esakal | भुवनेश्‍वर आता परिपूर्ण गोलंदाज - शिखर धवन
sakal

बोलून बातमी शोधा

भुवनेश्‍वर आता परिपूर्ण गोलंदाज - शिखर धवन

भुवनेश्‍वर आता परिपूर्ण गोलंदाज - शिखर धवन

sakal_logo
By
सुनंदन लेले

पुणे  - मुंबईमध्ये झालेला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना न्यूझीलंडने जिंकल्याने पुणे सामना जिंकून मालिकेत बरोबरी करायचे आव्हान भारतीय संघासमोर होते. फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी आपापली कामगिरी चोख पार पडल्याने कोहलीच्या संघाला सामना जिंकणे कठीण गेले नाही. सामन्यानंतर चर्चा फक्त भुवनेश्‍वरकुमारच्या गोलंदाजीची होती.

‘आमच्या गोलंदाजांनी फारच अचूक मारा केला. समोरच्या संघाला  धावांमध्ये रोखले तिथेच यशाचा मार्ग खुला झाला,’ शिखर धवन सांगत होता. सामनावीर भुवनेश्‍वरकुमारचे कौतुक करताना शिखर धवन म्हणाला, ‘नव्या चेंडूवर भुवनेश्‍वरकुमार टप्प्यावर मारा करून फलंदाजाला बाद करतो आणि चेंडू जुना झाला की गोलंदाजीत विविधता आणून फलंदाजांना गोंधळून टाकतो. आता त्याच्या भात्यात ‘नकल बॉल’ जमा झालाय जो ओळखता येणे फार कठीण जातंय.’

भारतीय संघाचा ट्रेनर शंकर बसूने भुवनेश्‍वरकुमारला वेगळे व्यायाम शिकवले ज्याने त्याच्या ताकदीमध्ये फरक पडलाय. ‘नव्या चेंडूवर गोलंदाजी करणे वेगळा प्रकार आहे आणि जुन्या चेंडूवर करणे वेगळा. भुवनेश्‍वरकुमार जुन्या चेंडूवर गोलंदाजी करताना जास्त धोकादायक वाटतो. मी आणि तो भारतीय  संघातून तसेच आयपीएल संघातून एकत्र खेळतो. तंदुरुस्ती आणि गोलंदाजीत विविधता या गोष्टीमुळे भुवनेश्‍वरकुमार खूप आत्मविश्‍वासाने भारलाय. माझ्यामते तोच सध्याचा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम एकदिवसीय गोलंदाज आहे,’ शिखर धवन म्हणाला.

पुणे सामन्यात भुवनेश्‍वरकुमारने कॉलिन मुनरोला बाद करताना टाकलेला नकल बॉल कॉमेंटरी करणाऱ्या सर्व माजी खेळाडूंना भावला. दुपारी १ वाजता खास चार्टर विमानाने दोनही संघ लखनौला रवाना झाले. लखनौहून बसने खेळाडू कानपूरला प्रवास करून जाणार आहेत. मालिकेत १-१ बरोबरी झाली असल्याने रविवारी कानपूरला होणारा तिसरा सामना जिंकून विजयी घोडदौड कायम राखायचे भारतीय संघाचे ध्येय आहे.

loading image
go to top