भारताच्या 'स्टार' खेळाडूंना जमले नाही, ते 'यांनी' केले : शास्त्री 

वृत्तसंस्था
Tuesday, 1 August 2017

विराट कोहलीचे नेतृत्व आता चांगलेच बहरू लागले आहे. तो अजूनही तरुण आहे. त्याच्या देहबोलीत आत्मविश्‍वास दिसून येतो. वयाच्या मानाने कोहलीने आताच भरपूर काही मिळविले आहे. 
- रवी शास्त्री, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक

कोलंबो : 'संघात 'स्टार' खेळाडू असतानाही भारतीय संघाने जेवढे यश मिळविले, त्यापेक्षा जास्त चांगली कामगिरी सध्याच्या संघाने केली आहे', असे मत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आज (मंगळवार) व्यक्त केले. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक वादग्रस्त घडामोडींनंतर रवी शास्त्री यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. 

या घडामोडींनंतर भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यातील पहिल्या कसोटीत भारताने सहज विजय मिळविला. आता येत्या गुरुवारपासून दुसऱ्या कसोटीस सुरवात होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शास्त्री यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. 

शास्त्री म्हणाले, 'या संघातील खेळाडू गेली दोन वर्षे एकमेकांबरोबर आहेत. आता हे सर्व खेळाडू अनुभवी झाले आहेत. भारतीय संघातील 'स्टार' खेळाडूंनाही जे जमले नव्हते, ते या खेळाडूंनी मिळविले आहे. दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेमध्येच जिंकलेली कसोटी मालिका हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय संघातील अनेक बडे खेळाडू 20 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले, श्रीलंकेचेही त्यांनी अनेक दौरे केले; पण त्यांना इथे मालिका जिंकणे जमले नव्हते. भूतकाळातील भारतीय संघाला ज्या गोष्टी जमल्या नाहीत, त्या साध्य करण्याची कला या संघाला अवगत झाली आहे.'' 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2015 मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली होती. त्यापूर्वी 1993 मध्ये महंमद अजहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही कामगिरी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket news BCCI Team India Virat Kohli Ravi Shastri India versus Sri Lanka