गोलंदाज श्रीशांतवरील आजन्म बंदी न्यायालयाने हटविली

वृत्तसंस्था
Monday, 7 August 2017

श्रीशांत, चंडिला आणि चव्हाण यांच्याविरोधात प्रथमदर्शनी पुरावे नसल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरविले होते. मात्र, 'बीसीसीआय'ने त्याच्यावरील बंदी मागे घेतली नव्हती. तसेच, 'बीसीसीआय'ने श्रीशांतला 'ना हरकत प्रमाणपत्र' देण्यासनी नकार दिला होता.

तिरुअनंतपुरम : 'इंडियन प्रीमिअर लीग'मधील (आयपीएल) सामन्यांमध्ये 'स्पॉट फिक्‍सिंग' केल्याच्या आरोपावरून आजन्म बंदी घातलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत याला केरळ उच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिलासा दिला. श्रीशांतवरील बंदी हटविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने 'बीसीसीआय'ला दिला. 

चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या 'स्पॉट फिक्‍सिंग' प्रकरणात श्रीशांतला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. तत्कालीन 'राजस्थान रॉयल्स'च्या संघाकडून खेळताना श्रीशांतने हे कृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप होता. या आरोपामुळे 2013 च्या सप्टेंबरमध्ये श्रीशांतवर 'बीसीसीआय'ने बंदी घातली होती. त्याच्यासह राजस्थान रॉयल्सचे खेळाडू अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावरही ही कारवाई झाली होती. 

मात्र, दोन वर्षांपूर्वी जुलै 2015 मध्ये श्रीशांतची या आरोपांमधून निर्दोष मुक्तता झाली होती. श्रीशांत, चंडिला आणि चव्हाण यांच्याविरोधात प्रथमदर्शनी पुरावे नसल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरविले होते. मात्र, 'बीसीसीआय'ने त्याच्यावरील बंदी मागे घेतली नव्हती. तसेच, 'बीसीसीआय'ने श्रीशांतला 'ना हरकत प्रमाणपत्र' देण्यासनी नकार दिला होता. त्यामुळे श्रीशांतला स्कॉटलंडमधील स्थानिक स्पर्धेत सहभागी होता आले नाही. त्यानंतर श्रीशांतने उच्च न्यायालयात दाद मागितली. 

या संदर्भात गेल्या मार्चमध्ये झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने 'बीसीसीआय'ला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket news s sreesanth spot fixing Rajasthan Royals