न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाला धक्का देऊ शकेल?

शुक्रवार, 2 जून 2017

न्यूझीलंड वि ऑस्ट्रेलिया सामन्याकरिता एजबास्टनच्या खेळपट्टीवर कमी गवत राखण्यात येणार आहे. बर्मिंगहॅमची हवा चांगली असल्याने खेळपट्टी फलंदाजीला पोषक करायचा संयोजकांचा प्रयत्न आहे. बर्मिंगहॅमला एकाहून एक सरस सामने होणार असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण आहे.

बर्मिंगहॅम : ऑस्ट्रेलियाने दोन वेळा चँपियन्स ट्रॉफी जिंकलेली असली तरी त्यांना जोरदार खेळ करून पराभवाचा धक्का देण्याचा विचार केन विल्यमसनचा न्यूझीलंड संघ करत आहे.

न्यूझीलंडचा भरवसा तगड्या फलंदाजीवर आहे. सराव सामन्यात न्यूझीलंडने साडेतीनशे धावांचा आरामात पाठलाग करून श्रीलंकेला हरवले होते, हे विसरायला नको.

मार्टिन गुप्टिल, लॅथम, कर्णधार केन विल्यम्सन, अनुभवी रॉस टेलर आणि फटकेबाजीकरिता प्रसिद्ध असलेल्या कॉरे अँडरसनकडे न्यूझीलंड संघ आशेने बघत आहे. ऑस्ट्रेलियाकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. फिरकी गोलंदाजीच्या आघाडीवर न्यूझीलंडचे पारडे किंचित वर आहे. फिरकी गोलंदाज सॅंटनरला अनुभवी जीतन पटेलची साथ आहे. 

दुसऱ्या बाजूला स्टिव्ह स्मिथ आपल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधे चालू असलेला खेळाडूंच्या पगाराचा वाद मागे सोडून खेळावर लक्ष केंद्रित करायला बजावत आहे. तसे बघायला गेले तर दोनही संघांचे बलस्थान फलंदाजीच आहे. मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूडच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजीला थोडी जास्त धार वाटते. ख्रीस लीन आणि ग्लेन मॅक्‍सवेल दोन अत्यंत धोकादायक आक्रमक खेळाडू स्टिव्ह स्मिथच्या संघात आहेत. 

न्यूझीलंड वि ऑस्ट्रेलिया सामन्याकरिता एजबास्टनच्या खेळपट्टीवर कमी गवत राखण्यात येणार आहे. बर्मिंगहॅमची हवा चांगली असल्याने खेळपट्टी फलंदाजीला पोषक करायचा संयोजकांचा प्रयत्न आहे. बर्मिंगहॅमला एकाहून एक सरस सामने होणार असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण आहे. एजबास्टनला होणाऱ्या सर्व सामन्यांना प्रेक्षक भरपूर प्रतिसाद देणार असल्याची खात्री आयसीसीला आहे.

Web Title: Sports News Cricket News Champions Trophy Australia versus New Zealand