सलामीला खेळण्यासाठी रोहित सज्ज

पीटीआय
मंगळवार, 30 मे 2017

लंडन - दुखापतीनंतर बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिलेला रोहित शर्मा संपूर्ण आयपीएलमध्ये मधल्या फळीत खेळला, आता चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या तोंडावर तो सराव सामन्यातून पुन्हा सलामीला खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. बांगलादेशविरुद्ध उद्या होणाऱ्या सराव सामन्यात रोहित सलामीला खेळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

रविवारी झालेल्या न्यूझीलंड-विरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. उद्याच्या सामन्यातून तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन करण्यास सज्ज होत आहे. गत स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद मिळवले होते, तेव्हा रोहित आणि शिखर धवन ही सलामीची जोडी फॉर्मात होती.  

युवराज सिंग तापातून सावरत असल्यामुळे तो उपलब्ध आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे रहाणेचे स्थान कायम असेल. भारताच्या वेगवान गोलंदाजांना सापडलेला सूर ही विराट कोहलीसाठी समाधानाची बाब असेल. पहिल्या सराव सामन्यात भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी आणि उमेश यादव यांनी प्रभावी मारा केला होता, त्यांच्या साथीला बुमराह असल्यामुळे आता अंतिम संघात कोणाची निवड करायची, हा प्रश्‍नही संघ व्यवस्थापनाला असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजानेही आपली जादू दाखवली होती. चॅंपियन्स स्पर्धेच्या सलामीला पाकिस्तानविरुद्ध संघरचना कशी करायची, याचाही अभ्यास उद्याच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून केला जाईल.

Web Title: sports news cricket rohit sharma