क्रिकेट प्रशिक्षणातील ‘नेक्‍स्ट स्टेप’साठी ‘डेस्टिनेशन पुणे’

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 February 2018

पुणे - भारत हा साप आणि साधूंचा देश असल्याचा समज आता केव्हाच मागे पडला आहे. शिक्षणापासून वैद्यकीय उपचारांपर्यंत विविध क्षेत्रांतील हब आणि डेस्टिनेशन म्हणून भारतातील विविध शहरांचा लौकिक वृद्धिंगत होत आहे. याच मालिकेत आता क्रिकेट प्रशिक्षणाची भर पडली आहे. लेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्‍लबच्या संघाने दहा दिवसांचा पुणे दौरा करून क्रिकेटनेक्‍स्ट ॲकॅडमीत अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली योजनाबद्ध सराव केला.

पुणे - भारत हा साप आणि साधूंचा देश असल्याचा समज आता केव्हाच मागे पडला आहे. शिक्षणापासून वैद्यकीय उपचारांपर्यंत विविध क्षेत्रांतील हब आणि डेस्टिनेशन म्हणून भारतातील विविध शहरांचा लौकिक वृद्धिंगत होत आहे. याच मालिकेत आता क्रिकेट प्रशिक्षणाची भर पडली आहे. लेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्‍लबच्या संघाने दहा दिवसांचा पुणे दौरा करून क्रिकेटनेक्‍स्ट ॲकॅडमीत अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली योजनाबद्ध सराव केला.

आसामचा माजी रणजीपटू अंशुमन ऊर्फ डॉन भगवती याने या दौऱ्याचे आयोजन केले. लेस्टरमध्ये त्यांची सिटी क्रिकेट क्‍लब ॲकॅडमी आहे. तेथे क्रिकेटनेक्‍स्ट ॲकॅडमीच्या संघाने दौरा केला आहे. त्यातूनच हा उपक्रम आखण्यात आला. लेस्टरशायरचे प्रशिक्षक कार्ल क्रो यांनी आणलेल्या संघात दोन कौंटी क्रिकेटपटू तसेच १७ व १९ वर्षांखालील मुले होती. २०१४ मध्ये युवा विश्वकरंडक खेळलेला रॉब सेयर आणि अष्टपैलू आदिल अली हे मुख्य क्रिकेटपटू होते. सेयर गेले तीन, तर आदिल गेले चार मोसम कौंटी स्पर्धेत खेळले आहेत.

कार्ल यांनी वेस्ट इंडीज तसेच कोलकता नाईट रायडर्सचा ऑफस्पीनर सुनील नारायण याच्या वैध ठरविण्यात आलेल्या ॲक्‍शनमध्ये योग्य सुधारणा केली होती. ते बायोमेकॅनिक्‍स तज्ञ आहेत.

त्यांनी सांगितले की, येथील हवामान, परिस्थिती फार वेगळी आहे. त्यामुळे येथे खेळण्याचा इंग्लंडच्या खेळाडूंना याचा फार फायदा होतो. आम्ही येथील प्रशिक्षकांचेच मार्गदर्शन घेतले, कारण त्यांना स्थानिक परिस्थितीचे सखोल ज्ञान आहे. आम्ही वरिष्ठ व कुमार संघाविरुद्ध दोन सराव सामने खेळलो.

बीसीसीआय तसेच ऑस्ट्रेलियन मंडळाचा लेव्हल ३ कोर्स पूर्ण केलेले प्रशिक्षक अतुल म्हणाले की, त्यांना प्रामुख्याने फिरकी गोलंदाजीवर सराव करण्याचा अनुभव हवा होता. याशिवाय आपल्याकडे नेट कशी लावतात, सराव किती वेळ चालतो, ॲकॅडमीतील विविध प्रशिक्षक कसा समन्वय साधतात याची माहिती हवी होती. त्यांनी मानसिकतेवरही चर्चा केली.

आदिल चुकांचा अकारण विचार करायचा, तर जमेच्या बाजूंकडे दुर्लक्ष करायचा. एकवेळ त्याला अंडरआर्म चेंडूसुद्धा मारता येत नव्हता.

भगवतीने सांगितले की, हा उपक्रम एवढ्यावरच थांबणार नाही. मोसमात किमान दोन वेळा येण्याचा विचार आहे. अतुल फार माहीतगार आहेत आणि त्यांचा अनुभव मोठा आहे. येथील सुविधा उत्तम आहेत. आम्ही दीर्घ काळाचे नियोजन करू.

ॲकॅडमीचे संचालक विक्रम देशमुख यांनी सांगितले की, आम्ही गेली २७ वर्षे ॲकॅडमी चालवीत आहोत. महाराष्ट्रीय मंडळाचे प्रमुख धनंजय दामले यांच्या सहकार्यामुळे हे शिबिर व्यवस्थित पार पडले. त्यांनी शिबिरामुळे मैदान वापरण्याबद्दल वेळेची कोणतीही मर्यादा ठेवली नाही.

रॉबने सांगितले की, येथील मुलांची सरावातील निष्ठा थक्क करणारी आहे. ते सातत्याने एकाच टप्प्यावर मारा करतात. एक चेंडू वळतो, तर दुसरा वळत नाही. अगदी छोटी-छोटी मुलेसुद्धा तुम्हाला बीट करण्याच्या जिद्दीने गोलंदाजी करतात. त्यांच्या क्षमतेचे कौतुक वाटते.

ग्रॅम स्वान हा रॉबचा आदर्श आहे. इंग्लंडमध्ये त्याच्या वारसदाराचा शोध सुरू आहे. येथील सरावाचा वापर करून पुढील ग्रॅम स्वान आपण बनू असा विश्वास त्याने व्यक्त केला.

योगासनांचीही ओळख
अतुल यांनी लेस्टरशायरच्या खेळाडूंसाठी पहाटे योगासनांचे सत्रही आयोजित केले. पल्लवी कव्हाणे यांनी हे सत्र घेतले. योगासनांची ओळख झाल्यामुळे लेस्टरच्या खेळाडूंना सरावात फायदा झाला.

नेट बोलर्सची निष्ठा विलक्षण
क्रिकेटनेक्‍स्ट ॲकॅडमीतील मुलांनी पाहुण्या खेळाडूंना सर्वोत्तम सराव मिळावा म्हणून स्वतःला झोकून दिले. याचे आदिलने आवर्जून कौतुक केले. आमच्याकडे दीड तास गोलंदाजी केली की खेळाडू दमतात, पण तुमची मुले तीन-तीन तास उन्हात अथक मारा करायची. अनेकांनी शाळा बुडविली. जेवणाला उशीर झाला तरी त्यांना भान नसायचे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket training next step destination pune