वूल्मरने दक्षिण आफ्रिकेला ताकदवान बनवले 

Saturday, 13 January 2018

बॉब वूल्मर पाकिस्तानचा प्रशिक्षक झाला होता. पण, तो त्यांच्यात रमला नव्हता. 
कॅरेबियन भूमीत झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यानंतर बॉबने ग्रेग चॅपेलला जे काही सांगितले ते अविश्‍वसनीय होते. एखादा प्रशिक्षक आपल्या खेळाडूंबद्दल असे बोलू शकतो, हे तेव्हा कळाले. पाकिस्तानी खेळाडूंना मार्गदर्शन करणे कठिण आहे. रात्रभर झोप येत नाही. सगळेच विस्कळित झाले आहे.

बॉब वूल्मर ! क्रिकेटमधील हे एक असे नाव की ज्याने दक्षिण आफ्रिका संघाला परिपूर्ण आणि ताकदवान बनवले होते. पण, हा संघ "चोकर्स'च्या शिक्‍क्‍यातूून बाहेरच आला नाही. दोन वेळा विश्‍वकरंडक स्पर्धेत चालून आलेली संधी त्यांच्यापासून दूर गेली.

दोन्ही वेळा हा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला. एकदा स्टिव वॉचा झेल पूर्ण होण्यापूर्वीच गिब्ज अत्यांनंदाने नाचला आणि तो झेल सुटला. उपांत्य सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर असताना त्यांचा अखेरचा खेळाडू धावबाद झाला. दक्षिण आफ्रिका संघाच्या चाहत्यांना हा धक्का होता. दक्षिण आफ्रिकेतील भयानक राजकीय परिस्थितीचा फटका बसलेला एक वयस्क खेळाडू गामेने केप टाऊनच्या भेटीत ही कहाणी सांगितली. 
विश्‍वकरंडक स्पर्धेतील या पराभवानंतर दोन दिवसांनी संघ मायदेसी परतला तेव्हाची आठवणही गामे यांनी सांगितली. मैदानावर 10 वर्षांखालील मुलांची चाचणी चालू होती. तेव्हा एका गाडीतून बॉब वूल्मर उतरला. आम्ही सगळेच चकित झालो. बॉबने मुलांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. त्या वेळी वूल्मरने बोललेले वाक्‍य आजही माझ्या कानात जसेच्या तसे घुमत आहे. तो म्हणाला होता, "पुढच्या वेळी एक धाव कमी पडायला नको, आतापासूनच तयारी सुरू करू.'' त्यानंतर क्रिकेटमध्ये बरेच काही घडले.

बॉब वूल्मर पाकिस्तानचा प्रशिक्षक झाला होता. पण, तो त्यांच्यात रमला नव्हता. 
कॅरेबियन भूमीत झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यानंतर बॉबने ग्रेग चॅपेलला जे काही सांगितले ते अविश्‍वसनीय होते. एखादा प्रशिक्षक आपल्या खेळाडूंबद्दल असे बोलू शकतो, हे तेव्हा कळाले. पाकिस्तानी खेळाडूंना मार्गदर्शन करणे कठिण आहे. रात्रभर झोप येत नाही. सगळेच विस्कळित झाले आहे. विश्‍वकरंडक संपला की बॅगही पॅक करणार नाही. थेट केप टाऊन गाठणार, असे वूल्मरने चॅपेल यांना सांगितले होते. या स्पर्धेदरम्यान पाकिस्तान संघात गैरप्रकार सुरू होते. बॉबला याची खबर लागली होती. संतप्त झालेल्या वूल्मरने खेळाडूना "तुम्ही बघाच, पुस्तक लिहून मी सगळे सांगणार आहे', असे धमकावलेही होते. पुढे जमैकात हरल्यावर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी वूल्मर त्याच्या हॉटेलमधील खोलीत मृतावस्थेत आढळला. जमैकन पोलिसांनी ती केस पुराव्याअभावी बंददेखील केली. त्यामुळे आजही वूल्मरच्या मृत्यूबद्दलचे गूढ कायम आहे. 

वूल्मरची ही सगळी कथा ऐकल्यावर गामेच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. तो एकच वाक्‍य म्हणाला, "बॉब बॅग पॅक न करता केप टाऊनला परतला, पण शवपेटीतून.'' वूल्मरच्या आठवणीने भारावलेला गामे माझा निरोप घेऊन परतला. तेव्हा दक्षिण आफ्रिकेसाठी वूल्मर किती मोलाचा होता हे कळून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports news cricket news Sunandan Lele writes about Bob Woolmer