esakal | श्रीलंकेचा डाव गडगडला; कोहलीने दिला फॉलोऑन 
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

श्रीलंकेचा डाव गडगडला; कोहलीने दिला फॉलोऑन 

sakal_logo
By
सुनंदन लेले

कोलंबो : डोळ्यांसमोर पत्त्यांच्या बंगला कोलमडून पडावा, तसा श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 49.4 षटकांत 183 धावांत गडगडला. अनुभवी फिरकी गोलंदाज आर. आश्‍विनने पाच गडी बाद करत कमाल केली. निरोशन डिकवेलाने केलेल्या अर्धशतकी खेळीचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर संयमाने उभे राहता आले नाही. 439 धावांची प्रचंड आघाडी आणि उपाहाराला मिळालेल्या विश्रांतीमुळे कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेला फॉलोऑन दिला. 

सिंहलीज स्पोर्टस क्‍लबची ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत करू लागली होती, हे मान्य केले तरीही श्रीलंकेचे फलंदाज कौशल्य आणि संयमाचा योग्य वापर करून भारतीय गोलंदाजांना सहजासहजी यश मिळू देणार नाहीत, इतकीच माफक अपेक्षा ठेवत प्रेक्षक मैदानावर जमले. दिनेश चंडिमलने भारतीय फिरकी गोलंदाजांसाठी केवळ स्विपच्या फटक्‍याचाच वापर करण्याचे ठरविल्यासारखे दिसत होते. 

कर्णधार कोहलीने तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरवात रवींद्र जडेजा आणि उमेश यादव यांच्या गोलंदाजीने केली. जडेजाला स्विपचा फटका मारण्याच्या प्रयत्नांत चंडिमल झेलबाद झाला. त्यानंतर लगेचच उमेश यादवने कुशल मेंडिसचा अडथळा दूर केला. 

अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने दोन षटकार, दोन चौकार मारून आक्रमक धोरण स्वीकारले. मॅथ्यूजचा अडथळा आश्‍विननेच दूर केला. अर्थात, या विकेटचे श्रेय आश्‍विनपेक्षा अफलातून झेल पकडणाऱ्या चेतेश्‍वर पुजाराला द्यावे लागेल. आश्‍विनचा वळणारा चेंडू मॅथ्यूजने डाव्या बाजूला मारला. लेग स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पुजाराने डावीकडे झेपावत एका हातात जमिनीपासून एका इंचावर झेल पकडला. 

मॅथ्यूज बाद झाल्यानंतर इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. महंमद शमी आणि जडेजाने दोन फलंदाजांना बाद केले. त्यानंतर आश्‍विनने तळातील फलंदाजांना झटपट बाद करत श्रीलंकेचा डाव गुंडालला. डिकवेलाने अर्धशतक झळकाविले खरे; पण शमीच्या गोलंदाजीवर अत्यंत खराब फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने विकेट बहाल केली. यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांकडे संयमाचा अभावच असल्याचे स्पष्ट झाले. 

भारताकडून आश्‍विनने 69 धावांत पाच गडी बाद केले. उपाहाराला श्रीलंकेचा पहिला डाव संपल्याने फॉलोऑन देणे शक्‍य झाले.