धोनी म्हणतो... मी व्हिंटेज वाइन! 

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

खेळपट्टीचे स्वरूप पाहून या खेळाचे महत्त्व अधिक आहे. वेगाप्रमाणे चेंडूही उसळीवर खाली येत होता. अशा वेळी भागीदारी होणे गरजेचे होते. 250 धावांचे लक्ष्य मी ठरवले होते आणि दुसऱ्या बाजूने केदारने चांगली साथ दिली, त्यामुळे हे उद्दिष्ट गाठू शकलो. 
- धोनी

सेंट जॉन्स (अँटिगा) : प्रदीर्घ कालावधीनंतर 'सामन्याचा मानकरी' ठरलेल्या महेंद्रसिंह धोनीने वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात केलेली 79 चेंडूंतील नाबाद 78 धावांची खेळी निर्णायक ठरली. वाढत्या वयातही बहरत असलेल्या आपल्या खेळाची तुलना धोनीने 'व्हिंटेज वाइन'शी केली. भारताने हा सामना 93 धावांनी जिंकला. रविवारचा चौथा सामनाही जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा निर्धार आहे. 

सहजासहजी धावा होत नसलेल्या 'व्हिव रिचर्डस स्टेडियम'वर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताच्या 40 षटकांत 3 बाद 151 एवढ्याच धावा झाल्या होत्या; परंतु अखेरच्या षटकांत तारुण्यातला धोनी दिसून आला. 4 चौकार, 2 षटकारांसह त्याने फटकावलेल्या 78 धावा आणि त्याला साथ देणाऱ्या केदार जाधवच्या वेगवान 40 धावांमुळे भारताने 251 धावांपर्यंत मजल मारली. 

विंडीजला हे आव्हान पेलवलेच नाही. 38.1 षटकांत त्यांचा संघ 158 धावांत गारद झाला. चायनामन कुलदीप यादव आणि आर. अश्‍विन यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. त्या अगोदर हार्दिक पंड्याने दोन विकेटचे योगदान दिले होते. 

'सामनावीर' पुरस्कार स्वीकारल्यानंतर धोनीला विचारण्यात आले की, 'वाढत्या वयाबरोबर तुझ्या बहरणाऱ्या फलंदाजीचे राज काय आहे?' त्यावर धोनी हसत हसत म्हणाला की, 'व्हिंटेज वाइनप्रमाणे!' फलंदाजी सोपी नसलेल्या खेळपट्टीवर केलेल्या धावांचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. 

भविष्याचा विचार करता युवराज सिंग आणि धोनी यांच्या संघातील स्थानाविषयी 19 वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर दडपण वाढलेले आहे. दीड वर्षात आमच्या सलामीवीरांनी वेळोवेळी मुबलक धावा केलेल्या आहेत. आता आम्हाला धावा करण्याची संधी मिळाली त्याचा फायदा घेतला, असे धोनी म्हणाला. 

केवळ फलंदाज म्हणून नव्हे, तर धोनी हा कर्णधार विराट कोहली आणि अश्‍विन-कुलदीपसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्याचे सातत्याने होत असलेले मार्गदर्शन यष्टींमधल्या कॅमेरातून टिपले जात आहे. कुलदीपसारख्या नवोदिताला मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. आयपीएलमध्ये तो खेळला आहे; परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रश्‍न येतो तेव्हा तुमच्यातील विविधतेचे कौशल्याने वापर करणे महत्त्वाचे असते. 5-10 सामने खेळल्यानंतर तो तयार होईल, असे धोनीने सांगितले. 

संक्षिप्त धावफलक 
भारत : 50 षटकांत 4 बाद 251
(अजिंक्‍य रहाणे 72 -112 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार; शिखर धवन 2; विराट कोहली 11; युवराज सिंग 39; महेंद्रसिंह धोनी नाबाद 78 -79 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार; केदार जाधव नाबाद 40 -26 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार; कमिन्स 10-0-56-2) वि. वि. वेस्ट इंडीज : 38.1 षटकांत सर्व बाद 158 (जासन महंमद 40, रॉवमन पॉवेल 30, पंड्या 6-0-32-2, कुलदीप यादव 10-1-41-3, आर. अश्‍विन 10-1-28-3) 

Web Title: sports news cricket news Team India MS Dhoni India versus West Indies