या सूत्रधाराने टायमिंग साधले का, असा संशय निर्माण होतो. 

कुंबळे-कोहली होते आयपीएलचे साथीदार 
ग्रेग चॅपेल यांना भारतीय संघाचे प्रशिक्षक करण्यात कर्णधार असलेल्या सौरव गांगुलीचा वाटा मोलाचा होता; परंतु हेच चॅपेल गांगुलीच्या मुळावर आले. ऑस्ट्रेलियन चॅपेल यांची कार्यपद्धती आणि स्वभाव कदाचित गांगुलीला माहीत नसावी; पण कोहलीसाठी कुंबळे नवा नव्हता. हे दोघे खेळाडू भारतीय संघातून एकत्रित खेळले नसले तरी आयपीएलमध्ये एकत्रित खेळलेले आहेत. शिस्तीला सर्वाधिक प्राधान्य देणारा आणि कदाचित स्वतःचे मतांसाठी आग्रही आणि कठोर असणारा कुंबळे यांचा स्वभाव कोहलीने बंगळूरु संघातून एकत्रित खेळताना अनुभवला असेलच. सर्व काही बदलता येऊ शकते; पण मूळ स्वभाव कायमच राहतो. प्रशिक्षक झाले म्हणून कुंबळे अधिक कठोर झाले का? याबाबत खेळाडूच अधिक सांगू शकतील.

क्रिकेटमध्ये प्रशिक्षकापेक्षा कर्णधाराला अधिक महत्त्व असते. प्रशिक्षक मैदानाबाहेर राहून डावपेच तयार करत असतो, तर कर्णधार मैदानावर सर्व सूत्रे हलवत असतो. 'कुंबळे यांची शिस्त ज्यांना मान्य नसेल त्यांना संघातून हाकला. शिस्त लावणारा प्रशिक्षक हवा आहे की मार्केटिंगला जाण्यासाठी मान्यता देणारा प्रशिक्षक हवाय, असा सुनील गावसकर यांनी व्यक्त केलेला त्रागा या पार्श्‍वभूमीवर फारच बोलका आहे. 

बीसीसीआय सुस्त? 
आपली कार्यपद्धत पसंद नसल्याची तक्रार कोहलीने बीसीसीआयकडे केली याची माहिती बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी कुंबळे यांना दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना राजीनामा दिला. त्याच वेळी सहा महिन्यांपासून कुंबळे-कोहली यांच्यात संवाद नव्हता, असे वृत्त प्रसिद्ध झाले. संघ चॅम्पियन्स स्पर्धेसाठी इंग्लंडला दाखल झाल्यावर दोघांमधील संघर्ष सर्वसामान्यांसमोर आला. यामध्ये महत्त्वाचा प्रश्‍न उपस्थित होतो तो बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना या दोघांमध्ये बेबनाव सुरू झाल्याचे समजले नव्हते? यावर विश्‍वात बसत नाही. जेव्हा पहिली ठिणगी पडली असेल तेव्हाच त्याचे पडसाद उमटले असणार. संघातील इतर खेळाडू सोडाच; पण संघ व्यवस्थापनात काय चालले आहे, याची माहिती बीसीसीआयला देणे हे संघ व्यवस्थापकाचे काम आहे. ऑस्ट्रेलिया, त्याअगोदर इंग्लंड, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी असलेल्या व्यवस्थापकांनी माहिती दिली नसेल? आणि दिली असेल तर बीसीसीआयने त्याची दखल घेतली नाही? हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे. मुळात बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. संघातच जर अशा यादवी होत असतील, तर जबाबदारी घ्यायची कोणी, हा प्रश्‍न उद्‌भवतो. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासन समितीकडे सर्व व्यवहाराचे अधिकार आहेत. आताचे पदाधिकारी हे केवळ नावापुरते आणि अधिकार नसलेले आहेत. कुंबळे-कोहली यांच्यातील वाद मिटवायचा तर पुढाकार कोणी घ्यायचा, हा प्रश्‍न येतो. 

नव्याने अर्ज कशासाठी? 
एकीकडे बीसीसीआयने कोहली-कुंबळे यांच्यातील वाद सुरू होत असतानाच मिटवायचे प्रयत्न केले नाही, तर आता दुसरीकडे प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली. याचा दुसरा अर्थ असा निघतो की पहिल्यांदा ज्यांनी अर्ज केले त्या वीरेंद्र सेहवागसह इतर पाच जणांवर बीसीसीआयचा किंवा सल्लागार समितीचा विश्‍वास नसावा. तसे असते तर या पाच जणांमधूनच नव्या प्रशिक्षकाची निवड करण्यात आली असती. विराट कोहली रवी शास्त्री यांच्यासाठी आग्रही असणार आणि त्यांच्यासाठीच ही व्यवस्था करण्यात आली की काय, असा संशय येण्यास वाव आहे. सध्याचे युवा संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठीही हे आमंत्रण असण्याची शक्‍यता आहे. कारण सल्लागार समितीने जर द्रविडला आता मुख्य संघाचे प्रशिक्षक होण्यास तयार केले असेल तर ते भारतीय क्रिकेटच्या भल्याचेच असेल; मात्र द्रविडने रीतसर अर्ज करण्याची गरज आहे. 

बालिश कोहली 
प्रसिद्धी आणि पैसा रातोरात मिळत गेलेल्या विराट कोहलीला क्रिकेटमध्ये अजून बरीच मजल मारायची असली तरी तो स्टारचा सुपरस्टार झाला. असे यश पायाशी लोळण घेत असताना परिपक्वताही येत असते; पण कोहलीने एका कृत्यातून आपण बालिश असल्याचे दाखवून दिले. अनिल कुंबळे प्रशिक्षक झाले त्या वेळी त्यांचे स्वागत करणारा ट्विट त्याने केला होता; पण दोन दिवसांपूर्वी तो डिलीट केला. त्याच्या या प्रकाराची त्याच सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडिया तुम्हाला जेवढा जगाच्या जवळ आणतो तेवढाच तुम्ही असे प्रकार केलेत तर ते जगजाहीरही करतो हे मात्र तो विसरला. 

आता कार्यक्षेत्र निश्‍चित होईल 
कोहली-कुंबळे वादानंतर आता बीसीसीआय आणि सल्लागार समितीही सावध झाली असेल. नवा प्रशिक्षक नेमताना त्याचे कार्यक्षेत्र निश्‍चित केले जाईल. त्यामुळे भविष्यात असा वाद होणार नाही, याची काळजी घेतली जाईल हे निश्‍चित; पण असा धडा मिळण्यासाठी कुंबळे यांचा अशा प्रकारे बळी जाणे भारतीय क्रिकेटची प्रतिमा खालावणारे आहे.

Web Title: sports news cricket news BCCI Team India Anil Kumble Virat Kohli Shailesh Nagvekar