भारतीय महिला क्रिकेटच्या 'सुपरस्टार'ची भन्नाट कथा

अजित झळके
शुक्रवार, 30 जून 2017

विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध 90 धावा आणि वेस्टइंडिज विरुद्ध नाबाद 106 धावांची शतकी खेळी करून दोन्ही सामन्यांत सामनावीर ठरलेली सांगलीची कन्या स्मृती मानधना क्रिकेटजगतात कौतुकाचा विषय बनली आहे. स्मृतीच्या नावापुढे 'सुपरस्टार' लावलं जातयं, मात्र तिने क्रिकेट खेळायला सुरवात केली तेंव्हा तिचं क्रिकेटप्रेम लपवून ठेवण्याची वेळी तिच्या आई-वडिलांवर आली होती. मुलीनं क्रिकेट खेळावं, हे काहींना खटकत होतं. आज ती भारतीय महिला क्रिकेटचे भवितव्य आहे. तिच्या आयुष्यातील काही खास पैलूविषयी... 

तो ऑक्‍टोबर महिना होता, सन 2016. विश्रामबाग परिसरात वृदांवन व्हिलाज्‌मधील भाड्याच्या घरात मानधना कुटुंब रहात होतं. तिथं स्मृतीची भेट झाली. ती भलतीच खुशीत होती, कारणही तसचं होतं. तिनं आई-वडीलांना खास भेट देवू केली होती. 20 वर्षांच्या या पोरीनं छानसा बंगला खरेदी केला होता. त्या करारावर सह्या करून ती आली होती. 

स्मृती उजवी आहे 
स्मृतीचा मोठा भाऊ श्रवण क्रिकेटवेडाच. तो वडील श्रीनिवास यांच्यासोबत शिवाजी स्टेडियम किंवा चिंतामणराव कॉलेजवर सरावाला जायचा. तेंव्हा स्मृतीला घरी सोडण्यापेक्षा ते सोबत न्यायचे. ही छोटी मुलगी हातात बॅट घेवून हवेत फिरवायची. बॉलशी खेळत बसायची. कधी कधी वडील तिला हळूहळू चेंडू टाकायचे. स्मृतीला क्रिकेटची गोडी इथेच लागली. ती खरं तर उजव्या हाताची आहे, मात्र श्रवण डाव्या हाताने खेळतो म्हणून हिनेसुद्धा डाव्या हाताने बॅट पकडायचा हट्ट केला. त्यावेळचा हट्ट आज कमालीचा यशस्वी झालेला आपण पाहतोय. भारतीय क्रिकेट संघातील सलामीची सर्वात यशस्वी डावखुरी फलंदाज म्हणून तिने ठसा उमटवला आहे. 

पोरगी क्रिकेट खेळते? 
वयाच्या बाराव्या वर्षापासून क्रिकेटसाठी तिने झोकून दिले. कमालीचं क्रिकेटवेड. घरी पाहुण्यांचे फोन यायचे, ते विचारायचे, स्मृती कुठे आहे? तेंव्हा आई स्मिता यांनी 'क्रिकेट खेळायला गेलीय', असे उत्तर दिले की नाकं मुरडली जायची. मुलगी क्रिकेट खेळते, हे पटायचं नाही. त्यामागे काहीअंशी काळजी असावी आणि काहीअंशी जुने विचार... पण मानधरा दांपत्याने मनावर घेतले नाही. स्मृतीला त्याची कुणकुण लागू दिली नाही. ती क्रिकेट खेळते, हे थोडं लपवून ठेवलं... पुढे-पुढे तिच्या करिअरने अशी उंची गाठली की लपवून ठेवायची गरजच लागली नाही, उलटपक्षी नाकं मुरडणाऱ्यांच्या कॉलर ताठ झाल्या, अशा आठवणी मानधना दांपत्य सांगते. 

चष्मा, लाईफ पार्टनर 
स्मृती मानधना आणि तिचा चष्मा ही फेमस आहे. ती सांगते, एक दिवस मी सरावाला गेले होते. काही केल्या चेंडू बॅटवर येईचना. तेंव्हा मला कळाले, मला चष्मा लागलाय. आता तो माझा लाईम पार्टनरच आहे. ती माझी ओळख आहे. 

स्वयंपाक... उत्तम 
क्रिकेटर पोरगी... घरातील कामे काही जमत नसणार, असा सामान्यतः समज होवू शकेल. पण, धक्का बसेल, स्मृती उत्तम स्वयंपाक करते. ती चौथीत असल्यापासून किचनमध्ये रमते. आईला मदत करते. पंजाबी डिशेस बनवायला आणि खायला तिला आवडतं. अर्थात, डाएट चार्टमुळे मर्यादा आल्यात, मात्र एखादवेळा मनसोक्त ताव मारते; जीम, भरपूर धावणे, व्यायाम, सराव यामुळे फिटनेसची चिंता नाही, असं ती सांगते. 

नट्टापट्टा... कंटाळा येतो 
स्मृतीला नट्टापट्टा करायला अजिबात आवडत नाही. मस्त जीन्स, टॉप्स, टी-शर्ट वापरून कूल रहायला तिला आवडतं. ती म्हणते, मला कधीही आरशासमोर उभं रहावं वाटत नाही. गरजच लागत नाही. दागिन्यांची अजिबात हौस नाही. पण, अलिकडे आईच्या हट्टाखातर तिने छोटे-मोठे बदल सुरु केले आहेत. 

अभ्यास पण करते 
स्मृती क्रिकेटवेडी आहेच, मात्र तीचा अभ्यासातही 'हातखंडा' आहे. दहावीत तिने 85 टक्के गुण मिळवले. वाणिज्य शाखेतून ती पदवीचा अभ्यास करत असून चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्सची विद्यार्थीनी आहे. पहिल्या वर्षी तिला 71 टक्के गुण मिळालेत. त्यावेळी वर्ल्डकपचा सराव करून तिने परीक्षा दिली होती. 

स्मृती स्पेशल 

  • स्मृतीला कार चालवायला भारी आवडते. 
  • विराट कोहली, ए. बी. डिव्हिलिअर्स तिचे आवडते क्रिकेटपटू 
  • टेनिसपटू रॉजर फेडरर, विराटसह सचिन तेंडुलकर यांना फॉलो करते 
  • पंजाबी खाणे, गाणी ऐकणे, पिक्‍चर पाहणे याचे तिला वेड आहे 
  • देशात महाबळेश्‍वर, विदेशात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आवडती ठिकाणं

'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वारीद्वारे केली अपंगत्वावर मात

कल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी

नाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)

Web Title: sports news cricket news BCCI Team India Women's World Cup Smriti Mandhana